IND Vs ZIM : शेफाली-स्मृतीचा धुमधडाका! झिम्बाब्वेला लोळवत भारताने जिंकली मालिका, सौजन्य : सोशल मीडिया
IND Vs ZIM : रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह इंटरनॅशन स्टेडियम येथे पार पडलेल्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने 9 विकेट्सने विजय मिळवत सामन्यासह मालिका आपल्या खिशात घातली. झिम्बॉब्वेने प्रथम फलंदाजी करत 8 बाद 103 धावांचे तुल्यबळ आव्हान भारतासमोर दिले होते.
या धावांचा पाठलाग करताना मागील सामन्यात सपशेल फेल ठरलेल्या पहिल्या फळीने यंदा मात्र त्याचा वचपा काढला व 11 ओव्हर्स शिल्लक राखत दुसरा सामना तर जिंकलाच, तसेच मालिकाही आपल्या नावे केली. या सामन्यात सलामीला आलेल्या शेफाली वर्मा व कर्णधार स्मृती मंधानाने चौकार व षटकारांचा अक्षरशः पाऊसच पाडला.
झिम्बॉब्वेने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना शेफाली वर्मा व कर्णधार स्मृती मंधानाने चौकार व षटकार ठोकण्यास सुरुवात केली. चौथ्या ओव्हर्सपर्यंत शेफालीने दोन वेळा चेंडू सीमारेषेच्या पारही पोहचवला होता. या दोघींचा आक्रमकपणा पाहता, झिम्बॉब्वेच्या गोलंदाजांसह क्षेत्ररक्षक दबावात आले.
दरम्यान, पाचव्याच ओव्हर्समध्ये भारताने धावांचे अर्धशतक गाठले होते. शेफालीने 6 चौकार व 4 षटकारांसह 55 धावा केल्या, तर स्मृतीने 6 चौकार व 2 षटकारासह नाबाद 47 धावांनी तिला चांगली साथ दिली.
भारताने अशाप्रकारे 67 बॉल शिल्लक राखत हा सामना जिंकला. आता मालिकेतील पुढील सामना मंगळवार 20 ऑक्टोबरला याच रायपूरच्या स्टेडियममध्ये होणार आहे.
टीम इंडियाचा फिनिशर रणजीतही चमकला! आधी बिहार, आता गोव्याविरुद्ध Rinku Singh ने ठोकलं खणखणीत शतक
झिम्बॉब्वेने पहिल्या सामन्यात सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली होती. दुसऱ्या सामन्यात टॉस जिंकून त्यांनी तशीच काहीशी कामगिरी करण्याच्या हेतूने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण मागील सामन्यात 42 धावांची कामगिरी करणारी केलीस एनधलोवू या सामन्यात भोपळाही फोडू शकली नाही. नंदनी शर्माने त्रिफळाचीत करत चौथ्याच षटकात झिम्बॉब्वेला जबर धक्का दिला.
त्याच्या दोन ओव्हर्सनंतर दीप्ति शर्माने बिलव्हड बिझा (7) हरमनप्रीत कौरकरवी झेलबाद करत तिलाही पॉव्हेलियनचा रस्ता दाखवला. तसेच पहिल्या सामन्यात 43 धावा करणारी शेरन मेयर्स या सामन्यात फक्त 9 धावांचे योगदान देऊ शकली. क्रांती गौडची ती शिकार ठरली. मधल्या काळात चिपो मुग्री टिरीपानो व कर्णधार जोसेफिन कोमो (नाबाद 27) यांनी चौथ्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला.
या भागीदारीमुळेच झिम्बॉब्वे शंभर धावापर्यंत मजल मारू शकली. दरम्यान, निकी प्रसादने यष्टीमागे रिचा घोषकरवी चिपोला बाद केले. चिपोने 5 चौकारासह 34 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या न्यासा ग्वान्झुरूला निकीने त्रिफळाचीत करत तिला आपले खातेही खोलू दिले नाही. भारताकडून निकीने 2 ओव्हर्समध्ये 7 धावा देत 2 गडी बाद केले.






