(Photo - X)
प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर करण्यापूर्वी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह पक्षातील अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.
बैठकीला माजी मंत्री जयंत पाटील, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, माजी खासदार फौजियाताई खान, राजेंद्र शिंगणे आणि माजी आमदार ॲड. अशोकबापू पवार यांच्यासह इतर नेत्यांची उपस्थिती होती. बैठकीनंतर पक्षाकडून नव्या प्रवक्त्यांची घोषणा करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जाहीर केलेल्या नव्या यादीत जितेंद्र आव्हाड, क्लाईड क्रास्टो, भीमराव हत्तीअंबीरे, अनिश गवांदे, अॅड. फैजल मिर्झा, महेबूब इब्राहीम शेख, प्रवीण कुंटे पाटील, प्रशांत सोनबा वीरकर, अॅड. हेमाताई पिंपळे आणि डॉ. चंद्रकांत बारेला यांचा समावेश आहे.
या नेत्यांवर पक्षाची भूमिका प्रसारमाध्यमांसमोर प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकीय मुद्द्यांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाची भूमिका मांडताना या नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
दरम्यान, याच महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने यापूर्वी केलेल्या प्रवक्त्यांच्या सर्व नियुक्त्या रद्द केल्या होत्या. 4 ऑगस्ट 2026 रोजी यासंदर्भातील पत्र पक्षाकडून प्रसिद्ध करण्यात आले होते.
या निर्णयानंतर माजी आमदार विद्या चव्हाण आणि महेश तपासे हे पक्षाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून प्रसारमाध्यमांसमोर पक्षाची भूमिका मांडतील, असे त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते.
आता पक्षाने नव्याने 10 प्रवक्त्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे पक्षाच्या मीडिया स्ट्रॅटेजीमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि राज्यातील विविध राजकीय मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर या नव्या प्रवक्त्यांवर पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्याची मोठी जबाबदारी असणार आहे.






