(फोटो सौजन्य-AI एआय)
इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ई-स्प्रिंटोने आपली नवीन G1 फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय मार्केटमध्ये लाँच केली आहे. या स्कूटरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 89,999 रुपये असून, बॅटरीच्या 3 ऑप्शनमध्ये ती सादर करण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, टॉप व्हेरिएंटमध्ये एका चार्जवर 130 किमीपर्यंत रेंज मिळू शकते. या स्कूटरची बुकिंग कंपनीच्या ऑफीशली वेबसाइटवर सुरू असून, डिलिव्हरी 1 जानेवारी 2027 पासून सुरू होणार आहे.
बॅटरीनुसार किंमत आणि रेंज वेगवेगळी
ई-स्प्रिंटो G1 मध्ये 2 kWh, 2.5 kWh आणि 3 kWh बॅटरी पॅकचे ऑप्शन मिळतात. त्यांची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे 89,999 रुपये, 94,999 रुपये आणि 99,999 रुपये आहे. कंपनीच्या माहितीनुसार, या व्हेरिएंट्सची दावा केलेली रेंज अनुक्रमे 80 किमी, 100 किमी आणि 130 किमी आहे.
वेगाच्या बाबतीतही तिन्ही मॉडेलमध्ये फरक आहे. 2 kWh व्हेरिएंटचा टॉप स्पीड 30 किमी प्रतितास, 2.5 kWh व्हेरिएंटचा 40 किमी प्रतितास, तर 3 kWh व्हेरिएंटचा 50 किमी प्रतितास आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवासाचे अंतर आणि गरज लक्षात घेऊन कस्टमर योग्य मॉडेल निवडू शकतात. स्कूटर चार्ज होण्यासाठी सुमारे 4.5 तास लागतात.
VLF स्ट्राडा इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच; किंमत ₹1.20 लाख, रेंज 250 किमीपर्यंत! जाणून घ्या
फॅमिली वापरासाठी उपयोगी फीचर्स
या स्कूटरमध्ये 12-इंच ट्यूबलेस टायर, 165 mm ग्राउंड क्लिअरन्स आणि 150 किलो वजन वाहून नेण्याची कॅपसिटी देण्यात आली आहे. तिचे वजन 81 किलो असून, सीटची उंची 790 mm आहे. 28 लिटरची अंडरसीट स्टोरेज जागा हेल्मेट किंवा दैनंदिन सामान ठेवण्यासाठी उपयोगी ठरू शकते.
LED हेडलॅम्प, LED टेललॅम्प, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, रिव्हर्स मोड आणि USB चार्जिंग पोर्ट यांसारखी फीचर्स मिळतात. नेव्हिगेशनची सुविधा सबस्क्रिप्शनद्वारे मिळणार आहे. दोन्ही चाकांवर ड्रम ब्रेक आणि कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली आहे.
बॅटरीची सुरक्षा आणि स्मार्ट फीचर्स
बॅटरी पॅकला IP67 रेटिंग देण्यात आले आहे, ज्यामुळे धूळ आणि पाण्यापासून संरक्षण मिळण्यास मदत होते. याशिवाय अँटी-थेफ्ट अलार्म, सेंट्रल लॉकिंग, फाइंड माय व्हेईकल आणि साइड-स्टँड कट-ऑफ यांसारखी फीचर्सही आहेत. स्कूटर चार रंगांमध्ये मिळेल: चारकोल ब्लॅक, स्लेट ग्रे, होरायझन ब्लू आणि पाइन ग्रीन.
ई-स्प्रिंटोचा दावा आहे की कंपनीने भारतातील B2B विभागात 70,000 हून जास्त इलेक्ट्रिक स्कूटर्स विकल्या आहेत. आता G1 च्या माध्यमातून कंपनीने वैयक्तिक कस्टमर्ससाठीही आपली उपस्थिती वाढवली आहे. खरेदीपूर्वी प्रत्यक्ष रेंज, वॉरंटी आणि सर्व्हिस नेटवर्क तपासणे उपयुक्त ठरेल.






