फोटो सौजन्य: Freepik
सध्या पावसाचे दिवस चालू झाले आहेत. महाराष्ट्रातील अनेक घाट परिसर या ऋतूत पर्यटकांना आपले मनमोहक रूप दाखवत असतात. मग अशावेळी कित्येक उत्साही पर्यटक माळशेज घाट, आंबोली घाट, ताम्हिणी घाट आणि अशा कैक घाटांवर जायचा बेत आखतात. परंतु घाट परिसरात कार घेऊन गेल्यावर अनेकांना सवय असते की एकदा का उतरणीचा रस्ता लागला की कार बंद करून चालवायची. पेट्रोल आणि डिझेलची बचत करणे हे यामागे उद्दिष्ट असते. परंतु उताराच्या रस्त्यावर कार बंद करून चालवणे आपल्याच अंगलट येऊ शकते.
डोंगराळ भागात कार चालवणे सरळ रस्त्यावर कार चालवण्यापेक्षा अवघड आहे. उंचावरून कार किंवा बाइक खाली आणताना खूप खबरदारीने ड्रायविंग करावी लागते. असे न केल्यास अपघाताचा धोकाही वाढतो. जर तुम्हाला घाट किंवा डोंगराळ परिसरात सुरक्षितपणे कार चालवायची असेल, तर तुम्ही इंजिन बंद ठेवून ती चालवू नये. असे केल्याने कोणत्या प्रकारचे धोके वाढतात? याबद्दल आपण पुढे जाणून घेऊया.
उतारावरून कार चालवताना इंधन वाचवण्यासाठी इंजिन बंद करणाऱ्या लोकांपैकी जर तुम्हीही असाल, तर थोडेसे इंधन वाचवण्यासाठी तुम्ही स्वत:लाच अडचणीत आणत नाही ना? याचे कारण म्हणजे इंजिन बंद केल्यानंतर उतारावरून कार चालवल्याने त्यामध्ये विविध समस्या उद्भवण्याचा धोका वाढतो.
हे देखील वाचा: TVS Jupiter 110 च्या किंमती एवढ्याच आहे ‘या’ जबरदस्त बाईक-स्कूटर
कार बंद करून उतारावरून चालवल्यास, ब्रेक निकामी होण्याचा धोका वाढण्याची भीती असते. कारचे इंजिन बंद असल्याने ब्रेक नीट काम करत नाहीत आणि ब्रेक पेडल दाबायला खूप कठीण होते. अशा परिस्थितीत ब्रेक लावण्याचा प्रयत्न केल्यास ब्रेक जास्त गरम होतात आणि काही परिस्थितींमध्ये ब्रेक लावता येत नाहीत. परिणामी ब्रेक फेल होण्याची परिस्थिती उद्भवते.
काही वेळा बंद असलेली कार उतारावर फिरवताना तिचे स्टेअरिंग नीट काम करत नाही. इंजिन बंद झाल्यानंतर लगेचच स्टेअरिंग वळवणे थोडे कठीण होऊन बसते आणि अशा स्थितीत कारवर नियंत्रण ठेवणे कठीण होऊन बसते.
इंजिन बंद केल्यानंतर उतारावर कार चालवल्याने इंजिनचे मोठे नुकसान होते. इंजिन बंद झाल्यानंतर, कारची इंधन प्रणाली आणि ABS देखील काम करत नाही आणि नंतर कार थांबवण्यात खूप अडचणी येतात.