kali jogeshwari devi mandir in pune information
पुण्यातील ऐतिहासिक आणि नावाजलेल्या देवीच्या मंदिरांपैकी एक मंदिर म्हणजे काळी जोगेश्वरी. पुणे शहारामध्ये भवानी मातेचे रुप असलेल्या जोगेश्वरीची तीन मंदिर आहे. त्यातील एक ही पुण्याची ग्रामदेवी श्री तांबडी जोगेश्वरी आहे. तर दुसरी इच्छुक वधु वरांचे हात पिवळे करणारी श्री पिवळी जोगेश्वरी देवी आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये श्री काळी जोगेश्वरी आहे. दोनशे वर्षांपूर्वीची ही देवी भक्तांच्या हाकेला धावून येते अशी भाविकांची श्रद्धा आहे.
बुधवार पेठेतील प्रसिद्ध दत्त मंदिराजवळ श्री काळी जोगेश्वरी देवीचे मंदिर आहे. देवीचे मंदिर छोटेखानी असले तरी नवरात्रामध्ये मोठ्या संख्येने भाविक दर्शनसाठी येत असतात. पुण्यातील जोगेश्वरी आणि काळभैरव यांचे एकत्रित मंदिर असलेले हे पुण्यातील एकमेव मंदिर आहे. देवीची मूर्ती काळी असल्यामुळे या देवीला काळी जोगेश्वरी म्हटलं जातं. त्याचबरोबर पूर्वी लाल महालच्या पुढील भागाला काळं वावर म्हणून ओळखलं जायचं, त्यामुळे देखील या देवीला काळी जोगेश्वरी म्हटले जाते. विशेष बाब म्हणजे काळी जोगेश्वरी देवी ही त्रिनेत्री आहे. तिच्या कपाळावर तिसरा डोळा आहे. मात्र तो शंकराप्रमाणे उभा नाही तर आडवा आहे.
काळी जोगेश्वरी देवीचे मंदिर अगदी 200 वर्षांपूर्वीचे आहे. या देवीचा उल्लेख पेशव्यांच्या दफ्तारामध्ये देखील आढळतो. असे हे काळी जोगेश्वरी देवीचे मंदिर पुरातन आहे. मंदिराला सभागृह आणि गाभारा अशी रचना आहे. सभागृह लाकजी असून नक्षीकाम केलेले आहे. या मंदिरामध्ये शंकर महाराज आणि स्वामी समर्थ महाराज येऊन गेले असल्याचे म्हटले जाते. भिडे कुटुंबाकडून काळी जोगेश्वरी देवीची व्यवस्था आणि सेवा केली जाते. 1902 साली या मंदिराची मालकी ही सरदार रास्ते यांच्याकडून भिडे कुटुंबाकडे आली.
काळी जोगेश्वरी मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर अगदी समोरच देवीची मूर्ती दिसते. ही मूर्ती आपल्या डोळ्यांनी लक्ष वेधून घेतले. देवीचे मोठे डोळे लक्षवेधी आहेत. पण त्याचबरोबर देवीला तीन डोळे आहे. एक डोळा मळवटावर आडवा आहे. काळी जोगेश्वरी देवीची ही मूर्ती अडीच ते तीन फुट आहे. काळ्या पाषाणामध्ये असलेली जोगेश्वरी देवीची मूर्ती चतुर्भूज आणि आसनावर बसलेली आहे. देवीच्या मूर्तीच्या एका हातामध्ये चक्र, दुसऱ्या हातामध्ये पद्म, तिसऱ्या हातामध्ये शंख तर चौथ्या हाताने देवी आशिर्वाद देत आहे. यापूर्वी देवीची वेगळी मूर्ती होती. मात्र ती मूर्ती भंग पावल्यामुळे 1955 साली काळी जोगेश्वरी देवीची दुसरी हुबेहुब मूर्ती बनवून घेण्यात आली. ही मूर्ती जयपूरवरुन खास घडवून आणण्यात आली आहे. श्री काळी जोगेश्वरी मंदिरामध्ये देवीबरोबरच काळभैरव, शिवलिंग आणि गणरायाची मूर्ती आहे. पुण्यातील या काळी जोगेश्वरी मंदिरामध्ये नवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी होते.
प्रिती माने