फोटो सौजन्य: Freepik
वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे अनेक जण इलेक्ट्रिक कार्सकडे वळत आहे. यामुळेच भारतात अनेक कार उत्पादक कंपनीज अत्याधुनिक इलेक्ट्रिक कार्स लाँच करत आहे. या कार्सना भारतीय ग्राहकांकडून चांगलीच पसंती मिळत आहे.
येणारा काळ हा इलेक्ट्रिक कार्सचा असल्यामुळे अनेक कार उत्पादक कंपनीज आगामी काळात अधिक इलेक्ट्रिक कार्स लाँच करण्याच्या बाबतीत सकारात्मक आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या महिन्यात इतर इंधन कारसह, इलेक्ट्रिक कार सेगमेंटमधील वाहनेही देशभरात विकल्या गेल्या आहेत. आज आपण जाणून घेऊया, जुलै 2024 मध्ये कोणत्या कंपनीने किती इलेक्ट्रिक कार विकल्या आहेत.
अहवालानुसार, जुलै 2024 मध्ये देशभरात इलेक्ट्रिक कारच्या एकूण 7541 युनिट्सची विक्री झाली आहे. तर जुलै 2023 मध्ये देशभरात 7768 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती.
जुलै 2024 मध्ये टाटा मोटर्सने सर्वाधिक इलेक्ट्रिक कार विकल्या आहेत. गेल्या महिन्यात कंपनीने एकूण 4775 कार्सची विक्री केली आहे. वार्षिक आधारावर कंपनीच्या विक्रीत सुमारे 13 टक्के घट झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत टाटा मोटर्सने ईव्हीच्या ५४७१ युनिट्सची विक्री केली होती. टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक कारच्या पोर्टफोलिओमध्ये Tiago, Punch, Nexon, Tigor सारख्या EV कार खरेदीदारांच्या पसंतीस उतरत आहेत.
ब्रिटीश कार निर्माता कंपनी MG ने भारतीय बाजारात कॉमेट आणि ZS EV ऑफर केली आहेत. विक्रीच्या बाबतीत टाटा नंतर एमजी मोटर्स दुसऱ्या स्थानावर आहे. गेल्या महिन्यात कंपनीने एकूण 1522 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली असून वार्षिक आधारावर त्यांच्या विक्रीमध्ये 23 टक्क्याने वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये एमजी मोटर्सने इलेक्ट्रिक वाहनांच्या १२३७ युनिट्सची विक्री केली होती.
महिंद्राची Xuv400 देखील भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक SUV म्हणून सादर करण्यात आली आहे. कंपनीच्या एकमेव इलेक्ट्रिक SUV ने जुलै 2024 मध्ये 487 युनिट्स विकल्या. तर गेल्या वर्षी जुलै महिन्यात या एसयूव्हीच्या ३७९ युनिट्सची विक्री झाली होती.
चीनी इलेक्ट्रिक कार कंपनी BYD ने देखील जुलै 2024 मध्ये भारतीय बाजारपेठेत 341 इलेक्ट्रिक युनिट्स विकल्या आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीने 379 मोटारींची विक्री केली होती.
Citroen भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कार्स देखील विकते. गेल्या महिन्यात कंपनीने 155 युनिट्सची विक्री केली होती. तर गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीने 223 कार्सची विक्री केली होती.