लंडनमध्ये इराणच्या सर्वोच्च नेत्याशी संबंधित ४६० कोटींच्या आलिशान फ्लॅट्सचा लिलाव सुरू; काय आहे यामागचे नेमके रहस्य? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
ब्रिटेनची राजधानी लंडन येथील सर्वात महागड्या आणि उच्चभ्रू भागात समाविष्ट असलेल्या केन्सिंग्तन पॅलेसच्या अगदी शेजारी वसलेल्या दोन अत्यंत आलिशान पेंटहाऊसची सध्या जगभरात जोरदार चर्चा सुरू आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई (Mojtaba Khamenei) यांच्या गुप्त जागतिक आर्थिक साम्राज्याशी जोडल्या गेलेल्या या मालमत्तांची एकूण किंमत जवळपास ३६ दशलक्ष पाउंड म्हणजेच भारतीय चलनात सुमारे ४६० कोटी रुपये इतकी आहे. ब्रिटनमधील ‘द संडे टाइम्स’ आणि ‘द टेलिग्राफ’ या नामांकित वृत्तपत्रांनी उघडकीस आणलेल्या या माहितीमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि रिअल इस्टेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे.
सरकारी भूमी अभिलेख आणि कायदेशीर कागदपत्रांनुसार, या फ्लॅट्सचे औपचारिक मालकी हक्क हे व्यावसायिक अली अन्सारी यांच्याकडे आहेत. अली अन्सारी हे इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सला (IRGC) आर्थिक मदत पुरवल्याच्या आरोपावरून ब्रिटन आणि अमेरिकेच्या तीव्र निर्बंधांचा सामना करत आहेत. आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांच्या मते, अन्सारी हे खामेनेई आणि इराणमधील सत्ताधारी उच्चपदस्थांसाठी परदेशात अथांग मालमत्तांचे जाळे सांभाळणारे मुख्य माध्यम मानले जातात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mohan Bhagwat : ‘कर्मभूमीशी निष्ठा म्हणजेच खरे हिंदुत्व’; लंडनमध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य
हे दोन आलिशान अपार्टमेंट्स लंडनमधील ‘३ए पॅलेस ग्रीन’ या अत्यंत सुरक्षीत आणि प्रतिष्ठित इमारतीमध्ये स्थित आहेत, जे प्रिन्स आणि प्रिन्सेस ऑफ वेल्स यांच्या अधिकृत निवासस्थानापासून अगदी जवळ आहेत. यापैकी मुख्य ५ बेडरूमचे पेंटहाऊस इमारतीच्या ६ व्या आणि ७ व्या मजल्यावर पसरलेले असून त्याचे एकूण क्षेत्रफळ तब्बल ३,९४४ चौरस फूट आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र खोल्या आणि केन्सिंग्टन गार्डन्सचा मनमोहक नजराणा दिसणारी भव्य रूफ टेरेस समाविष्ट आहे. २०१६ मध्ये हे पेंटहाऊस १९ दशलक्ष पाऊंडमध्ये खरेदी केले गेले होते, तर दुसरे पेंटहाऊस २०१४ मध्ये १६.७५ दशलक्ष पाऊंडला विकत घेण्यात आले होते.
अन्सारी यांनी या अतिश्रीमंत मालमत्ता खरेदी करण्यासाठी खाजगी सावकारांकडून आणि वित्तीय संस्थांकडून कोट्यवधींचे कर्ज घेतले होते. मात्र, कर्जाचे नियमित हप्ते फेडण्यात अन्सारी अपयशी ठरल्याने सावकारांनी कायदेशीर मार्गाने आपले थकित पैसे वसूल करण्यासाठी ‘रिसीव्हर्स’ (व्यवस्थापक) नियुक्त केले आहेत. सध्या नाईट फ्रँक (Knight Frank) आणि सोथबीज (Sotheby’s) या जगप्रसिद्ध रिअल इस्टेट कंपन्यांच्या मध्यस्थीने एका पेंटहाऊसची सुमारे १२ दशलक्ष पाऊंड (अंदाजे १५३ कोटी रुपये) या सुरुवातीच्या किमतीत लिलाव आणि विक्रीची तयारी पूर्ण झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PM Modi: पॅरिसमधील पहिल्या भव्य हिंदू मंदिराचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन; पतंप्रधान म्हटले, ‘हे वसुधैव कुटुंबकमचे प्रतीक’,VIDEO
विशेष म्हणजे, या मालमत्तांवर ब्रिटन सरकारने ऑक्टोबर २०२५ मध्येच कडक निर्बंध लादले होते. अन्सारी यांच्यावर संपत्ती जप्ती, ब्रिटन प्रवासावर बंदी आणि कोणत्याही कंपनीत संचालकपद भूषवण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे रिसीव्हर्सच्या देखरेखीखाली या फ्लॅट्सची विक्री झाली आणि सावकारांचे कर्ज भागवले गेले, तरी उरलेली सर्व रक्कम ब्रिटिश सरकारकडून त्वरित गोठवली (Freeze) जाणार आहे. या संपूर्ण प्रकरणाने आंतरराष्ट्रीय पातळीवर राजकीय नेते आणि त्यांचे गुप्त व्यावसायिक भागीदार परदेशात कसा काळा पैसा गुंतवतात यावर पुन्हा एकदा मोठा प्रकाश टाकला आहे.






