भाजपला मोठा धक्का; मोदी सरकारमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेची खासदारकीही सोडली (संग्रहित फोटो)
२०२९ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी तमिळनाडूमध्ये भाजपला बळकट करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. ‘एक्स’वर पोस्ट करत मुरुगन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. एका मजुराच्या मुलापासून ते केंद्रीय मंत्रिमंडळात काम करण्यापर्यंतचा प्रवास त्यांच्यासाठी भाग्याचा होता. आता तळागाळात परत जाऊन आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहायचे आणि तमिळनाडूमध्ये भाजपला मजबूत करण्यासाठी पूर्ण वेळ द्यायचा आहे, असे मुरुगन यांनी स्पष्ट केले.
मुरुगन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या एका सविस्तर पत्रात आपल्या भविष्यातील योजनांची रूपरेषाही मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आता त्यांना आपला संपूर्ण वेळ तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाला मजबूत करण्यासाठी आणि २०२९ च्या लोकसभा निवडणुकांची तयारी करण्यासाठी द्यायचा आहे.
आणखी काय म्हटलंय पत्रात?
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारमध्ये पाच वर्षे काम करणे हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान होता. ज्या कामामुळे त्यांना सार्वजनिक जीवनात येण्याची प्रेरणा मिळाली, त्या कामाकडे आता त्यांना परतायचे आहे. त्यांनी म्हटले आहे की, तामिळनाडूमध्ये भाजपला मजबूत करणे आणि राज्यातील २०२९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी पक्षाला तयार करणे हे त्यांचे प्राधान्य आहे.
किरेन रिजिजू यांनी घेतली मुरुगन यांची भेट
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्री डॉ. एल. मुरुगन यांची भेट घेतली. रिजिजू यांनी या भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत म्हटले की, सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या मुरुगन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी सांगितले की, या भेटीदरम्यान दोघांमध्ये सौहार्दपूर्ण आणि फलदायी चर्चा झाली.






