२६ लाख फॉलोअर्स, कॉस्मेटिक क्लिनिक अन् ७५० किलो ड्रग्ज; 'मिशन इम्पॉसिबल' शोची प्रसिद्ध टीव्ही अँकर Sarah Khalifaला फाशीची शिक्षा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
टीव्हीच्या पडद्यावर सुरक्षा, कायदा आणि गुन्हेगारीच्या घटनांवर भाष्य करून प्रसिद्धीच्या झोतात आलेली इजिप्शियन टीव्ही निवेदिका सारा खलिफा (Sarah Khalifa) हिचे आयुष्य एका रात्रीत पार बदलून गेले आहे. इजिप्तमधील (कैरो येथील फौजदारी न्यायालयाने अमली पदार्थांचे उत्पादन, बेकायदेशीर साठवणूक आणि आंतरराष्ट्रीय तस्करीत दोषी ठरवत सारा खलिफासह एकूण १२ आरोपींना फाशीची (मृत्युदंडाची) शिक्षा सुनावली आहे. हा निकाल ऐकल्यानंतर सारा खलिफा न्यायालयातच ढसाढसा रडू लागली आणि तिने न्यायाधीशांसमोर स्वतःला निर्दोष सांगत दयेची याचना केली.
३९ वर्षीय सारा खलिफा ही इजिप्शियन प्रसारमाध्यमांमध्ये एक अत्यंत प्रसिद्ध चेहरा मानली जात होती. ती मुख्यत्वे ‘मिशन इम्पॉसिबल’ (Mission Impossible) या तिच्या लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमासाठी ओळखली जात असे, ज्यामध्ये देशातील कायदा, सुरक्षा आणि गुन्हेगारीच्या क्लिष्ट प्रकरणांचे विश्लेषण केले जायचे. टीव्ही अँकरिंगव्यतिरिक्त ती एक यशस्वी व्यावसायिक महिला देखील होती; तिचे स्वतःचे कॉस्मेटिक सर्जरी क्लिनिक आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी होती. सोशल मीडियावरही तिची प्रचंड क्रेझ होती आणि एकट्या इंस्टाग्रामवर तिचे २६ लाखांहून अधिक फॉलोअर्स होते.
इजिप्तची सरकारी वृत्तसंस्था ‘अल अहरम’ (Al-Ahram) आणि ‘अखबार अल-यौम’ यांनी दिलेल्या वृत्तानुसार, हा खटला कैरो उच्च न्यायालयात एकूण २८ आरोपींवर चालवण्यात आला होता. तपासात समोर आले की, या गुन्हेगारी टोळीने परदेशातून कच्चा माल आयात करून कृत्रिम अमली पदार्थ (Synthetic Drugs) बनवण्याचे एक मोठे जाळे तयार केले होते. हे अमली पदार्थ तयार करण्यासाठी त्यांनी शहरातील निवासी भागांमधील दोन अपार्टमेंट्सचा वापर खाजगी प्रयोगशाळा म्हणून केला होता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Indonesia: इंडोनेशियात अनाक क्राकाटोआ ज्वालामुखीचा उद्रेक! 50 हजार फुटांपर्यंत राखेचे लोट; 209 उड्डाणे रद्द, 22 हजार प्रवासी अडकले
सुरक्षा दलांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये या टोळीकडून ७५० किलोग्रॅमपेक्षा जास्त अमली पदार्थ आणि कच्चा माल हस्तगत केला. याशिवाय आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर शस्त्रे आणि जिवंत दारुगोळाही जप्त करण्यात आला. तपासात असाही आरोप करण्यात आला की, सारा खलिफाने या रॅकेटसाठी आर्थिक मदत पुरवली आणि टोळीतील महत्त्वाच्या सूत्रधारांना भेटण्यासाठी परदेश दौरेही केले होते.
सुनावणीदरम्यान निकाल जाहीर होताच सारा खलिफा अत्यंत भावूक झाली आणि न्यायालयाच्या आवारातच ढसाढसा रडू लागली. तिने न्यायाधीशांना हात जोडून विनंती करत म्हटले, “साहेब, कृपया माझे ऐका. माझ्या आई-वडिलांनी मला अतिशय चांगल्या संस्कारात वाढवले आहे. ते धार्मिक आणि देवभक्त लोक आहेत. मला अमली पदार्थांच्या काळ्या पैशांची मुळीच गरज नाही.” तिने तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, तिने आयुष्यात कधीही सिगारेटलाही स्पर्श केलेला नाही आणि तिला या प्रकरणात नाहक अडकवले जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Germany: अंतराळ क्षेत्रात युरोपचा नवा अध्याय! जर्मन कंपनीच्या ‘स्पेक्ट्रम’ रॉकेटचे यशस्वी उड्डाण; 5 उपग्रह अवकाशात स्थापित
इजिप्तच्या कायदेशीर प्रक्रियेनुसार, कोणत्याही आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यापूर्वी देशाच्या ‘ग्रँड मुफ्ती’ (Grand Mufti) यांचे धार्मिक मत घेणे बंधनकारक असते. न्यायालयाने ग्रँड मुफ्तींकडे हे प्रकरण पाठवले होते, ज्यांच्या धार्मिक मान्यतेनंतर न्यायालयाने १२ आरोपींच्या फाशीच्या शिक्षेवर अंतिम शिक्कामोर्तब केले. या प्रकरणात न्यायालयाने इतर ९ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून ७ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार, इजिप्तमध्ये अमली पदार्थांची तस्करी आणि दहशतवादाविरोधात अत्यंत कठोर कायदे आहेत. २०२५ मध्ये इजिप्शियन न्यायालयांनी ५४१ हून अधिक लोकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, सारा खलिफाचे वकील या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Court of Cassation) अपील करण्याची शक्यता आहे.






