अरविंद पाटकर प्रकाशन व्यवसायात येण्यापूर्वी पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षात कार्यरत असताना पक्षाच्या वतीने एक आठवडा किंवा पंधरवडा पक्षीय वाङ्मय आणि रशियन वाङ्मय पुस्तकांची विक्री चालत असे. कॉ. श्रीपाद अमृत डांगेंच्या सभा तसेच इतर सभांमध्ये पाटकर पुस्तकं घेऊन आवडीनं पुस्तक विक्री करत असत. इथूनच त्यांना पुस्तक विक्रीची आवड निर्माण झाली आणि पुस्तकाशी त्यांचं नातं कायमच जोडलं गेलं.
पक्षातून बाहेर पडल्यावर अभिनव प्रकाशनच्या वा. वि. भट यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य त्यांना लाभलं. पुस्तक विक्रीच्या आवडीतून पाटकर यांच्या मनोविकास प्रकाशनचं पहिलं अपत्य जन्माला आलं, ते म्हणजे लोकशाहीर कॉ. अण्णा भाऊ साठेंचं ‘शाहीर’ हे पुस्तक. लावणी, गाणी, पोवाडे एकत्रित असलेल्या या पुस्तकाला कॉ. डांगे यांची प्रस्तावना लाभली. इथूनच त्यांचा प्रकाशन व्यवसाय सुरू झाला. पुढे वैचारिक आणि माहितीपर पुस्तकं ही मनोविकासने स्वतःची एक ओळख निर्माण केली.
खरं तर प्रत्येक पुस्तक प्रकाशकाला आवडेल, ते लोकांना आवडेलच, याची काहीच खात्री देता येत नाही. प्रकाशकांचा नेमका कस इथेच लागतो. याविषयी पाटकर म्हणाले, ‘पुस्तक विक्रीमधील बडं प्रस्थ असलेल्या मॅजेस्टिकच्या तुकाराम कोठावळे यांनी आम्हाला एक अलिखित नियम सांगितला, तो म्हणजे तुम्ही ज्यावेळी १० पुस्तकं काढता, तेव्हा तुमची दोन पुस्तकं धावत असतात, दोन पुस्तकं चालत असतात, दोन पुस्तकांना आपल्याबरोबर घेऊन तुम्ही चालत असता, दोन पुस्तकांना फरपटत नेत असता, तर दोन पुस्तकं काही केल्या तुमच्या घरातून बाहेर पडत नाहीत. मात्र त्या धावणाऱ्या दोन पुस्तकांसाठी तुम्हाला पुन्हा १० पुस्तकांना जन्म द्यावा लागतो.’
साधारण काही वर्षं गेल्यानंतर कोणत्या विषयाची पुस्तकं काढल्यावर लोकांना आवडतात, याचा एक अंदाज येऊ लागतो किंवा तुमचं प्रकाशन कोणत्या विचाराने प्रेरित आहे यावर भर दिला जातो. यालाच अनुसरून मनोविकासने नेहमी जे चांगलं आणि महत्त्वपूर्ण आहे, तेच वाचकांपुढे ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.
आज मुलांचा किंवा तरुण पिढीचा पुस्तक वाचनाकडे कल नाही, असा सरसकट आरोप केला जातो. या आरोपाला खोडून टाकत ते म्हणाले, ‘जुनी लोकं तरी सगळीच वाचत होती का? तर नाही. जे वाचत नाहीत, तेच असे आरोप करत असतात. वाचणाऱ्यांचा एक वर्ग असतो, तसा न वाचणाऱ्यांचाही एक वर्ग असतो. पुण्यात नॅशनल बुक ट्रस्टच्या प्रदर्शनात पुस्तकं खरेदी करणारी हजारो तरुण मुलंच आहेत. मग आपण त्यांच्यावर का आरोप करायचा? वाचनाची पिढी तयार करावी लागते, आपणच ती करत नाही. मुलांना चांगली पुस्तकं आणून दिली पाहिजे. तसंच शालेय विद्यार्थ्यांनी गाईड वाचून नाही, तर धडा वाचून अभ्यास करायला पाहिजे. मूल रडायला लागलं किंवा ते जेवावं म्हणून हातात मोबाइल देतो. त्याऐवजी त्याला पुस्तक देतो का?… किंवा त्याला वाचून दाखवतो का? आपणच मुलाला मोबाइलचं व्यसन लावतो; पण पुस्तकाचं, वाचनाचं व्यसन लावत नाही. त्यामुळे मुलं वाचत नसतील तर त्याचा दोष मुलांना नाही, तर पालकांना दिला पाहिजे’.
आधुनिक काळात सर्वकाही ऑनलाइन उपलब्ध झालं आहे. यातीलच एक म्हणजे ई-बुकची संकल्पना. याविषयी ते म्हणाले, ‘पुस्तक हातात घेऊन वाचणं, याचा एक वेगळाच आनंद असतो. आताच झालेल्या एका सर्व्हेनुसार पूर्वी इलेक्ट्रॉनिक मीडिया आघाडीवर होतं, आता प्रिंट मीडिया आघाडीवर आहे. जगभरातून आता खूप चांगली पुस्तकं येत आहेत. नवे प्रकाशक तयार होत आहेत.’
कोणत्याही प्रकाशकाविषयी तसंच चांगली पुस्तकं आणि वाचकांविषयी मनमोकळेपणानं आणि भरभरून बोलणारे पाटकर गेली अनेक वर्षं सातत्याने दर्जेदार पुस्तक निर्मितीसाठी झटत आहेत. ते म्हणतात, ‘लेखक लिहितो, आम्ही प्रकाशित करतो. पण एखादं पुस्तक जर लोकांच्या डोक्यात भिनलं, तर लोकं शोधत येऊन पुस्तक खरेदी करतात. हाडाचा वाचक हा थांबत नाही. त्याला हवं असलेलं पुस्तक तो कुठुनही मिळवतोच आणि वाचतो. खरंतर लोकं वाचतात, उत्तम वाचतात. पुस्तकं घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचत नाही, हा आमचा दोष आहे. महाराष्ट्रात ३६ जिल्ह्यांत ललित साहित्याची दुकानं फक्त ४२ आहेत आणि २० जिल्ह्यांत तर एकही दुकान नाही. दोन कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईमध्ये ललित साहित्याची अवघी ५-७ दुकानं आहेत. उपनगरांतली दुकानं तर शोधावी लागतील. ज्यांना पुस्तकं वाचायची आहेत, त्यांना जर पुस्तकं समोर दिसतच नसतील तर ते काय करणार? पण वाचणारा माणूस त्याच्या आवडीचं पुस्तक कुठूनही शोधून काढून वाचतो. प्रकाशक काही करत नाही. खरं तर वाचकांनी हा व्यवसाय जिवंत ठेवला आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे.’
-अनघा सावंत