

हॅगली ओव्हलची खेळपट्टी कोणाला देणार साथ?
सुरुवातीला स्विंग अन् नंतर फलंदाजांचा जलवा?
कशी असेल दुसऱ्या टेस्टची खेळपट्टी?
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना २७ नोव्हेंबरपासून खेळला जाईल. हा सामना क्राइस्टचर्च येथील हॅगले ओव्हल येथील स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार शुक्रवारी पहाटे ३:३० वाजता सामन्याला सुरुवात होईल. सामन्यासाठी आता फक्त काही तास शिल्लक आहेत. दोन्ही संघ दुसऱ्या कसोटीसाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत.
मालिकेतील पहिला सामना ड्रॉ राहिला होता. त्यामुळे जो संघ दुसरा सामना जिंकेल तो १-० ने मालिका जिंकेल. याशिवाय, आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही संघाना आघाडी मिळू शकते . परंतु, या सामन्यात खेळपट्टी महत्वाची भूमिका बजावेल. या सामन्यात कशी असेल हॅगली ओव्हल मैदानाची खेळपट्टी, जाणून घेऊयात.
क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हलची खेळपट्टी भारतीय फलंदाजासाठी डोकेदुखी ठरु शकते. या खेळपट्टीला जगातील सर्वात बाउन्स असणारी खेळपट्टी मानली जाते. इस्टचर्चच्या हॅगली ओव्हलचा इतिहास पाहता, सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना फायदा मिळू शकतो. त्यामुळे पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व असू शकते. परंतु जसजशी खेळपट्टी जुनी होते, तसतशी फलंदाजी सोपी होऊ शकते. उद्याच्या सामन्यातही खेळपट्टीचा अंदाज असाच राहण्याची शक्यता आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या डावाच्या तुलनेत तिसऱ्या आणि चौथ्या डावात फलंदाजी आणखी सोपी होऊ शकते. हॅगली ओव्हलवर खेळल्या गेलेल्या १५ कसोटी सामन्यांपैकी ९ सामन्यांमध्ये लक्ष्याचा यशस्वी पाठलाग झाला आहे. त्यामुळे, नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
गेल्या काही दिवसांपासून येथे पाऊस पडत आहे, त्यामुळे खेळपट्टीमध्ये थोडा ओलावा असू शकतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हलका पाऊस पडत असला तरी, पुढील पाच दिवसांसाठी मोठ्या पावसाचा कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ६६ कसोटी सामने खेळले गेले असून, त्यापैकी भारताने २२ सामने जिंकले आहेत. तर, न्यूझीलंडने १६ वेळा विजय मिळवला आहे. याशिवाय, २८ सामने ड्रॉ राहिले आहेत
भारताची संभाव्य प्लेइंग ११: यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, अंशुल कंबोज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह , प्रसिद्ध कृष्णा
न्यूझीलंडचा संभाव्य प्लेइंग ११: टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हन कॉनवे, हेन्री निकोल्स, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, नॅथन स्मिथ, काईल जेमिसन, मॅट हेन्री, जेकब डफी