स्मार्ट छत्री
नुकताच पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूत सर्वात जास्त आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज भासत असेल तर ती म्हणजे छत्री. पावसाळा सुरु होताच अनेकांची छत्री घेण्याची तयारी सुरु होते. मात्र तुम्हाला माहित आहे का? आता बाजारात अशी तशी छत्री नाही तर एक नवीन स्मार्ट छत्री लवकरच लाँच होणार आहे. Xiaomi कंपनीने आपली नवीनतम स्मार्ट छत्री क्राऊडफंडिंग प्लॅटफॉर्म Xiaomi Youpin वर आणली आहे.
काही काळानंतर ही छत्री क्राऊडफंडिंग जमा करेल आणि त्यानंतर ही छत्री लाँच करण्यात येईल. क्राऊडफंडिंग सुरु असल्याकारणाने या छत्रीची किंमत सवलतीत ठेवण्यात आली आहे. मात्र एकदा का ही स्मार्ट छत्री लाँच झाली की तिची किंमत वाढवण्यात येईल.
Xiaomi ने स्मार्ट फीचर्ससह नवीन छत्री आणली आहे. Xiaomi ने Risetime सह एकत्र येत ही स्मार्ट छत्री Youpin या क्राऊडफंडिंग प्लॅटफॉर्मवर लिस्ट केली आहे. या छत्रीची एकूण किंमत 129 युआन म्हणजेच 1500 रुपये इतकी असणार आहे. मात्र लाँच नंतर या छत्रीची किंमत निश्चितच वाढेल. ही किंमत नक्की किती वाढेल? हे अद्याप कंपनीने स्पष्ट केले नाही. कंपनीचा दावा आहे की, ही छत्री चार्ज केल्यानंतर 150 वेळा उघडता आणि बंद करता येऊ शकते.