Amit Mishra
Amit Mishra: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२७ हंगामापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. दिल्ली फ्रँचायझीने भारताचे माजी लेग स्पिनर अमित मिश्रा यांची नवीन फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. फ्रँचायझीने मंगळवार २१ ऑक्टोबर, रोजी ही अधिकृत घोषणा केली. ४३ वर्षीय मिश्रा यांनी गेल्या वर्षी ४ सप्टेंबर रोजी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली होती. मिश्रा हे आयपीएलमध्ये डीसीसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज आहेत. आता ते आगामी हंगामात संघाच्या फिरकी गोलंदाजी विभागात काम करतील. मिश्रा यांच्या नियुक्तीनंतर, दिल्लीने आयपीएल २०२७ हंगामापूर्वी आपल्या कोटिंग स्टाफमध्ये पूर्णपणे बदल केला आहे. (Amit Mishra Appointed As Delhi capital Spin Coach)
दिल्ली कॅपिटल्सने २०२७ च्या आयपीएल हंगामासाठी अनुभवी भारतीय फिरकी गोलंदाज अमित मिश्रा यांची नवीन फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. मिश्रा यांनी आपल्या आयपीएल कारकिर्दीतील बहुतांश काळ दिल्ली कॅपिटल्सकडूनच खेळला असून, दोन वेगवेगळ्या कार्यकाळात एकूण १० हंगामांमध्ये ते संघाचा भाग राहिले आहेत. त्यांनी आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात दिल्ली कॅपिटल्समधूनच केली होती. एक खेळाडू म्हणून संघाच्या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिल्यानंतर, ते आता दिल्ली फ्रँचायझीमध्ये फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून पुन्हा सामील झाले आहेत.
दिल्लीने नुकतेच भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सौरव गांगुली यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. त्यांनी हेमांग बदानी यांची जागा घेतली आहे. या फ्रँचायझीने भारताचे दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यांची फलंदाजी आणि सहाय्यक प्रशिक्षकपदी, तर श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज चमिंडा वास याची वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. या नवीन प्रशिक्षक चमूसह, दिल्ली आगामी हंगामात आपले पहिले आयपीएल विजेतेपद पटकावण्याचे ध्येय ठेवेल.
आयपीएलच्या इतिहासात तीन हॅट-ट्रिक घेणारा अमित मिश्रा हा एकमेव गोलंदाज आहे. त्याने २००८ साली, आयपीएलच्या पहिल्या हंगामात, डेक्कन चार्जर्सविरुद्ध १७ धावांत ५ विकेट्स घेत आपली पहिली हॅट-ट्रिक घेतली. त्यानंतर मिश्राने २०११ आणि २०१३ मध्ये हॅट-ट्रिक घेऊन आपल्या गोलंदाजीतील कौशल्य सिद्ध केले. २००८ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या मिश्राने आपल्या आयपीएल कारकिर्दीत १६२ सामने खेळले आणि ७.३७ च्या इकॉनॉमी रेटने १७४ विकेट्स घेतले. डीसी व्यतिरिक्त, तो आपल्या आयपीएल कारकिर्दीत डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स या संघांकडूनही खेळला आहे.
अमित मिश्रा आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी १०० पेक्षा जास्त विकेट्स घेणारा एकमेव गोलंदाज आहे.मिश्राने दिल्लीसाठी १०३ टी-२० सामन्यांमध्ये एकूण ११० विकेट्स घेतले आहेत. या कालावधीतील त्याची सर्वोत्तम कामगिरी १७ धावांत ५ विकेट्स ही होती. दिल्लीसाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत मिश्रा अव्वल स्थानी आहे, तर अक्षर पटेल ७८ विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे.






