

८८ धावांची खेळी अन् ऐतिहासिक विक्रम
धोनी-मोरे यांच्या खास यादीत जुरेलचा समावेश
न्यूझीलंडमध्ये अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय
Dhruv Jurel: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील दुसरा सामना आणि अंतिम कसोटी सामना क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हलवर खेळला जात आहे. भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात एकावेळी ११७ धावांत ७ विकेट्स गमावले होते. तिथून ध्रुव जुरेलने, खालच्या फळीतील फलंदाजांसोबत मिळून, केवळ डाव सावरला नाही, तर संघाला २४६ धावांच्या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली.
त्याच्या या खेळीमुळे भारताचे फॉलोऑनचे संकट टळले. जुरेलचे परदेशातील पहिले कसोटी शतक केवळ १२ धावांनी हुकले असले तरी, जुरेलने एम.एस. धोनी आणि किरण मोरे यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत आपले स्थान निश्चित केले आहे.
विकेटकीपर-फलंदाज ध्रुव जुरेलने न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये धावांचे योगदान दिले. जुरेलने वेलिंग्टन कसोटीत ७८ धावा केल्या. तर क्राइस्टचर्च कसोटीत त्याने भारताच्या पहिल्या डावात ८८ धावांची महत्वपूर्ण खेळी करत डाव सावरला. या खेळीसह, २५ वर्षीय ध्रुव जुरेलने भारताचा माजी कर्णधार एम.एस. धोनीच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे.
न्यूझीलंडच्या भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये सातव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना दोन किंवा अधिक ५०-पेक्षा जास्त धावा करणारा जुरेल आता तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी केवळ एम.एस. धोनी आणि किरण मोरे यांनीच ही कामगिरी केली होती.
न्यूझीलंडमध्ये सातव्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना ५० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत अजिंक्य रहाणे, हरभजन सिंग, झहीर खान, जवागल श्रीनाथ, अतुल वासन, सय्यद किरमानी, मोहिंदर अमरनाथ आणि चंदू बोर्डे यांचा समावेश आहे.
न्यूझीलंडमध्ये सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक झळकावणारा अजिंक्य रहाणे हा एकमेव भारतीय आहे. फेब्रुवारी २०१४ मध्ये वेलिंग्टन कसोटीदरम्यान रहाणेने १५८ चेंडूंमध्ये ११८ धावांची संस्मरणीय खेळी केली होती.