अमेरिका-कॅनडा व्यापारयुद्ध भडकणार? ट्रम्प यांची 1 जानेवारीपासून 50 टक्के टॅरिफची धमकी
Donald Trump : अमेरिका आणि कॅनडामधील व्यापार तणाव आणखी वाढण्याची चिन्हे दिसून येत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडातून येणाऱ्या कार, ट्रक, ऑटोमोबाईल पार्ट्स आणि स्टीलवर 1 जानेवारी 2027 पासून 50 टक्के टॅरिफ लागू करण्याची धमकी देण्यात आली आहे. या दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा निष्फळ ठरल्यानंतर ट्रम्प यांनी ही आक्रमक भूमिका घेतली आहे. परिणामी ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे व्यापार तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या Truth Social या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत कॅनडावर जोरदार टीका केली. कॅनडा अनेक वर्षांपासून व्यापाराच्या माध्यमातून अमेरिकेचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. अमेरिकेतील शेतकरी आणि कृषी उत्पादनांवर कॅनडाकडून आकारण्यात येणाऱ्या उच्च टॅरिफचाही ट्रम्प यांनी उल्लेख केला. कॅनडाच्या धोरणांमुळे अमेरिकन शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा त्यांनी केला.
ट्रम्प यांच्या घोषणेनुसार, 1 जानेवारी 2027 पासून कॅनडातून अमेरिकेत येणाऱ्या सर्व कार, मोठे आणि छोटे ट्रक, ऑटोमोटिव्ह पार्ट्स आणि स्टीलवरील टॅरिफ 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येईल. अमेरिकेतच वस्तूंचे उत्पादन करा आणि शून्य टॅरिफचा लाभ घ्या, असा संदेशही ट्रम्प यांनी उद्योगांना दिला आहे.
ट्रम्प यांनी कॅनडावर गंभीर आरोप करत व्यापाराच्या दृष्टीने व्यवहार करण्यासाठी तो जगातील कठीण देशांपैकी एक असल्याचे म्हटले. कॅनडाची अर्थव्यवस्था अमेरिकन बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असल्याचा दावाही त्यांनी केला. कॅनडाला अमेरिकेची जितकी गरज आहे, तितकी अमेरिकेला कॅनडाची नाही, अशी आक्रमक भूमिकाही ट्रम्प यांनी मांडली.
अमेरिका आणि कॅनडा हे दीर्घकाळापासून महत्त्वाचे व्यापारी भागीदार आहेत. विशेषतः वाहन उद्योगामध्ये दोन्ही देशांची पुरवठा साखळी एकमेकांशी जवळून जोडलेली आहे. मात्र, व्यापार धोरण आणि टॅरिफच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. अलीकडील व्यापार चर्चा निष्फळ ठरल्यानंतर कॅनडातील काही वस्तूंवरील अमेरिकेचे नियोजित टॅरिफ लागू झाले. त्यानंतर कॅनडानेही प्रत्युत्तरात्मक पावले उचलण्याचा इशारा दिल्याने व्यापार संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अमेरिका आणि कॅनडातील वाहन उद्योग एकमेकांशी मोठ्या प्रमाणावर जोडलेला आहे. वाहनांचे विविध भाग उत्पादन प्रक्रियेदरम्यान अनेकदा अमेरिका-कॅनडा सीमा ओलांडतात. त्यामुळे 50 टक्के टॅरिफ प्रत्यक्षात लागू झाल्यास वाहन उत्पादकांच्या खर्चावर त्याचा परिणाम होऊ शकतो. ऑटो पार्ट्स आणि स्टीलवरील वाढीव शुल्कामुळे वाहन उत्पादन खर्च वाढण्याची तसेच त्याचा परिणाम पुढे ग्राहकांना मोजाव्या लागणाऱ्या किमतींवर होण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांनी यापूर्वीही कॅनडाच्या व्यापार धोरणांवर सातत्याने टीका केली आहे. आता थेट 50 टक्के टॅरिफची धमकी दिल्यामुळे वॉशिंग्टन आणि ओटावा यांच्यातील व्यापार संबंध आणखी तणावपूर्ण होण्याची चिन्हे आहेत. विशेषतः वाहन, ऑटो पार्ट्स आणि स्टील उद्योगांसाठी पुढील काही महिने महत्त्वाचे ठरणार आहेत. 1 जानेवारी 2027 पासून प्रस्तावित 50 टक्के टॅरिफ प्रत्यक्षात लागू झाल्यास अमेरिका-कॅनडा व्यापार संघर्षाला आणखी मोठे वळण मिळू शकते.






