

नवी दिल्ली : काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या 'बिलॉगिंग अ जर्नी ऑफ लव्ह' या पुस्तकाच्या निमित्ताने गांधी कुटुंबाने मंगळवारी एक भावनिक व्हिडिओ शेअर केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा हे आई सोनिया यांच्यासोबत बसून पुस्तकात समाविष्ट न होऊ शकलेल्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत.
राहुल आणि सोनिया यांनी स्वतंत्रपणे सोशल मीडियावर ही चर्चा शेअर केली. यावेळी वडील दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तीन दशकांपूर्वी सुरक्षा हटवण्याचा निर्णय हा केवळ योगायोग नव्हता, तर त्यांची हत्या व्हावी यासाठी जाणीवपूर्वक घेण्यात आला होता, असा गंभीर आरोप राहुल यांनी केला. सुमारे २३ मिनिटांचा व्हिडिओ पोस्ट करत राहुल गांधी यांनी 'एक्स'वर लिहिले की, पाचशेहून अधिक पाने लिहिल्यानंतर आईने पुस्तकात काही गोष्टी सांगायच्या सोडल्या. त्यामुळे प्रियंका आणि मी आईसोबत बसून त्यावर चर्चा केली. जुन्या आठवणींमध्ये रमल्यामुळे त्या काळातील आनंद, हास्य आणि वेदना पुन्हा जाग्या झाल्या.
आईचा 'बिलॉगिंग'चा प्रवास प्रेमाने भरलेला असला, तरी त्यात भयंकर दुःखद घटनांचाही समावेश आहे. आईने प्रत्येक प्रसंगाचा सामना मोठ्या धैर्याने आणि सन्मानाने केला, असे राहुल यांनी म्हटले.
माझ्या संयमाची परीक्षा
सोनिया यांनीही 'एक्स'वर पोस्ट करत आपल्या आठवणीमधून 'बिलॉगिंग' हे पुस्तक लिहिल्याचे सांगितले. राहुल आणि प्रियंका यांनी त्यांच्या आठवणींची भर घातल्याने जुन्या कथांना नव्याने उजाळा मिळाला. माझी मुले हाच माझा सर्वात मोठा आनंद आणि ताकद आहेत. माझ्या संयमाची सर्वाधिक परीक्षा घेणारी हीच दोन माणसे आहेत, असे सोनिया यांनी मिश्कीलपणे नमूद केले.
दगडफेक, विरोधाचा सामना
या संवादातील सर्वांत भावनिक आणि गंभीर मुद्दा राजीव गांधी यांच्या सुरक्षेचा होता. विरोधी पक्षात असताना राजीव खुल्या जीपमधून दौरे करत असत. त्यावेळी त्यांना दगडफेक आणि विरोधाचा सामना करावा लागत होता, राहुलही अनेकदा त्यांच्या दौऱ्यांमध्ये सोबत असत. सोनिया यांनी सांगितले की, एका दौऱ्यावरून परतल्यानंतर राहुल यांनी त्यांना सांगितले होते की, वडिलांच्या सुरक्षेसाठी काही केले नाही, तर लवकरच त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मला परत यावे लागेल. या चर्चेदरम्यान सोनिया आणि राहुल यांनी राजीव गांधी यांची सुरक्षा हटवणे हा अपघात नव्हता, तर त्यांची हत्या व्हावी यासाठी जाणीवपूर्वक हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप केला.