An amazing discovery from the Jurassic period More than 200 dinosaur footprints found in Oxfordshire
ऑक्सफर्ड : ऑक्सफर्डशायरच्या दक्षिण इंग्लंडमधील एका चुनखडीच्या खाणीत संशोधकांना एक अद्वितीय शोध लागला आहे. या ठिकाणी माती खोदणाऱ्या कामगारांना 200 पेक्षा जास्त डायनासोर ट्रॅक सापडले आहेत. हे शोध 166 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या मध्य जुरासिक काळाशी संबंधित आहेत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे ठरले आहेत.
हे डायनासोर ट्रॅक डेव्हर्स फार्म क्वारी या भागात सापडले. उत्खननादरम्यान, चिखलावर उठलेल्या असामान्य खुणा पाहून संशोधकांना काहीतरी महत्त्वाचे गवसल्याची जाणीव झाली. या ठिकाणी पाच वेगवेगळे ट्रॅकवे सापडले. त्यापैकी चार सॉरोपॉड या लांब मानेच्या आणि शाकाहारी डायनासोरचे आहेत, तर पाचवा ट्रॅक मेगालोसॉरस या 9 मीटर लांब शिकारी डायनासोरचा आहे.
सॉरोपॉडचे ट्रॅकवे विशेषतः सेटिओसॉरस नावाच्या डायनासोरशी संबंधित असल्याचे मानले जाते, जो अंदाजे ६० फूट लांब होता. तर मेगालोसॉरसचे ट्रॅक हे त्याच्या तीन पंजांच्या स्पष्ट खुणांसह ओळखले गेले आहेत. विशेष म्हणजे, मेगालोसॉरस हे दोन शतकांपूर्वी वैज्ञानिक नाव असलेले पहिले डायनासोर होते.
ऑक्सफर्ड आणि बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी या शोधाचा विशेष अभ्यास केला आहे. त्यांच्या मते, हे ट्रॅक डायनासोरच्या जीवनशैली, हालचाली आणि त्या काळातील पर्यावरण याबद्दल महत्त्वाची माहिती देतात. बर्मिंगहॅम विद्यापीठातील मायक्रोपॅलिओन्टोलॉजीचे प्राध्यापक क्रिस्टी एडगर यांनी सांगितले की, “हे पायांचे ठसे डायनासोरच्या हालचालींबाबत अद्भुत माहिती देतात आणि त्यांच्या वावरण्याच्या मार्गाचा शोध लावण्यासाठी मार्गदर्शक ठरतील.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तान आर्मीबाबत समोर आली मोठी माहिती; चीनच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारताविरुद्ध नवी खेळी
30वर्षांपूर्वी या भागात डायनासोरच्या 40 पावलांचे ठसे सापडले होते, मात्र त्या काळी उपलब्ध तांत्रिक साधनांच्या अभावामुळे पुरावे मर्यादित राहिले. यावेळी, संशोधकांनी 20,000 हून अधिक डिजिटल प्रतिमा काढल्या आणि ड्रोनच्या मदतीने 3-D मॉडेल तयार केले. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे डायनासोरच्या आकारमान, गती आणि चालण्याच्या शैलीचा सखोल अभ्यास करता येईल.
ऑक्सफर्ड म्युझियममधील शास्त्रज्ञ डंकन मर्डॉक यांच्या मते, “या ट्रॅकचा तपशील इतका अचूक आहे की डायनासोरचा पाय आत-बाहेर कसा सरकला हे आपण पाहू शकतो.” तसेच, या ट्रॅकद्वारे डायनासोर ज्या सरोवराच्या चिखलात फिरत होते, त्याचा पुनर्निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : HMPV व्हायरस 66 वर्षांपासून पृथ्वीवर आहे अस्तित्वात; जाणून घ्या किती धोकादायक
हा शोध आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री येथे एका नवीन प्रदर्शनात प्रदर्शित केला जाणार आहे. यामध्ये पावलांचे ठसे, डायनासोरचे जीवन आणि त्या काळातील सरोवराच्या पर्यावरणाचे सादरीकरण केले जाईल. याशिवाय, डायनासोरच्या जीवनावर आधारित एक माहितीपटही तयार केला जात आहे, ज्यामुळे या प्राचीन प्राण्यांबद्दल लोकांना अधिक माहिती मिळेल.
हा शोध डायनासोरच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. यामुळे जुरासिक काळातील पर्यावरण, डायनासोरच्या जीवनशैली आणि त्यांच्या हालचालींविषयी नवी दृष्टी मिळाली आहे. ऑक्सफर्डशायरमधील या डायनासोर ट्रॅकने वैज्ञानिक जगतात नवी क्रांती घडवली आहे.