Saudi-Yemen Conflict : हुथी बंडखोरांचा सौदीला मोठा धक्का; मोचा शहरावर ताबा मिळवत बाब अल-मंदेबकडे कूच ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
मध्य पूर्वेतील तणाव वेगाने वाढत असताना येमेनमधील युद्धाने एक अत्यंत चिंताजनक वळण घेतले आहे. सौदी अरेबियाच्या (Saudi-Yemen Conflict) पाठिंब्यावर चालणाऱ्या येमेनी लष्कराला मोठा धक्का देत हुथी बंडखोरांनी तांबड्या समुद्राच्या (Red Sea) किनाऱ्यावर वसलेल्या अत्यंत धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या मोचा (Mocha) शहरावर पूर्णपणे ताबा मिळवला आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी हुथी लढवय्ये आणि येमेनी सैन्य यांच्यात झालेल्या भीषण चकमकीनंतर लष्कराने तिथून माघार घेतली, ज्यानंतर हुथींनी संपूर्ण शहरावर आपले नियंत्रण प्रस्थापित केले.
मोचा शहर हे केवळ ५० मैल अंतरावर असलेल्या ‘बाब अल-मंदेब’ या अत्यंत महत्त्वाच्या सागरी सामुद्रधुनीच्या अगदी जवळ आहे. या विजयानंतर हुथी बंडखोरांनी शहरात मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत. इतकेच नव्हे तर या संघर्षादरम्यान येमेन सरकारच्या संरक्षण मंत्र्यांच्या हत्येचाही प्रयत्न करण्यात आला होता, मात्र ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले.
सीएनएनच्या वृत्तानुसार, तांबड्या समुद्रातील बाब अल-मंदेब या मोक्याच्या जलमार्गावर पूर्णपणे ताबा मिळवण्यासाठी पेराम (Perim) बेट आपल्या ताब्यात घेणे अत्यंत गरजेचे मानले जाते. पेराम बेट हे मोचा शहराच्या किनाऱ्याजवळच वसलेले आहे. मोचा शहरावर ताबा मिळवल्यामुळे आता हुथी लढवय्यांना पेराम बेटावर ताबा मिळवणे अधिक सोपे झाले आहे. हुथी बंडखोर गेल्या अनेक महिन्यांपासून पेराम बेट आणि आसपासच्या परिसरावर वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. जर हुथींनी पेराम बेटावर आपले लष्करी केंद्र स्थापन केले, तर ते आंतरराष्ट्रीय जहाजांची वाहतूक सहजपणे रोखू शकतात. या परिस्थितीमुळे अमेरिका, सौदी अरेबिया आणि युरोपियन देशांच्या सुरक्षेच्या चिंतात कमालीची वाढ झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump911Claim : ‘दोन अग्निशामकांनी मला उचलून…’ 9/11 बाबत ट्रम्प यांनी मारल्या थापा; अमेरिकन मीडियाने केला ‘असा’ पर्दाफाश
तांबडा समुद्र हा येमेन आणि आफ्रिका खंडाच्या दरम्यान पसरलेला एक अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग आहे, जो लाल समुद्राला एडनच्या आखाताशी आणि अरबी समुद्राशी जोडतो. होर्मुझच्या सामुद्रधुनीप्रमाणेच बाब अल-मंदेब हा मार्ग जागतिक व्यापार, विशेषतः कच्च्या तेलाच्या आणि द्रवीकृत नैसर्गिक वायूच्या (LNG) वाहतुकीची सर्वात महत्त्वाची वाहिनी मानला जातो. जागतिक स्तरावर समुद्राद्वारे होणाऱ्या एकूण तेल आणि एलएनजी वाहतुकीपैकी जवळपास १२ टक्के वाहतूक एकट्या बाब अल-मंदेब मार्गावरून होते. हा मार्ग युरोप, आफ्रिका आणि आशिया या तीन मोठ्या खंडांना व्यापारी दृष्टीने जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम करतो. त्यामुळे या मार्गावरील कोणतेही विघ्न जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका पोहोचवू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China : चीनमध्ये मोठी दुर्घटना! दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या परदेशी जहाजाला लागली आग; 30 हून अधिक जीवितहानीची भीती
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्यानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली होती. अशा बिकट परिस्थितीत सौदी अरेबियाने आपला तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी बाब अल-मंदेब या पर्यायी मार्गाचा वापर सुरू केला होता. सौदी अरेबिया दररोज सुमारे ३० लाख बॅरल कच्च्या तेलाची विक्री याच मार्गाने करत होता. परंतु, आता इराणच्या समर्थनाने हुथी बंडखोरांनी मोचावर ताबा मिळवून बाब अल-मंदेबच्या अगदी उंबरठ्यावर धडक दिली आहे. पाकिस्तान आणि तुर्कीसारख्या देशांनी या युद्धातून माघार घेण्याचे आवाहन करूनही हुथींनी ही मोठी लष्करी कारवाई केली आहे. हुथींनी हा मार्ग रोखल्यास सौदी अरेबियाला आपल्या तेलाची विक्री करणे अत्यंत कठीण होऊन बसेल, ज्यामुळे जागतिक बाजारात इंधनाचे दर गगनाला भिडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.






