Natalie Harp: मेलानिया अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दुराव्याचे कारण नॅटली हार्प? व्हाईट हाऊसमधील अंतर्गत वादाचा खळबळजनक खुलासा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या दुसऱ्या कार्यकाळात व्हाईट हाऊसच्या वेस्ट विंगमध्ये (West Wing) एका ३५ वर्षीय महिला अधिकाऱ्याची प्रचंड चर्चा सुरू आहे. या महिला अधिकारी म्हणजेच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विशेष आणि कार्यकारी सहाय्यक नॅटली हार्प (Natalie Harp). अत्यंत शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या या पदावर कार्यरत असलेल्या नॅटली हार्प यांच्या अमर्याद प्रवेशामुळे आणि सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याच्या बातम्यांमुळे अमेरिकन राजकारणात खळबळ उडाली आहे. एका अहवालानुसार, नॅटली यांनी एका वर्षाहून अधिक काळ वेस्ट विंगच्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक असलेली नियमित सुरक्षा मंजुरी (Security Clearance) प्रक्रिया पूर्ण केली नव्हती. तरीही त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या अत्यंत संवेदनशील कागदपत्रांपर्यंत आणि खाजगी बैठकांपर्यंत पोहोचत होत्या, ज्यामुळे अमेरिकेची मुख्य गुप्तचर संस्था सिक्रेट सर्व्हिस आणि राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे.
नॅटली हार्प यांच्या या अभूतपूर्व प्रवेशामुळे केवळ प्रशासकीय चिंताच वाढली नाही, तर ट्रम्प कुटुंबाच्या अंतर्गत वर्तुळातही वाद निर्माण झाले आहेत. नॅटली यांच्या २४ तास चालणाऱ्या उपस्थितीमुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्यात मोठा दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा व्हाईट हाऊसच्या गलिच्छ राजकीय गल्लीबोळात सुरू आहेत. ट्रम्प यांच्या निवासस्थानाच्या खाजगी भागातही नॅटली यांची सातत्याने होणारी ये-जा आणि ट्रम्प यांच्याशी असलेले अत्यंत निकटचे संबंध हे या अंतर्गत तणावाचे मुख्य कारण मानले जात आहे.
नॅटली हार्प या ट्रम्प यांच्या माहितीचा मुख्य स्रोत बनल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना स्क्रीनवर वाचण्यापेक्षा कागदावरील छापील मजकूर वाचणे जास्त आवडते. नॅटली या नेहमी त्यांच्यासोबत एक पोर्टेबल प्रिंटर घेऊन फिरतात, ज्यावरून ट्रम्प यांना आवडतील अशा बातम्या, सोशल मीडिया पोस्ट आणि मतदानाचा डेटा त्वरित प्रिंट करून दिला जातो. याच कारणामुळे ट्रम्प यांच्या अंतर्गत टीममधील अधिकाऱ्यांनी त्यांना ‘ह्युमन प्रिंटर’ (Human Printer) असे टोपणनाव दिले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait Of Hormuz: होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेचा ‘गुप्त मार्ग’; इराणी सैन्याला चकवून दररोज लाखो बॅरल तेलाची जागतिक बाजारात निर्यात
याव्यतिरिक्त, ट्रम्प यांच्या अधिकृत ‘ट्रुथ सोशल’ (Truth Social) अकाऊंटचे नियंत्रण नॅटली यांच्याकडेच आहे. ट्रम्प बोलतात ते सर्व शब्द नॅटली स्वतः टाईप करून पोस्ट करतात. ट्रम्प यांच्यापर्यंत कोणती माहिती पोहोचणार आणि कोणत्या सहकाऱ्याचा निरोप पोहोचणार, हे ठरवणाऱ्या त्या मुख्य ‘गेटकीपर’ बनल्या आहेत. व्हाईट हाऊसच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नॅटली यांचा ट्रम्प यांच्याशी असलेला अनियंत्रित संपर्क मर्यादित करण्याचा प्रयत्न केला; परंतु ट्रम्प यांच्या पाठिंब्यामुळे हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या जवळ काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ‘SF-86’ नावाचा एक अत्यंत गोपनीय आणि सविस्तर अर्ज भरावा लागतो. यामध्ये पूर्वीचे पत्ते, आर्थिक इतिहास, गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि परदेशी नागरिकांशी असलेले संपर्क यांची सखोल चौकशी केली जाते. नॅटली हार्प यांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यास वारंवार नकार दिला किंवा विलंब लावला. एका वर्षापेक्षा जास्त काळ त्या कोणत्याही औपचारिक सुरक्षा मंजुरीशिवाय राष्ट्राध्यक्षांसोबत अत्यंत संवेदनशील चर्चांमध्ये सहभागी होत राहिल्या.
जेव्हा ही बाब व्हाईट हाऊसच्या कायदेशीर सल्लागारांच्या आणि राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली, तेव्हा त्यांनी यावर गंभीर आक्षेप घेतला. यानंतर खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली आणि नॅटली यांना आवश्यक ती सर्व कागदपत्रे जमा करण्याचे निर्देश दिले, त्यानंतर नुकतीच त्यांना औपचारिक सुरक्षा मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, सुरुवातीला त्यांनी या प्रक्रियेला टाळण्याचा प्रयत्न का केला, याचे उत्तर अद्याप अस्पष्ट आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mohan Bhagwat: ‘RSS नेत्यांचा सन्मान करू नका!’ अमेरिकेच्या सल्लागार आयोगाचे वादग्रस्त वक्तव्य; भारतीय परराष्ट्र मंत्रालय आक्रमक
नॅटली हार्प या २०२० मध्ये पहिल्यांदा ट्रम्प यांच्या संपर्कात आल्या. त्यांनी दावा केला होता की, त्या हाडांच्या गंभीर कर्करोगाने (Bone Cancer) ग्रस्त होत्या आणि ट्रम्प यांनी पहिल्या कार्यकाळात स्वाक्षरी केलेल्या ‘राईट टू ट्राय ॲक्ट’ (Right to Try Act) या कायद्यामुळे त्यांना प्रायोगिक उपचारांची परवानगी मिळाली, ज्यामुळे त्यांचा जीव वाचला. यानंतर त्यांनी रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये भावुक भाषण केले आणि ट्रम्प यांना आपले ‘तारणहार’ मानले.
त्यानंतर त्यांनी ‘वन अमेरिका न्यूज’ (OAN) या उजव्या विचारसरणीच्या टीव्ही नेटवर्कवर सूत्रसंचालक म्हणून काम केले आणि २०२२ मध्ये त्या ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारात अधिकृतपणे सामील झाल्या. जानेवारी २०२५ मध्ये ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्या अधिकृतपणे व्हाईट हाऊसचा भाग बनल्या.
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट (Karoline Leavitt) यांनी नॅटली यांचा बचाव करत म्हटले आहे की, “नॅटली यांच्याकडे आता योग्य ती सुरक्षा मंजुरी आहे आणि त्या ट्रम्प प्रशासनाच्या एक अत्यंत निष्ठावान व कष्टाळू सदस्या आहेत.” तरीही, एका ३५ वर्षीय सहकाऱ्याची राष्ट्राध्यक्षांपर्यंत असलेली अमर्याद पोहोच आणि सुरक्षा नियमांची झालेली पायमल्ली यामुळे अमेरिकन राजकारणात अजूनही वाद निर्माण होत आहेत.






