

शाळेच्या शेजारील घरात झाला स्फोट
९७ जण जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
प्रशासनाकडून तपास सुरू; स्फोटकांच्या साठवणुकीवर प्रश्न
World News :अफगाणिस्तानमध्ये शाळेजवळ झालेल्या भीषण स्फोटाने मोठी खळबळ उडाली आहे. पूर्व अफगाणिस्तानातील कुनार प्रांतात घडलेल्या या घटनेत सुरुवातीच्या माहितीनुसार सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून ९७ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
विशेष म्हणजे, शाळेच्या शेजारील एका घरात खाणकामासाठी वापरले जाणारे स्फोटक पदार्थ साठवून ठेवण्यात आले होते. त्याच ठिकाणी स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुनार प्रांतातील असदाबाद शहराजवळील अंडार सेर परिसरात शनिवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. शाळेच्या बाजूला असलेल्या एका घरात स्फोटक पदार्थ ठेवण्यात आले होते.
हे घर खाणकामाशी संबंधित लोकांचे असल्याचे कुनार प्रांताचे माहिती आणि संस्कृती विभागाचे संचालक मौलवी सामी-उल-हक यांनी सांगितले. या घरात डायनामाइट साठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, स्फोट नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही.
कुनार प्रांतीय रुग्णालयाचे प्रमुख मौला दाद यांनी सुरुवातीला सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि ९७ जण जखमी झाल्याची माहिती दिली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक आकडेवारी असल्याने मृतांचा आणि जखमींचा आकडा बदलू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, काही वृत्तसंस्थांच्या नंतरच्या अहवालांमध्ये मृतांचा आकडा सात आणि जखमींचा आकडा ९९ पर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे अंतिम आकडेवारीबाबत अद्याप स्पष्टता नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि तपास पथके घटनास्थळी दाखल झाली. शाळेच्या परिसरात स्फोटक पदार्थ कसे साठवण्यात आले होते, त्यासाठी परवानगी होती का आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात आले होते का, याचा तपास केला जात आहे.
कुनार प्रांताची सीमा पाकिस्तानला लागून आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात काबूलमधील शाळा संकुलाजवळ झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात ४० हून अधिक मुले जखमी झाली होती. त्यामुळे शैक्षणिक परिसरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.