राधा कृष्णाच्या प्रेमाचा अलौकीक सोहळा, "असा' अर्थ आहे रंगपंचमी सणाचा
होळीच्या दुसऱ्या दिवशी देशभरात धुळवड खेळली जाते. मात्र उत्तर भारतात रंगपंचमी वेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. रंगपंचमी म्हणजे कृष्णपक्ष पंचमी जी होलिका दहनानंतर पाच दिवसांनी येते. रंगपंचमी आणि राधा कृष्णाच्या प्रेमाचा संदर्भ मुख्यतः हिंदू धर्म पुराणांत आणि ग्रंथांत मिळतो. राधा कृष्णाच्या प्रेमाची विविध गाथा, कथा आणि उपदेश भागवत ग्रंथ, ब्रम्हवैवर्त्यपुराण आणि गर्गसंहिता यात प्रामुख्याने आढळून येतात. मात्र रंगपंचमीच्या संदर्भात विशेषतः “भागवतम्” या ग्रंथात आणि “वृषभानु विजय” किंवा “राधा कृष्ण लीला” या गाथांमध्ये प्रेमाचा विशेष उल्लेख आहे.
श्रीमद्भागवतम्: हा ग्रंथ कृष्णाच्या जीवनाची कथा सांगतो. तसंच राधा आणि कृष्णाच्या प्रेमाचे महत्त्व देखील अधोरेखीत करतो. भागवत पुराणामध्ये कृष्णाच्या गोकुळमधील रासलीला, त्याची गोपिका आणि राधेशी असलेले स्नेह याचे वर्णन यात केले आहे.
राधा कृष्ण लीला ग्रंथ: या ग्रंथात राधा आणि कृष्णाच्या प्रेमाचा आणि होळी व रंगपंचमीबाबत विस्तृत उल्लेख केला आहे. होळी आणि रंगपंचमीचा कृष्ण आणि राधाच्या प्रेमाशी गहिरा संबंध आहे असंं सांगितलं जातं.
रंगपंचमी होळीच्या पाच दिवसांनी येणारी पंचमी. हा सण राधा कृष्णाच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून रंगपंचमी असा देखील अर्थ सांगितला जातो. हा सण मुख्यतः राधा कृष्णाच्या रासलीला आणि त्यांचं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत असंही सांगितलं जातं . रंगपंचमीला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे, त्याचबरोबर राधा कृष्णाचा उत्सव देखील आहे.
प्रेम आणि रंगांची उधळण
राधा कृष्णाच्या प्रेमाचं नातं या सणाच्या निमित्ताने रंगांच्या माध्यमातून प्रकट केलंं जातं. हिंदू पुराणात असं सांगितले आहे की, कृष्ण गोकुळात आपल्या गोपिकांसोबत रंग खेळायचा. रंग हे निमित्त होतं. या खेळाच्या निमित्ताने कृष्ण राधेवर त्याच्या प्रेमाच्या रंगांची उधळण करायचा. रंगपंचमीचा सण म्हणजे प्रेमाच्या विविध रंगांची उधळण, असा देखील दृष्टीकोन सांगितला जातो.
रंग आणि आध्यात्मिक उन्नती
होळीच्या सणाला रंग उधळले जातात. त्यामागे एक शास्त्र देखील सांगितलेलं आहे. रंग हे जीवनातील विविध भावनांचे, विचारांचे आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक मानले जातात. राधा कृष्णाच्या प्रेमाच्या रंगाने वैष्णव रंगून जातात.
निस्वार्थ प्रेम
राधा कृष्णाच्या प्रेमात निस्वार्थ आणि त्याग आहे. आपल्या प्रेमाच्या व्यक्तीवर आपलं किती मनापासून प्रेम आहे हे व्यक्त करण्यासाठी रंग एकमेकांना रंग लावले जातात. विश्वास, सहवास ,विरह, समर्पण आणि त्याग हे देखील प्रेमाचे विविध रंग आहेत असं म्हटलं जातं.
आध्यात्मिक पुनर्निर्माण
रंगपंचमी किंवा होळीच्या सण हा प्रेम, उत्साह आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. जीवनातील दु:ख, चिंता आणि वाईट विचारांना मागे सारुन नवीन आशा आणि प्रेमाची नव्याने सुरुवात करण्यासाठी रंग खेळले जातात. रंगपंचमीचा सण हा आध्यात्मिक आणि राधा कृष्णाच्या प्रेमाचा उत्सव आहे. या दिवशी वैष्णव कृष्ण आणि राधेच्या प्रेमाच्या प्रेमात रंगून जातात. म्हणून या रंगपंचमीला राधाकृष्ण यांच्या प्रेमाचा अलौकीक सोहळा देखील म्हटलं जातं.