कौटुंबिक समस्या आत्महत्याचे सर्वात मोठे कारण
आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस जगभरात साजरा केला जात आहे. या दिनाचा उद्देश आत्महत्येशी संबंधित समज मोडून काढणे आणि जागरूकता वाढवणे हा यामागचा उद्देश आहे. दरवर्षी लाखो लोकांना मानसिक तणाव, सामाजिक दबाव आणि वैयक्तिक आव्हानांमुळे आत्महत्या करतात. त्यामुळे यंदाची या दिनाची थीम आहे, कथन बदला, म्हणजेच आत्महत्येबद्दलची लोकांची विचारसरणी बदलण्याची गरज आहे.
या थीमचा उद्देश आत्महत्येशी संबंधित असलेले गैरसमज मोडून काढणे, जागरूकता वाढवणे तसेच आत्महत्या रोखता येतील असे वातावरण निर्माण करणे हा आहे. या संदर्भात राज्य कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम यांनी सर्व जिल्ह्यांना या दिवशी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचे पत्र दिले आहे.
धक्कादायक आकडेवारी
पण याबाबत नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोचा एक धक्कादायक रिपोर्टसमोर आला आहे. रिपोर्टनुसार अपघाती मृत्यू आणि आत्महत्या अहवाल-2022 नुसार, भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात आत्महत्याचे प्रमाण जास्त आहे. उत्तर प्रदेशात 3.5 आत्महत्येचे प्रमाण असून राज्यात 2022 मध्ये एकूण 8,176 आत्महत्या झाल्या, त्यापैकी 5225 पुरुषांच्या, तर 2951 महिलांच्या होत्या. सर्वाधिक आत्महत्या करणाऱ्यांमध्ये विशेषत: 1631 गृहीणांचा समोवेश आहे. तसेच विवाहित जोडप्यांमध्ये ही संख्या 5162 तर बेरोजगारांच्या यादीत 1521 आणि 1060 विद्यार्थी आत्महत्येला बळी पडले आहेत. रिपोर्टनुसार, असे दिसून आले आहे की, आत्महत्यांमागे सामाजिक व मानसिक दबाव, कौटुंबिक समस्या आणि आर्थिक ताण ही प्रमुख कारणे आहेत.
या पाच राज्यांमध्ये सर्वाधिक आत्महत्या
आत्महत्येचे सर्वाधिक प्रमाण देशांतील या पाच राज्यांमध्ये वाढले आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या रिपोर्टनुसार महाराष्ट्रातील आत्महत्येचे प्रमाण 22,746 जी देशातील सर्वाधिक संख्या आहे. तसेच तामिळनाडूमध्ये ही संख्या 19834, मध्य प्रदेशात 15386, तर कर्नाटकात 13606, आणि बंगालमध्ये 12669 आत्महत्यांची नोंद झाली आहे. देशातील एकूण आत्महत्यांपैकी 49.3 टक्के आत्महत्या या पाच राज्यांमध्ये नोंदवल्या गेल्या आहेत.
तज्ञांचे मत
KGMU मानसिक आरोग्य तज्ञ डॉ आदर्श त्रिपाठी यांच्या म्हणण्यानुसार, लोक रागातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामागची कारणो सांगताना ते म्हणाले की, कौटुंबिक कलह, भांडण, ब्रेकअप ही आत्महत्येमागची महत्वाची कारणे आहेत. त्यांनी सांगितले की, जर एखादी व्यक्ती नाराज असेल तर त्याचे ऐका, त्या व्यक्तीचे लक्ष दुसरीकडे विचलित करण्याचा प्रयत्न करा. असे झाल्यास त्याच्या मनात आत्महत्येचा विचार येणार नाही. त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा तसेच त्याला सांगा की, आम्हाला त्याची परिस्थिती समजते. यामुळे त्या व्यक्तीचा तणाव दूर होण्यास मदत होईल.
आत्महत्येशी संबंधित समस्यांपैकी सामाजिक दबाव आणि कौटुंबिक दबाव हे सर्वात महत्त्वाचे असल्याचे डॉ. त्रिपाठी स्पष्ट करतात. तर मानसिक आजारांमुळे सुमारे 30 टक्के आत्महत्या होतात, जसे की नैराश्य, चिंता, मनोविकार, औषध-संबंधित रोग, जे आत्महत्येच्या वर्तनाला प्रोत्साहन देतात. अशा स्थितीत मानसिक आजार ओळखणे आणि वेळेवर उपचार मिळणे हादेखील आत्महत्येच्या बाबतीत महत्त्वाचा टप्पा आहे.