भारतात राहण्यासाठी ओसीआय कार्ड केव्हा आणि कसे मिळवता येईल? त्याचे नियम आणि ते कसे मिळवायचे ते जाणून घ्या ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
बॉलिवूड अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इम्रान खान (Imran Khan OCI Controversy) सध्या एका मोठ्या कायदेशीर अडचणीत सापडला आहे. अमेरिकन नागरिकत्व आणि ओसीआय (Overseas Citizen of India) कार्डधारक असलेल्या इम्रान खानला मुंबई पोलीस आणि परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाने (FRRO) इमिग्रेशन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २८ ऑक्टोबर २०२६ पर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावली आहे. या घटनेनंतर अचानक संपूर्ण देशात ओसीआय कार्ड म्हणजे काय, त्याद्वारे मिळणारे विशेष अधिकार कोणते आणि त्यातील नियमांचे उल्लंघन केल्यास कोणती कडक कारवाई होऊ शकते, याविषयी तीव्र उत्सुकता निर्माण झाली आहे.
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने परदेशी भारतीय नागरिकांच्या सोयीसाठी आणि डिजिटल पारदर्शकतेसाठी नागरिकत्व (सुधारणा) नियम, २०२६ अंतर्गत अनेक क्रांतिकारक बदल अधिसूचित केले आहेत. विशेष म्हणजे ३० जून २०२६ पासून भारत सरकारने पूर्णपणे डिजिटल ‘ई-ओसीआय’ (e-OCI) कार्ड प्रणाली अंमलात आणली आहे. या नव्या नियमांमुळे परदेशात राहणाऱ्या आणि भारतीय वंशाच्या कोट्यवधी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असला, तर नियमांचे तंतोतंत पालन न केल्यास कायदेशीर कारवाईची टांगती तलवारही कायम आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक
भारतीय संविधान कलम ९ नुसार भारतात दुहेरी नागरिकत्वाला (Dual Citizenship) पूर्णपणे बंदी आहे. जर एखाद्या भारतीय नागरिकाने स्वेच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले, तर त्याचे भारतीय नागरिकत्व तात्काळ आणि आपोआप संपुष्टात येते. अमेरिका, कॅनडा, युनायटेड किंगडम किंवा जर्मनीसारखे जगभरातील सुमारे ४९ टक्के देश दुहेरी नागरिकत्वाला मान्यता देतात; परंतु भारत, चीन आणि जपान या देशांमध्ये असा कोणताही नियम नाही.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भारत सरकारने ऑगस्ट २००५ मध्ये नागरिकत्व कायदा, १९५५ मध्ये ऐतिहासिक दुरुस्ती करून ओसीआय (OCI) योजना सुरू केली. पहिले ओसीआय कार्ड ९ जानेवारी २००६ रोजी प्रवासी भारतीय दिनानिमित्त जारी करण्यात आले होते. सोप्या भाषेत सांगायचे तर, ओसीआय कार्ड हे भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकांसाठी एका प्रकारे ‘आजीवन मल्टीपल-एन्ट्री व्हिसा’ (Lifelong Multiple Entry Visa) म्हणून काम करते.
गृह मंत्रालयाने २०२६ मध्ये लागू केलेल्या नव्या नियमांनुसार, संपूर्ण ओसीआय सेवा अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्यात आल्या आहेत. यातील प्रमुख बदल खालीलप्रमाणे आहेत:
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Peshawar School : पाकिस्तानच्या पेशावरमध्ये भीषण दुर्घटना; शाळेचे छत कोसळून 20 चिमुकल्यांसह शिक्षिकेचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
ओसीआय कार्ड मिळवण्यासाठी व्यक्ती भारतीय वंशाची असणे आवश्यक आहे. ज्यांचे आई-वडील, आजी-आजोबा किंवा पणजोबा-पणजी कधीकाळी भारताचे नागरिक होते किंवा २६ जानेवारी १९५० रोजी भारताचे नागरिक होण्यास पात्र होते, त्या व्यक्ती ओसीआय कार्डसाठी अर्ज करू शकतात. याशिवाय, भारतीय नागरिक किंवा ओसीआय कार्डधारकाशी लग्न झालेल्या परदेशी जोडीदारालाही (Spouse) दोन वर्षांच्या सततच्या लग्नानंतर ओसीआय मिळण्याचा अधिकार असतो. मात्र, पाकिस्तान किंवा बांगलादेशचे नागरिकत्व असलेल्या व्यक्तींना सुरक्षेच्या कारणास्तव ओसीआय कार्ड दिले जात नाही.
अर्ज करण्यासाठी उमेदवाराला भारत सरकारच्या ociservices.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागतो. तेथे आपले फोटो, डिजिटल स्वाक्षरी, परदेशी पासपोर्ट, पूर्वीच्या भारतीय नागरिकत्वाचा पुरावा (जसे की जुना भारतीय पासपोर्ट किंवा जन्म दाखला) अपलोड करावा लागतो. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला ई-ओसीआय डिजिटल स्वरूपात प्राप्त होते.
ओसीआय कार्डधारकाला भारतात जन्मभर कधीही येणे-जाणे, कितीही काळ राहणे आणि कोणत्याही पोलिसात एफआरआरओ (FRRO) नोंदणी न करता राहण्याचा अधिकार मिळतो. ते भारतात व्यापार करू शकतात, नोकरी करू शकतात, बँक खाती उघडू शकतात आणि अनिवासी भारतीयांप्रमाणेच (NRI) आर्थिक व शैक्षणिक सवलती मिळवू शकतात.
परंतु, ओसीआय म्हणजे पूर्ण नागरिकत्व नाही. ओसीआय धारकांना भारतात मतदानाचा अधिकार नसतो, ते निवडणूक लढवू शकत नाहीत, कोणतीही सरकारी नोकरी किंवा घटनात्मक पद (उदा. न्यायाधीश, राष्ट्रपती) भूषवू शकत नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांना भारतात शेतजमीन, बागायती जमीन किंवा फार्महाऊस खरेदी करण्याची परवानगी नसते. इमिग्रेशन नियमांचे उल्लंघन केल्यास किंवा देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास सरकार त्यांचे ओसीआय कार्ड रद्द करून त्यांना देश सोडण्याचे आदेश देऊ शकते.






