myra waikul
लहान वयातच सर्वात जास्त फॅन फॉलोईंग असणारी चिमुरडी मायरा वायकुळ (Myra Vaikul) आता जाहिरात क्षेत्रात पदार्पण करत आहे, तीही मेन्स वेअरच्या जाहिरातीद्वारे. तेजश्री प्रधानची ‘कशा असतात या बायका’ ही गेल्या वर्षीची जाहिरात लोकप्रिय झालेली ॲड फिल्म ‘कॉटन किंग’ (Cotton king) या शर्टच्या ब्रँडने प्रस्तुत केली होती. यावर्षीही या शर्टींग ब्रँडने मोबाईल पोल्युशनवर एक अतिशय समर्पक असणारी अशी काळजाचा ठाव घेणारी फिल्म तयार केली आहे. व्हायरल झालेल्या या जाहिरातीचं प्रमुख आकर्षण आहे, या जाहिरातीची संकल्पना आणि मायरा वायकुळ.(Myra Vaikul Video)
मोबाईलमुळे जग जवळ आलं असलं तरी नात्यांमधला जिव्हाळा कुठेतरी हरवत चालला आहे. त्यामुळे ‘सतर्क व्हा’ असा इशारा करणारी ही फिल्म अगदी रोजच्या आयुष्यात घडणारा एक प्रसंग घेऊन आली आहे. छोट्या अनूच्या (मायरा वायकुळ) पाचव्या वाढदिवसाचं जंगी आयोजन केलं जातं. पण वाढदिवसाच्या दिवशी हजर असलेले नातेवाईक मोबाईलमध्ये व्यस्त असतात. एकमेकांच्या समोर असूनसुद्धा मोबाइलच्या माध्यमातून कनेक्ट होतात. जेव्हा केक कापण्याची वेळ येते, तेव्हा तर सगळे मोबाईलवर तो इव्हेंट शूट करतात. अनूला हे काही नकोय.. तिला मोबाईलच्या माध्यमातून नात्यांशी जोडायचं नाहीय; तर माणसांच्या सहवासातून नात्यांच्या घट्ट बंधनात गुंफलं जायचंय. तिला मोठ्ठा केक नकोय, मोठाले गिफ्ट नकोयत, तर तिला हवाय ‘वेळ’. या वेळेतूनच तिला हरवत चाललेली नाती जोडायची आहेत. त्या नात्यांमधला जिवंतपणा निर्माण करायचा आहे. ती आग्रहाने सांगत Disconnect to Reconnect…हा महत्त्वाचा मेसेज देते.
नात्यांना जोडणाऱ्या या जाहिरातीची निर्मिती अद्भुत (ADbhoot) या निर्मिती संस्थेने केली आहे. या जाहिरातीचं लेखन शाल्मली पेठे हिने केलं असून दिग्दर्शन वैभव पंडित यांनी केलं आहे.
‘कॉटन किंग’चे कौशिक मराठे म्हणतात की, आजकाल सणासमारंभात सगळेच मान खाली घालून मोबाईलमध्ये अडकलेले दिसतात. अशीच परिस्थिती घराघरांतून दिसते. त्यामुळे अजाणतेपणी आलेले हे संकट पुढे नात्यांमध्येआणि किती अंतर वाढवेल, या विचाराने मी डिस्टर्ब झालो. म्हणून हा मेसेज देणारी ही फिल्म आम्हाला करण्याची गरज भासली. मोबाईलच्या माध्यमातून आम्हाला आपल्याला Disconnect to Reconnect…हा महत्त्वाचा मेसेज देणं सोप्पं गेलं आहे. अद्भुत ( ADbhoot ) क्रिएटिव्हज आणि मायरा या दोघांनी आमच्या संकल्पनेला समाधानकारक स्वरूप दिलं आहे.’
जाहिरातीसाठी मायरा वायकुळच्या निवडीविषयी कौशिक मराठे आणि दिग्दर्शक वैभव पंडित सांगतात, “Disconnect to Reconnect हा इतका महत्त्वाचा संदेश देण्यासाठी असा प्रॉमिसिंग चेहराच हवा होता आणि पहिल्याच भेटीत मायराला पाहिल्यावर तो विश्वास आला. मायरा बरोबर काम करतानाही धम्माल आली. तिनेही आम्हाला योग्य प्रकारे सहकार्य केलं. इतक्या लहान वयामध्ये मायराच्या काम करण्याच्या पध्दतीमुळे आम्ही चकीत झालो.”