मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह २० ते २५ जणांविरोधात गुन्हा
Amit Thackeray : शासकीय तंत्रनिकेतन, गणेशखिंड येथील कार्यालयात विनापरवानगी प्रवेश करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटविल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांच्यासह २० ते २५ पदाधिकारी, विद्यार्थी व कार्यकर्त्यांविरोधात चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शासकीय तंत्रनिकेतनचे कर्मचारी डॉ. राजेंद्र काशीराम पाटील (वय ४२) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सोमवारी (३१ ऑगस्ट) दुपारी साडेबारा ते १.१५ वाजण्याच्या सुमारास गणेशखिंड येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये हा प्रकार घडला.
फिर्यादीनुसार, अमित ठाकरे व त्यांच्यासोबत असलेले २० ते २५ पदाधिकारी, विद्यार्थी व कार्यकर्ते विनापरवानगी संस्थेच्या आवारात जमले. त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांच्या कार्यालयात विनापरवानगी प्रवेश केला. कार्यालयात असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढून घेऊन घोषणाबाजी करीत गोंधळ घातल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे कार्यालयातील कामकाजात अडथळा निर्माण झाल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यासह संबंधितांविरोधात भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक छाया चोरकर यांच्याकडे तपास सोपविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याची सुरुवातच एका वेगळ्या वादामुळे चर्चेत आली आहे. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अमित ठाकरे आज (31 ऑगस्ट 2026) शिवाजीनगर येथील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयात पोहोचले. मात्र, प्राचार्यांच्या कार्यालयातील नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रावरून यावेळी नवा वाद निर्माण झाला.
मी सरकारचा भाग नाही, मी आमदार अन्…; सुधीर मुनगंटीवारांच्या विधानाने भाजपमध्ये खळबळ
शिवाजीनगर येथील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्यात आले होते. ते पाहिल्यानंतर अमित ठाकरे यांनी, शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला नरेंद्र मोदी यांचा फोटो कशासाठी लावण्यात आला आहे? असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर लगेच उपस्थित मनसे कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचा फोटो त्या ठिकाणाहून खाली उतरवले. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.






