
फोटो सौजन्य: iStock
सध्या देशभरात सणासुदीचा काळ चालू झाला आहे. याच काळात अनेक जण नवीन कार आणि बाईक घेताना दिसतात. कित्येक जण या काळाची वाट पाहत असतात जेणेकरून त्यांना आपल्या आवडत्या कार किंवा बाईकवर चांगली सवलत मिळेल. ऑटो कंपनीज सुद्धा या काळात नवीन कार्स आणि बाईक्स लाँच करत असते. तसेच आपल्या कार्सवर विशेष डिस्काउंट देत असते. याच डिसॉकन्ट्सकडे आकर्षित होऊन अनेकजण कार खरेदी करण्याचा निर्णय घेतात.
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे फायदेशीर असतेच पण ते नुकसानकारक देखील असू शकते. म्हणूनच आज आपण सणासुदीच्या काळात कार घेणे योग्य आहे की नाही हे जाणून घेऊया.
हे देखील वाचा: जर यंदा कार घेण्याचा विचार केलाच असेल तर बजेट बनवताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी
सणासुदीच्या काळात कार कंपनीज आणि डीलर्स अनेकदा मोठ्या प्रमाणात सूट देताना दिसतात. विशेषत: दसरा आणि दिवाळीच्या आसपास कंपनीज मोठ्या ऑफर्स देतात. यामुळे लोकांसाठी नवीन कार खरेदी करणे किफायतशीर ठरते. पण या ऑफर्समुळे नुकसान देखील होऊ शकते.
ऑफर मिळविण्यासाठी, लोक घाईघाईने कार घेण्याचा निर्णय घेतात. लिमिटेड पिरियड ऑफरमुळे, लोक योग्यरित्या माहिती गोळा करू शकत नाहीत. ज्यामुळे ते घाईत नवीन कार खरेदी करतात.
सणासुदीच्या काळात जास्त मागणी असल्याने स्टॉकची कमतरता देखील असू शकते. कारचे लोकप्रिय मॉडेल्स पटकन विकले जाऊ शकतात. यामुळे खरेदीदारांकडे कमी पर्याय शिल्लक राहतात.
कारच्या वाढत्या विक्रीमुळे सेवेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. ग्राहकांच्या वाढत्या संख्येमुळे डीलरशिपना त्यांच्या मानकांची पूर्तता करणे कठीण होऊ शकते.
सणासुदीच्या काळात नवीन कार घेण्यासाठी योग्य नियोजन करणे महत्वाचे आहे. प्रथम तुम्हाला कोणती कार हवी आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून तुमच्या गरजा पूर्ण होतील. मग तुम्ही वेगवेगळ्या कार कंपनीजकडून उपलब्ध असलेल्या सवलतीच्या ऑफरची तुलना करा आणि योग्य डील असलेल्या कारसोबत जा. सणासुदीच्या काळात नवीन कार खरेदी करण्याची घाई अजिबात करू नका. तुमच्या बजेटमध्येच नवीन कार घ्या. विनाकारण कर्ज घेऊन आपली आर्थिक स्थिती बिघडवू नका.