
ज्योतिषशास्त्रात भारतात अनन्यसाधारण असं महत्व आहे. या ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा चांगला वाईट परिणाम मानवी जीवनावर होत असतो. यातील एक प्रकार म्हणजे साडेसाती. साडेसाती म्हटलं की अनेकांना घाम फुटतो, अरे बापरे आता आपलं कसं होणार असे नकारात्मक आणि भितीदायक विचार मनात येतो. शनीची साडेसाती म्हटलं, की आता आपलं काही खरं नाही असं वाटतं, पण खरंच साडेसाती म्हणजे वाईट काळ आहे का ? शनीची दृष्टी आपल्यावर पडली म्हणजे काहीतरी अघटीत होणार असं असतं का? या सगळ्याबाबत सविस्तचर जाणून घेऊयात.
“साडेसाती” म्हणजे शनी ग्रहाचा प्रभाव असलेला साडे सात वर्षांचा कालावधी — म्हणजेच अंदाजे 7 वर्षे 6 महिने चालणारा एक काळ. हा कालावधी व्यक्तीच्या जन्म राशीवरून मोजला जातो. जेव्हा शनी ग्रह एखाद्या राशीत भ्रमण करतो, तेव्हा त्या काळाला साडेसाती म्हणतात.प्रत्येक राशीत शनी साधारणपणे 2 वर्षे 6 महिने राहतो.त्यामुळे तीन राशी मिळून 7 वर्षे 6 महिने म्हणून “साडेसाती” असं ज्य़ोतिषी भाषेत म्हटलं जातं. या साडेसातीमध्ये कामं मार्गी लागत नाही, ध्येय साध्य करायला विलंब लागतो शारीरिक आणि मानसिक ताण तणाव निर्माण होतो असं म्हटलं जातं, मात्र ज्योतिषांच्या मते हा निव्वळ एक गैरसमज आहे.
खरंतर साडेसाती म्हणजे शनी आपल्याला शिक्षा देतो असं नाही; तो फक्त आपली परीक्षा घेतो. मेहनतीला यश देतो, पण आळशीपणाला धडा शिकवतो. खरंतर असं म्हटलं जातं की, साडेसातीच्या काळात नोकरी, पैसा, नातेसंबंध सगळं बिघडतं. मात्र असं नेहमीच होत नाही. काहींना या काळात मोठं यश, पदोन्नती, जबाबदारी देखील मिळते. शनीदेव हे कर्माचे कारक आहेत, शनी कोणालाही “शत्रू” मानत नाही, फक्त कर्मानुसार फळ देतो. जर कर्म चांगलं तर त्य़ाचं फलीत देखील चांगलचं मिळतं. साडेसातीच्या काळात आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये या भितीने अनेक जण शनीची पूजा करतात. पूजा, दान, आणि मंत्र हे मन शांत होतं पण कर्म बदलल्याशिवाय योग्य परिणाम देत नाही.
शनी शिस्तप्रिय आहे. तो आपल्याला प्रामाणिक, संयमी, आणि जबाबदार बनवतो. हा काळ आव्हानांबरोबर हा आत्मपरीक्षणाचा असतो.जुन्या चुका सुधारण्याची आणि स्वतःला मजबूत बनवण्याची संधी मिळते. सत्कर्म, मेहनत आणि सकारात्मक दृष्टी असेल तर साडेसाती देखील वरदान ठरते.असं ज्योतिषशास्त्र सांगतं, त्यामुळे साडेसातीला न घाबरता आपलं कर्म चांगलं ठेवावं अशी शिकवण शनीदेव देतात. शनीदेव हे व्हिलन नाही तर कर्माची देवता आहे. त्यामुळे शनीदेवांना न घाबरता आव्हानांना स्विकराता यायला हवं.