holi a festival of sanctity by removing revenge nrvb
या उत्सवाची प्रथा का व कशी सुरू झाली याची माहिती आपण करून घेतली की ही गोष्ट आपल्या लक्षात येते. गणपती किंवा नवरात्रोत्सवासारखा हा उत्सव पूजा करून घरात साजरा करायचा नसतो. तर तो घराबाहेर साजरा करायचा असतो. कोरोनामुळे उत्सवासाठी घराबाहेर पडणे हे तर फार धोकादायक झाले आहे. होलिकोत्सव सण हा मनातील विकृत भावना दूर करून मन पवित्र व आनंदी करण्यासाठी असतो. तर थंडीमध्ये काही वृक्षांची पानगळ होते ती एकत्र करून जाळून परिसर स्वच्छ ठेवून उत्तम आरोग्यप्राप्तीसाठी साजरा करायचा असतो.
उत्तर भारतात या सणाला ‘होरी-दोलायात्रा’ म्हणतात. दक्षिण भारतात या सणाला ‘कामदहन’ असे म्हणतात. महाराष्ट्रात ‘होळी किंवा शिमगा’ या नावाने हा सण ओळखला जातो. कोकण- गोमंतकात या सणाला ‘शिग्मा किंवा शिग्मो’ असे म्हणतात. श्री. रा. चिं. ढेरे यांनी हा शब्द कसा तयार झाला याविषयी व्युत्पत्ती सांगितली आहे. देशीनाममालेत हेमचंद्राने या उत्सवाला ‘सुगिम्हअ’ म्हणजे ‘सुग्रीष्मक’ असे नाव दिले आहे. या नावापासून कोकण-गोमंतकात ‘शिग्मा’ हा शब्द रूढ झाला. त्यानंतर त्याचे ‘शिमगा’ असे रूप रूढ झाले आहे.
होलिकोत्सवाविषयी वेगवेगळ्या कथा सांगितलेल्या आहेत. कृष्ण लहान असताना, त्याला ठार मारण्यासाठी कंसाने पूतना राक्षसीला पाठविले. पण दूध पीत असताना, तिचा प्राण शोषून कृष्णाने त्या दुष्ट पूतना राक्षसीला यमसदनाला पाठवले. त्याचे प्रतिक म्हणून होळीच्या दिवशी रात्रीच्या वेळी पूतना राक्षसीला जाळण्यात येते. महाराष्ट्रात याविषयी आणखी एक कथा सांगितली जाते. पूर्वी ढुंढा नावाची एक दुष्ट राक्षसीण लहान मुलांना पीडा देत असे. तेव्हा तिला शिव्या देऊन ठिकठिकाणी अग्नी पेटवून हाकलून देण्याची प्रथा सुरू झाली. होलिकोत्सव साजरा केला म्हणजे गावच्या मुलांना ढुंढा राक्षसी त्रास देत नाही असा समज आहे.
आता यामागचे विज्ञान काय आहे ते पाहुया. होळीचा सण हा शिशिर ऋतूमध्ये थंडीच्या दिवसात येतो. या दिवसात अनेक वृक्षांची पानगळ चालू असते. घराच्या परिसरात पानगळ झाल्याने रोगराई पसरण्याची शक्यता असते. अस्वच्छता हीच खरी ढुंढा राक्षसी ! अस्वच्छतेमुळे लहान मुले पटकन आजारी पडतात. पानगळीत पडलेला पालापाचोळा एकत्र करून तो जाळण्याची प्रथा पडली.
स्वच्छता झाली की रोगराईची ढुंढा राक्षसीण मुलांना त्रास देत नाही. त्याकाळी पालापाचोळ्यापासून खत निर्माण होते ही कल्पना नव्हती. तरी कोकणात फार प्राचीन कालापासून हा पालापाचोळा शेतातील भाजावळीसाठी वापरण्याचीही प्रथा होती. पूर्वी धार्मिक गोष्टी लोक मनापासून पाळीत असत. म्हणून होलिकादहनाची प्रथा पडली आहे. आपला देश गरीब आहे, लोकसंख्या जास्त आहे. म्हणून आपल्या देशात स्वच्छतेची सवय नाही असे काही जण म्हणतात. पण ते ही कारण खरे नाही. कारण यासाठी केवळ पैशांची जरूरी नाही. तर जरूरी आहे ती इच्छाशक्तीची आणि सवयीची !
सरकारी, सार्वजनिक किंवा मंदिराची जागा ही प्रत्येकाला आपली वाटली पाहिजे. ती स्वच्छ ठेवायची जबाबदारी आपलीही आहे ही भावना असणे जरूरीचे आहे. होळी हा सण स्वच्छतेसाठी आहे. घर, परिसर आणि मन स्वच्छ ठेवण्यासाठी आहे. मनातील विकृती, घाण दूर करून मन स्वच्छ आणि पवित्र ठेवण्यासाठी हा सण असतो. हा सण रंगांचा आहे पण तो रसायन, हानीकारक रंगांचा नाही; तर नैसर्गिक रंगांचा आहे. मन आनंदी रहावं. दु:ख, द्वेष, मत्सर आणि सूडभावना दूर करून मन पवित्र रहावं यासाठी हा सण येत असतो.
वसंतऋतूच्या आगमनाप्रीत्यर्थ होळीचा सण साजरा केला जातो. वसंत ऋतूमध्ये विविध प्रकारची फुले विविध रंगांची उधळण करीत असतात. तर काही वृक्ष नवीन पालवीने नटलेले असतात. कोकिळचा आवाज निसर्गाचे माधुर्य अधिकच गोड करीत असतो. म्हणूनच वसंत ऋतूला ऋतूंचा राजा असे म्हटले जाते. १८ फेब्रुवारी रोजी सूर्याने सायन मीन राशीतप्रवेश केला. त्या दिवसापासूनच वसंत ऋतू सुरू झाला. ‘होळी जळाली, थंडी पळाली’ असे म्हटले जाते. परंतु यावर्षी थंडी केव्हाच पळाली. यावर्षी तशी थंडी कमीच होती. हवामानात होणारा हा असा बदल चांगला नाही. पिकांसाठी आणि माणसाच्या आरोग्यासाठी घातक आहे. अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतीचेही मोठे नुकसान होत आहे.
निसर्गात होणाऱ्या या बदलाला अर्थात आपणच कारणीभूत आहोत. आपण जर निसर्गाला जपले नाही तर निसर्ग आपणास जपणार नाही. म्हणूनच पर्यावरणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करण्याची खरी गरज आहे. त्यामुळे होळीचा सण साजरा करीत असतांना वृक्षतोड होणार नाही याकडे आपण जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आपले सण-उत्सव पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी असतात. भक्षण करण्यासाठी नसतात.
दा. कृ. सोमण
dakrusoman@gmail.com