बोगोटा : समुद्राच्या पाण्याखाली बुडालेल्या एका जहाजातून मोठा खजिना (Gold Treasure) सापडला आहे. जगातील सर्वात मौल्यवान खजिन्यांपैकी हा एक खजिना आहे. कोलंबियाच्या समुद्र किनाऱ्यापासून दूरवर अंतरावर हा खजिना असलेली बुडालेली बोट सापडली होती. सॅन जोस गॅलियन नावानं हे जहाज ओळखण्यात येतं. कोलंबियाच्या नौदलाच्या जवानांनी हा खजिना शोधून काढला होता. या खजिन्याची अंदाजे रक्कम ही 17 अब्ज डॉलर्स इतकी असल्याचं सांगण्यात येतंय. यात सोने, चांदी आणि निरनिराळी आभूषणे यांचा समावेश आहे. हे जहाज 1708 साली बुडाले होते, त्यानंतर 300 वर्षांनी या जहाजाचे काही भाग सापडले होते. एका रोबोटच्या माध्यमातून पाण्याखाली असलेल्या या जहाजाला शोधण्यात यश आलं. मात्र, इतका मोठा खजिना या जहाजावर असल्यानं अजूनही या जहाजाची जागा गुप्त ठेवण्यात आली आहे..
काय आहे या जहाजाचं वैशिष्ट्ये
एकेकाळी हे जहाज स्पेनच्या नौदलाचा मुकुट असल्याचं मानण्यात येत असे. 1708 साली बिटिशांच्या नौसेनेनं या जहाजाला उडवलं होतं. या जहाजावर 64 तोफा होत्या. या तोफांसाठी लागणारा दारुगोळाही त्यावेळी या जहाजावरच असे. लढाईच्या वेळी या जहाजाला आग लागली. त्यानंतर दारुगोळ्याचा मोठा स्पोट झाला आणि हे जहाज समुद्रात बुडालं. त्यावेळी जहाजावर 600 जण होतं. ते सगळेच्या सगळे जणं या जहाजासोबत बुडाले. त्यांच्यासोबतच जहाजावर असलेलं सोनं, चांदी आणि किमती वस्तूही बुडाल्या होत्या. या खजिन्याची आजची किंमत 17 अब्ज डॉलर्स असल्याचं आता सांगण्यात येतंय. त्यामुळेच या जहाजाचा शोध घेण्यात येत होता.
300 वर्षांनंतर सापडलं जहाज
2015 साली या जहाजाला वुड्स होल ओशनोग्राफिक इन्स्टिट्यूशननं शोधून काढलं. या जहाजावर काही बंदुका आणि डॉल्फिनच्या कलाकृती कोरण्यात आल्या होत्या. त्यावरुन या जहाजाला शोधण्यात आलं. त्यानंतर कोलंबिया सरकारनं या जहाजावरील खजिन्यासाठी 2 वर्षांनी पुन्हा शोध मोहीम सुरु केली. त्यानंतर रोबोटच्या माध्यमातून हा शोध घेण्यात आला. त्यावेळी पहिल्यांदा समुद्राच्या तळाशी असलेल्या या मोठ्या खजिन्याची एक झलक पाहायला मिळाली होती. या रोबोटच्या सहाय्यानं समुद्रात 3100 मीटर तळाला जाऊन या जहाजाचा शोध घेण्यात आला.
फोटो पाहून सगळ्यांचे डोळे विस्फारले
या जहाजाची आणि त्यावरच्या खजिन्यांचे फोटो जेव्हा जगासमोर आले तेव्हा सगळेच आश्चर्यचकीत झाले. या जहाजावर मोठ्या प्रमाणात सोनं विखुरलेल्या अवस्थेत असल्याचं पाहायला मिळालं. या जहाजावर काशाच्या तलवारी, तोफा आणि मात्याची भांडीही समुद्र तळाला सापडली. हा खजिना पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं कोलंबियाचे माजी राष्ट्रपती इवान ड्युक यांनी सांगितलं. स्पेननं त्या काळी द अमेरिकेत गुंतवणूक करण्यासाठी 200 टन सोनं, चांदी आणि दागिने राजा फिलिप पाचवा याला या बोटीतून पाठवले होते. इंग्रजांविरोधातील लढाई सुरु राहण्यासाठी हा खजिना पाठवण्यात आल्याची माहिती आहे.