भारतातील 'या' ठिकाणी आहे मानवाच्या हाडांची भरलेला तलाव
असे म्हणतात की, आपले जग अनेक सुंदर गोष्टींनी भरलेले आहे. मात्र या जगात अशाही काही विचित्र गोष्टी आहेत ज्या पाहून अनेकांना आश्चर्यचा धक्का बसेल. यातील काही गोष्टी खऱ्या असतात तर काही खोट्यादेखील असू शकतात. भारतातही अनेक रहस्यमयी ठिकाणांचे वास्तव आहे. या रहस्यांचा उलगडा केल्यास अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतात.
भारतात अनेक रहस्यमयी गोष्टी आहेत ज्यांचे ठोस पुरावे आजवर शास्त्रज्ञांनाही मिळाले नाहीत. यातीलच एक आहे 1000 वर्षे जुना तलाव. याची खासियत म्हणजे, हा तलाव साधासुधा तलाव नाही तर यात 1000 वर्षांपूर्वीच्या लोकांची हाडे ठेवण्यात आले आहेत. हे ठिकाण उत्तराखंड राज्यात आहे. हे एक सरोवर आहे ज्याला लेक ऑफ स्केलेटन (Lake of Skeleton) म्हणतात, कारण त्यात अनेक सांगाडे सापडले आहेत.
उत्तराखंडचे रुपखंड फार प्रसिद्ध आहे. हे समुद्रसपाटीपासून 16,500 फूट उंचीवर आहे आणि याला लेक ऑफ स्केलेटन असे नाव देण्यात आले आहे. हा तलाव वर्षभर गोठलेला असला तरी बदलत्या ऋतूनुसार तो लहान-मोठा होत असतो. उन्हळ्याच्या दिवसात बर्फ वितळण्यास सुरुवात होते. याच वेळी येथील सांगाडे दिसू लागतात. हिवाळ्यात मात्र त्याजागी बर्फ इतका गोठतो की येथील सांगाडे दिसेनासे होतात.
हेदेखील वाचा – आईस्क्रीममधील मानवी बोटानंतर आता चॉकलेटमध्ये बनावटी दात आढळून आले, धक्कादायक घटनेचा Video Viral
एका अहवालानुसार, आतापर्यंत या जागी 600-800 आसपास सांगाडे सापडले आहेत. यांना बर्फातच गाडले गेल्याने यातील अनेकांच्या अंगावर मांस आहे. येथील सरकार अनेकदा या तलावाचे वर्णन रहस्यमय तलाव असे करते कारण लोकांना याबद्दल फारशी माहिती नसते. एका वृत्तानुसार, 1942 मध्ये ब्रिटीश रेंजर्सना त्याजागी पहिल्यांदा सांगाडा दिसला होता. तेव्हापासून या सांगाड्यांचा आकडा वाढतच आहे आणि चक्र सुरूच आहे.
येथे सापडलेल्या सांगाड्यांविषयी अनेक अफवा आणि कथा प्रसिद्ध आहेत, मात्र यातील खरे काय आणि खोटे काय हे कोणालाही ठाऊक नाही. लोकांच्या मते, 2004 साली शास्त्रज्ञांनी कार्बन डेटिंगवरून शोधून काढले की, ही हाडे 1000 वर्षांपेक्षा जास्त जुन्या लोकांची आहेत. याशिवाय यातील काही हाडे 100 वर्षे जुनी आहेत. याबाबत असाही दावा करण्यात आला आहे की, ही सर्व हाडे एकाच वेळी मरण पावली नाहीत. इडाओइन हार्नी नावाच्या शास्त्रज्ञाने सांगितले की, सर्व मृत्यू एका अपघातामुळे झाले आहेत. काही लोक तर असाही दावा करतात की, हे सांगाडे भारत-चीन युद्धात मरण पावलेल्या चिनी सैनिकांचे सांगाडे आहेत, मात्र यामागचे संपूर्ण सत्य आजवर कोणालाही समजू शकले नाही.