

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार?
संजय राऊतांचं मिश्किल विधान
भाजपवर राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut on Supriya Sule : राज्यात आता रोजचं नवे राजकीय हेवेदावे आणि कुरघोड्या पाहायला मिळत आहेत. मात्र आता राज्याच्या आणि देशाच्या सत्तासंघर्षात वेगळंच वळण पाहायला मिळत आहे. अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात धुमाकूळ घातला होता. यावर दोन्ही राष्ट्रवादींकडून विलीनीकरण होणार नसल्याचं स्पष्ट झालं असलं तरी आता मात्र नवी राजकीय खेळी पाहायला मिळत आहे. आतापर्यंत भाजपच्या विरोधी भूमिकेत असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आता 'यु टर्न' घेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. शरद पवार गटाकडून एनडीएमध्ये जाण्यासाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली जाणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. अर्थात, सुप्रिया सुळे यांनी या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे. मात्र, आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी प्रतिक्रिया दिली असून त्यांच्या विधाने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांना सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी आपल्या खास मिश्किल शैलीत उत्तर दिलं. "सुप्रिया सुळे यांची कालची प्रतिक्रिया मी पाहिली. मी 12 वर्षांपासून मंत्रिपदाची शपथ घेत आहे, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यांना मुख्यमंत्रीपद मिळत असेल तर महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळेल," असं राऊत म्हणाले.
यावेळी त्यांनी भाजपलाही टोला लगावला. "केवळ 10 आमदार असलेल्या पक्षाला भाजप मुख्यमंत्रीपद देऊ शकत असेल, तर भाजपची ही मोठी दिलदारीच म्हणावी लागेल," असा उपरोधिक चिमटा त्यांनी काढला.
सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यास ठाकरे गट त्यांना पाठिंबा देणार का, असा सवालही राऊत यांना करण्यात आला. यावर बोलताना त्यांनी हा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील, असं स्पष्ट केलं. मात्र, स्वतःचं मत मांडताना राऊत म्हणाले की, "सुप्रिया सुळे खरोखर मुख्यमंत्री होत असतील तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे. त्या आमच्या घरातील सदस्य आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं तर आनंदच होईल."
राऊत यांनी यावेळी एक महत्त्वाची गोष्टही सांगितली. सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर त्यांच्या शपथविधी सोहळ्याला आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकाकी पडल्याच्या चर्चेवरही राऊत यांनी भाष्य केलं. रोहित पवार जनतेचे प्रश्न मांडतात, आंदोलनं करतात आणि संघर्ष करतात. त्यांचे प्रश्न महत्त्वाचे असून ते जनतेचं काम करत आहेत, असं म्हणत राऊत यांनी त्यांचं कौतुक केलं.
आता सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांवर पुढे नेमकं काय घडतं आणि राष्ट्रवादीकडून यावर काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.