हिंदू धर्मानुसार श्रावण महिन्याला धार्मिकदृष्ट्या मोठं महत्व आहे. या दिवसात व्रत वैकल्य आणि देवाच्या नामस्मरण करणं योग्य मानलं जातं. असं म्हटलं जातं की श्रावण हा महिना महादेवांना प्रचंड प्रिय आहे. श्रावणात सणावार सुरु होतात. मांगल्याचं प्रतिक असलेल्या या श्रावणात महिला मंगळागौर खेळतात. श्रावणातच मंगळागौर का केली जाते, यामागे देखील शास्त्र आहे ते जाणून घेऊयात.
मंगळागौर व्रत हे सौभाग्यवती स्त्रियांसाठी असतं. या व्रतात देवी पार्वतीची पूजा केली जाते, जिचे विवाह जीवनात सातत्य आणि आनंद नांदावा यासाठी महत्त्व आहे. यामागे देखील एक आख्यायिका सांगितली जाते. असं म्हणतात की, देवी हिने भगवान शंकरांशई विवाह व्हावा म्हणून तपश्चर्या केली होती. देवी सती ही राजा दक्ष याची कन्या होती. राजाने भर सभेत महादेवांचा अपमान केला त्यावेळी क्रोधीत झालेल्या सतीने अग्नीला समर्पित होत स्वत:ला त्यागलं. तिचा पुनर्जन्म म्हणजे हिमालयाची कन्या देवी पार्वती.
पार्वती महादेवांना प्राप्त करण्यासाठी कठीणातील कठीण आराधना केली. श्रावणातील व्रत वैकल्य तिने सौभाग्यप्राप्तीसाठी केलं. अथक प्रयत्नांनंतर देवी पार्वतीचा विवाह महादेवांशी झाला. त्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया या आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी मंगळागौर पुजताना पार्वीती मातेची पूजा करतात, त्यामुळे श्रावणात या मंगळागौरला मोठं महत्व आहे. मंगळागौर व्रत हे नवविवाहित स्त्रियांनी प्रथम पाच वर्षे करायचे असते. या व्रतामध्ये देवी गौरीची (पार्वतीची) पूजा करून पतीच्या दीर्घायुष्याची, सुख-समृद्धीची प्रार्थना केली जाते.
अध्यात्मिक बाजूप्रमाणेच याशी वैज्ञानिका बाजूदेखील आहे. श्रावण महिना हा पावसाळ्याचा काळ असतो. या काळात शेतीच्या कामांतून थोडीशी उसंत मिळते. त्यामुळे महिलांना कष्टाच्या कामातून थोडी मोकळीक मिळते. त्यामुळे महिलांना वेळ मिळतो आणि समाजात एकत्र येऊन पूजाविधी, गाणी, फुगड्या, ओव्या अशा पारंपरिक उपक्रमात सहभागी होता येते.मंगळागौर म्हणजे नुसती पूजा नाही, तर ती एक सांस्कृतिक पर्वणी आहे.
स्त्रिया फुगड्या, झिम्मा, ओव्या म्हणतात, पारंपरिक गाणी गातात, आणि एकत्र येऊन सामाजिक बंध वाढवतात. अशा प्रकारे आपली संस्कृती जपली जाते. मंगळागौर श्रावण महिन्यातच केली जाते कारण हा महिना धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत शुभ मानला जातो. तो स्त्रियांच्या सौभाग्यासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सांस्कृतिक ऐक्य जपण्यासाठी अतिशय योग्य वेळ मानला जातो.