

गतविजेता भारत पुन्हा मैदानात उतरणार
अंडर-१९ महिला आशिया कपसाठी संघ जाहीर
भाविका अहिरेला मिळाली कर्णधारपदाची संधी
U19 Women's Asia Cup 2027: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एसीसी अंडर-१९ महिला आशिया कप २०२७ साठी (ACC U19 Women's Asia Cup) भारतीय संघाची घोषणा केली आहे. महिला निवड समितीने युएईमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची निवड केली आहे.
विकेटकीपर-फलंदाज भाविका अहिरे हिची संघाची कर्णधार म्हणून, तर अनादी तागडे हिची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. भारत गतविजेता म्हणून या स्पर्धेत उतरेल आणि सलग दुसरे विजेतेपद पटकावण्याचे ध्येय असेल. पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषक २०२७ च्या तयारीसाठीही ही स्पर्धा भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
महिला निवड समितीने २०२७ च्या अंडर-१९ महिला आशिया कपसाठी भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंचा समावेश केला आहे. १८ वर्षीय भाविका अहिरेला कर्णधार, तर अनादी तागडेला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. भाविकाच्या नेतृत्वाखालील संघात इरा जाधव, निधी महतो, उमा काशवी, पूर्वा सिवाच, मेहक नरवासे, मैत्री मणियार, ईश्वरी अवसार आणि दिया यादव या खेळाडूंचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त, श्रेया एस. चव्हाण, समायरा राघव, कुमारी पलक, अक्षया परमार आणि पलक सिंग यांनाही संधी मिळाली आहे. संघातील अनेक खेळाडू सध्या इंग्लंडच्या १९ वर्षांखालील महिला संघाविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत खेळत आहेत. भारतीय संघाने या मालिकेत शानदार कामगिरी करत सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून २-० अशी आघाडी घेतली आहे.
भारतीय संघ गतविजेता म्हणून १९ वर्षांखालील महिला आशिया कप २०२७ मध्ये सहभागी होईल. २०२४ मध्ये झालेल्या १९ वर्षांखालील महिला आशिया कपच्या पहिल्याच हंगामात, निकी प्रसादच्या नेतृत्वाखाली भारताने उत्कृष्ट कामगिरी केली होती. अंतिम सामन्यात बांग्लादेशला पराभूत करून संघाने विजेतेपद पटकावले होते. आता, भाविका अहिरेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आपले विजेतेपद टिकवण्याचा प्रयत्न करेल. याव्यतिरिक्त, भारताने २०२३ मध्ये आयसीसी १९ वर्षांखालील महिला टी२० विश्वचषक जिंकला होता.
भाविका अहिरे (कर्णधार), इरा जाधव, निधी महातो, पूर्वा सिवाच, मेहक नरवसे, मैत्री मणियार, ईश्वरी अवसरे, दिया यादव, श्रेया एस चव्हाण (विकेटकीपर), समायरा राघव, कुमारी पलक, उमा काशवी, अक्षत परमार, अनादि तागडे, पलक सिंग.