सततच्या हल्ल्यांमुळे इराणही आक्रमक; एक-दोन नाहीतर 7 देशांवर एकाचवेळी जोरदार हल्ले (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन : इराण आणि शेजारी देशांमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी आणि गुरुवारी रात्री जगातील 7 सर्वांत श्रीमंत राष्ट्रांसह 9 देशांवर हल्ले करण्यात आले. जगातील सर्वांत मोठे गॅस क्षेत्र असलेल्या साउथ पार्स गॅस क्षेत्रावरील इस्त्रायलच्या हल्ल्याला तेहरानने दिलेले हे प्रत्युत्तर होते. दरडोई जीडीपीनुसार, सात सर्वांत श्रीमंत देशांवर एकाचवेळी हल्ला करणारा इराण आता जगातील एकमेव देश बनला आहे.
इराणच्या हल्ल्याने प्रभावित झालेल्या आखाती देशांचे एकत्रित दरडोई जीडीपी ४१७००० डॉलर्सपेक्षा जास्त आहे. हे जगातील काही सर्वांत समृद्ध आणि विकसित देश आहेत आणि आपली अर्थव्यवस्था कोलमडलेली असूनही इराण त्यांच्यावर एकाच वेळी हल्ले करत आहे. मध्य इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. इराणच्या एका क्षेपणास्त्राने वेस्ट बँकवर हल्ला केला, ज्यात ४ पॅलेस्टिनी महिला ठार झाल्या. इस्रायलचे मंत्री झीव एल्किन म्हणाले की, युद्धावरील चर्चा ते कधी संपेल यावर केंद्रित न होता, नुकसान कसे वाढवायचे आणि अधिक गंभीर कसे करायचे यावर केंद्रित झाली पाहिजे.
हेदेखील वाचा : World War 3: युद्ध अजून पेटणार ! ‘इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होणार’; अमेरिकन संरक्षण सचिवांची गर्जना
कतारमध्येही हल्ले केले गेले. यात १४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. कतार एनर्जीने दुजोरा दिला की, रास लाफान एलएनजी हबचे मोठे नुकसान झाले आहे. यानंतर, कतारने इराणच्या सुरक्षा आणि लष्करी अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले. तसेच युएईमध्ये १३ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि २७ अटॅक ड्रोन पाडण्यात आले. इराण लवकरच ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करण्याची धमकी देत आहे. यूएईने आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करण्याचे आणि तणाव कमी करण्याचे आवाहन केले असून, या हल्ल्यांना दहशतवादी कृत्य म्हटले आहे.
समरेफ रिफायनरी आणि जुबैल पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स रिकामे करण्याचे आदेश जारी करण्यात आले. रियाधवरील अनेक क्षेपणास्त्र हल्ले हाणून पाडण्यात आले. रियाधमधील दोन तेल शुद्धीकरण केंद्रांवर झालेल्या हल्ल्यानंतर, गरज पडल्यास इराणविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार राखून ठेवल्याचे म्हटले आहे.
डोनाल्ड टॅम्पच्या घरापर्यंत पोहोचले ड्रोन?
अमेरिकेत अज्ञात ड्रोन दिसल्याचे वृत्त आहे. हे ड्रोन फोर्ट लेस्ले जे. मॅकनेअरवर दिसले आहेत, जिथे अनेक वरिष्ठ अधिकारी राहतात. हा एक अमेरिकी लष्करी तळ आहे आणि मार्को रुबियो आणि पीट हेगसेथ यांसारख्या वरिष्ठ व्यक्तींच्या निवासस्थानांशी याचा संबंध आहे. या घटनेनंतर, व्हाईट हाऊसमध्ये एक उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली.
तेहरानने हल्ले तत्काळ थांबवावे
कतार, अझरबैजान, बहरीन, इजिप्त, जॉर्डन, कुवेत, लेबनॉन, पाकिस्तान, सौदी अरेबिया, सीरिया, तुर्की आणि संयुक्त अरब अमिराती यांचा समावेश असलेल्या अरब आणि इस्लामिक देशांच्या गटाच्या (जीओसी) परराष्ट्र मंत्र्यांनी एक संयुक्त निवेदन जारी करून इराणला हल्ले तत्काळ थांबवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी इराणला धोका निर्माण करणारी कृती न करण्याचे आवाहनही केले.






