फोटो सौजन्य - Social Media
ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिक आणि सामाजिक कल्याणासाठी काम करणारी मुंबईतील स्वयंसेवी संस्था, अधाता ट्रस्टने टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५ मध्ये सिनियर सिटीझन रनचे इन्स्टिट्यूशनल पार्टनर म्हणून यशस्वीपणे हातमिळवणी केली. रविवारी १९ जानेवारी २०२५ रोजी पार पडलेल्या या रनमध्ये १८०० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी भाग घेऊन ‘Change Began Here #HarDilMumbai’ थीमसोबत वृद्धावस्थेमध्ये सक्रियता आणि लवचिकतेचा आनंद साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेरून झाली, ज्यामध्ये शहरभरातील ज्येष्ठ नागरिक आयुष्य, जीवन शक्ती आणि सामुदायिकतेच्या भावनेचा आनंद साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. त्यांच्यामध्ये एक ९५ वर्षांचे आणि एक ९१ वर्षांचे व्यक्ती देखील होते, त्यांनी आपल्या ऊर्जेचे प्रदर्शन करून सर्वांना प्रेरित केले. त्यांनी सिद्ध करून दाखवले की, सक्रिय राहण्यासाठी आणि आयुष्य पूर्णपणे जगण्यासाठी वयाची कोणतीच मर्यादा नसते. अनेक ज्येष्ठांनी गुडघे, सांध्यांची दुखणी, मनोभ्रंश, चालण्यासाठी सहायक उपकरणांची आवश्यकता यासारख्या आव्हानांचा मुकाबला करत धाव पूर्ण केली, त्यांचा दृढ संकल्प ज्येष्ठ नागरिकांच्या लवचिकतेचे आणि निश्चयी स्वभावाचे प्रमाण बनला.
या उपक्रमाबाबत बोलताना, अधाता ट्रस्टचे संस्थापक श्री अरुण नंदा यांनी सांगितले, “सिनियर सिटीझन रन हा केवळ एक उपक्रम नाही तर आपल्या ज्येष्ठ नागरिकांचे जीवन, शक्ती आणि सकारात्मक वृद्धत्वाचा सोहळा आहे. हा उपक्रम मजबूत मेंदूची ताकत आणि पुढे जात राहण्याची लवचिकता दर्शवतो. अधाता ट्रस्टमध्ये आम्ही असे मानतो की, ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय, व्यग्र आणि प्रेरित राहण्याच्या संधी मिळाल्या पाहिजेत. जीवनाप्रती त्यांचा उत्साह आणि जोश आम्हाला ज्येष्ठांना अधिक सशक्त आणि प्रगत करण्याचे प्रयत्न सुरु ठेवण्यासाठी प्रेरित करतो.”
अधाता ट्रस्टने टाटा मुंबई मॅरेथॉनसोबत भागीदारी करून सकारात्मक वृद्धत्वाला प्रोत्साहन देण्याची आणि ज्येष्ठ समुदायाला सशक्त बनवण्याची त्यांची वचनबद्धता अधोरेखित केली आहे. त्या रनमुळे ज्येष्ठ नागरिकांना प्रेरित करण्यासाठी आणि प्रेरित होण्यासाठी एक मंच उपलब्ध झाला, ज्यामुळे त्यांच्यामध्ये आपुलकी व जीवन शक्तीच्या भावनेला प्रोत्साहन मिळाले आहे.
सध्या अधाता ट्रस्ट मुंबई, नवी मुंबई, ठाणे (लवकरच पनवेलमध्ये) येथील १५ कम्युनिटी सेंटर्समध्ये ५०० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक सदस्यांना मदत करतो. सिनियर सिटीझन रनसारखे उपक्रम आणि वर्ल्ड एल्डर्स डे यासारख्या वार्षिक कार्यक्रमांच्या माध्यमातून अधाता ट्रस्ट ज्येष्ठांसमोर येणाऱ्या आव्हानांविषयी जागरूकता वाढवतो, त्यांना आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वास मिळवण्याच्या संधी प्रदान करतो. हा ट्रस्ट सर्वांना सामावून घेणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करून आणि कुटुंबीय व मित्रांना ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानामध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी प्रोत्साहित करून एक पोषक वातावरण देखील निर्माण करतो. सिनियर सिटीझन रन २०२५चे यश ज्येष्ठ नागरिकांच्या दृढ निश्चयाचे आणि त्यांचे कल्याण व समाजाच्या सशक्तीकरणासाठी अधाता ट्रस्टच्या समर्पणाचे प्रमाण आहे.