कणकवलीत 332 मतदान केंद्रावर सुरक्षा तैनात; पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त
भगवान लोके/ कणकवली: कणकवली विधानसभा मतदारसंघांतर्गत कणकवली, देवगड, वैभववाडी या तीन तालुक्यात विधानसभेसाठी 332 मतदान केंद्रांवर बुधवारी 20नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7ते सायंकाळी 6वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून मंगळवारी मतदान ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅड मशीन तसेच इतर साहित्य घेऊन कर्मचारी ,अधिकारी व पोलीस मतदान केंद्रांवर एसटी बसने रवाना झाले आहेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग पोलीसांनी ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
कणकवली महाविद्यालयाच्या पटांगणावर मंडप घालून मतदान यंत्र तसेच इतर साहित्य संबधित नियुक्त कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. मंगळवारी सकाळपासूनच कर्मचारी, अधिकारी, पोलीस दल , एसटी सहीत खाजगी वाहने विविध वाहने यांची गर्दी त्याठिकाणी झाली होती. 19नोव्हेंबरला दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास विविध वाहनांमधून कर्मचारी मतदान यंत्रे घेऊन आपल्या निश्चित केलेल्या ठिकाणी रवाना झाले. या संपूर्ण प्रक्रियेमुळे कणकवली महाविद्यालयाच्या पटांगणाला गर्दीचे स्वरूप आले होते. बुधवारी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोगाच्यावतीने मतदान यंत्रे तसेच इतर साहित्य कमचाऱ्यांकडे मंगळवारीच सुपूर्द करण्यात आले.
यासाठी 45 एसटी बसेस सोडण्यात आल्या. तसेच 27 जवळच्या केंद्रांवर 22 जीप गाडीच्या माध्यमातून साहित्य वितरित करण्यात आले. त्या वाहनांना जिपीएस यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली आहे. कणकवली देवगड व वैभववाडी या तालुक्यांमध्ये 332 मतदान केंद्र आहेत. यासाठी केंद्राध्यक्ष , सहाय्यक केंद्राध्यक्ष , मतदान अधिकारी असे 1328कर्मचारी व 67सुक्ष्म निरिक्षक 1397 कर्मचारी , 700 पोलीस कर्मचारी, 107 राखीव कर्मचारी मिळुन सरासरी 2300कर्मचारी या नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच मतदान केंद्रावर केंद्राध्यक्षांसहित पोलीस कर्मचारी मिळून प्रत्येकी 6कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. 50 टक्के मतदान केंद्र वेबकास्टिंगने जोडण्यात आले तर 47 क्षेत्रीय अधिकारी कार्यरत असणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रांवर एक मतदान केंद्राध्यक्ष आणि पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. तसेच गाव पातळीवर प्रत्येक केंद्रावर एक शिपाई असणार आहे.
कणकवली-देवगड-वैभववाडी या तिनही तालुक्यांमध्ये एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही. असे प्रशासनाने जाहीर केले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस कर्मचारी,होमगार्ड तैनात ठेवण्यात आले आहेत. तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून राखीव पोलिस दल, दंगल नियंत्रक पथक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणार आहेत. अधूनमधून पोलिसांची गस्तही सुरू रहाणार आहे. बंदोबस्तासाठी बाहेरील जिल्ह्यातूनही अधिक पोलीस फोर्स ,होमगार्ड मागविण्यात आले आहेत.