फोटो सौजन्य सोशल मीडिया
१४ ऑक्टोबर १९५६ हा भारतीय इतिहासातील महत्त्वाचा दिवस. याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता व मानवतेचा संदेश दिला. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात येणाऱ्या बाईक रॅलीच्या माध्यमातून धम्मविचार, सामाजिक समता आणि बंधुभावाचा संदेश समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचविण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.
मंत्रालयाशेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर सकाळी ९ वाजता रॅलीला सुरुवात होईल. विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. मुंबईतील नियोजित मार्गावरून मार्गक्रमण करत ही रॅली दुपारी चैत्यभूमी येथे पोहोचणार आहे. त्यानंतर येथे जाहीर धम्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
शिवसेनेच्या सामाजिक न्याय विभागाचे मुंबई अध्यक्ष आर्यन मोरे यांनी या रॅलीच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला असून, माजी आमदार राम पंडागळे हे या उपक्रमाचे मार्गदर्शक आहेत. राजकीय पक्षाच्या माध्यमातून धम्म समता जागृतीसाठी अशा प्रकारची रॅली आयोजित करण्याचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समतेचा विचार, सामाजिक न्यायाची भूमिका आणि बंधुभावाचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे धम्मचक्र दिनानिमित्त मुंबईत होणाऱ्या या उपक्रमाकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






