uganda school attack
युगांडामधील(Uganda News) ‘अलायड डेमोक्रॅटिक फोर्स’ (एडीएफ) (ADF) संघटनेच्या बंडखोरांनी एका शाळेवर सशस्त्र हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात किमान 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. शाळेतल्या 6 विद्यार्थ्यांचं अपहरण करण्यात आलं आहे. ‘अलायड डेमोक्रॅटिक फोर्स’ ही इसिसशी संबंधित संघटना आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि युगांडा सैन्य सक्रीय झालं आहे. पुढील कारवाई केली जात आहे. (Uganda School Attack)
‘डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो’ (डीआरसी) मधील युगांडाचे लष्करी प्रवक्ते मेजर बिलाल कटांबा यांनी सांगितलं की, एडीएफच्या सुमारे 20 ते 25 बंडखोरांनी शुक्रवारी रात्री साधारण 11च्या सुमारास एमपोंडवे येथील ल्हुबिरिरा माध्यमिक विद्यालयावर हल्ला केला. शुक्रवारी मध्यरात्री शाळेला आग लावण्यापूर्वी 26 विद्यार्थी ठार आणि आठ विद्यार्थी जखमी झाले. ही शाळा युगांडा आणि काँगोच्या सीमेवर वसलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळपर्यंत स्थानिक प्रशासनाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. घटनास्थळी आणखी मृतदेह सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण या दुर्दैवी घटनेतून कुणीही जिवंत वाचलं नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. सैनिकांकडून हल्लेखोरांचा पाठलाग केला जात आहे. संबंधित हल्लेखोर विरुंगा राष्ट्रीय उद्यानाच्या दिशेने जात आहेत, असंही बिलाल म्हणाले.
नेमकं काय घडलं?
स्थानिक पोलिसांनी सांगितलं की, इसिसशी संबंधित असलेल्या एडीएफच्या सशस्त्र बंडखोरांनी शुक्रवारी रात्री एमपोंडवे येथील शाळेवर हल्ला केला. यावेळी त्यांनी खाद्यपदार्थांचं दुकानही लुटलं. तसेच शाळेला आग लावली. या आगीत जवळपास 26 विद्यार्थी ठार झाले आहेत. सहा विद्यार्थ्यांचं अपहरण करण्यात आलं आहे. जखमी विद्यार्थ्यांना बवेरा रुग्णालयात उपचारासाठी हलवलं आहे. संबंधित आठही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.