
marathi
‘माझ्या मराठीचा बोलू कौतुके, परि अमृतातेही पैजा जिंके,’ असे माझ्या माय मराठीबद्दल ज्ञानियांचा राजा खुद्द कौतुकाचे बोल बोलत आहे, तिची थोरवी किती वर्णावी? मराठी आपली मातृभाषा आहे, याचा मराठी माणसाला प्रचंड आणि सार्थ अभिमान आहे. नोकरी अथवा धंद्याच्या निमित्ताने अनेक वर्षे मायभूमीपासून दूर परदेशात राहणाऱ्या लोकांचे मराठीवरचे गाढ प्रेम जसेच्या तसे मनात जिवंत आहे. कर्मभूमी वेगळी असली तरी मायभूमीला ते हृदयात साठवून जिवंत ठेवतात. कविवर्य सुरेश भट यांच्या कवितेतील प्रत्येक शब्द जणू प्रतिध्वनीत होतो त्यांच्यासाठी.
‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी’
मराठीसारखी समृध्द भाषा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न मराठी माणूस कुठेही जावो अवश्य करतो. मराठी लोकसंख्या कमी असणाऱ्या ठिकाणीसुद्धा जेव्हा दोन मराठी माणसे भेटतात, तेव्हा मराठीतून संभाषण करण्याकडेच त्यांचा कल असतो.
महाराष्ट्राबाहेर आणि परदेशात स्थायिक झालेल्या लोकांसाठी, आपली संस्कृती जपण्याच्या दृष्टीने भारताबाहेर अनेक ठिकाणी बृहन महाराष्ट्र मंडळ अर्थात बिएमएमच्या अनेक शाखा कार्यरत आहेत. मराठीला परदेशात जिवंत ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांनी हातभार लावला आहे.
‘धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी’
या शब्दांना परदेशस्थ मराठी माणूस पूर्णपणे जागतो. बीएमएमतर्फे शास्त्रीय संगीत, भावगीत गायन अथवा वादनचे कार्यक्रम मराठी कलाकारांना बोलावून आयोजित केले जातात. कित्येक देशांमध्ये मराठी नाटकांचा महिना-दोन महिन्याचा दौरा देशभर आयोजित केला जातो. अशा कार्यक्रमांना परदेशात मराठी माणसांचा उदंड प्रतिसाद मिळतो. सुरेश भट म्हणतात तसे “पाहुणे पोसते मराठी,” हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. दौऱ्यावर आलेल्या नाटकाच्या संपूर्ण संचाला तिथल्या मराठी कुटुंबांमध्ये राहायला बोलावतात. त्यामुळे परदेशात जाऊनही आपली माणसे, आपले जेवण आणि खास मराठमोळा पाहुणचार त्यांना अनुभवायला मिळतो. त्यासोबतच या कलाकारांना भेटून एक आजीवन सोबत राहणारा अनुभवांचा खजिनाच परदेशस्थ मराठी कुटुंबांना मिळतो.
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
लहानपणापासून मुलांना मराठीशी ओळख व्हावी म्हणून अनेक कुटुंबांमध्ये मराठीतूनच बोलणे काटेकोरपणे पाळले जाते. त्यामुळेच इतकी वर्षे दूर राहूनही स्पष्ट मराठी उच्चार व मराठी बोलण्याची मराठमोळी ढब जिवंत राहते. मुलांना जमेल तितकी स्तोत्रे, शुभंकरोती, आरत्या, इत्यादी शिकवले जाते. कित्येक पालक मुलांसोबत मराठी चित्रपट व कार्यक्रम बघणे, नियमितपणे किंवा निदान सणावाराला तरी जवळच्या देवळात आवर्जून जातात.
लहान मुलांसाठी मराठी शाळा देवळात, ग्रंथालयात किंवा community center अर्थात समुदाय केंद्रात किंवा जमले तर एखाद्या स्वतंत्र ठिकाणी दर शनिवार/रविवारी भरवल्या जातात. बीएमएमचा त्यासाठी खास परदेशस्थ मुलांसाठी वेगळा अभ्यासक्रम असतो. जी मुले परदेशात जन्मली व वाढली आहेत, त्यांना सुरुवातीला मराठी शिकणे अवघड जाते. पण आपण मातृभाषा शिकत आहोत याचा त्यांना अभिमान असतो.
घरोघरी मराठी सण पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. पारंपरिक वेशभूषा व पदार्थ, साग्रसंगीत पूजा यातून लहान मुलांवरसुद्धा संस्कार होतात. भरली वांगी, ठेचा, पिठले-भाकरी पासून ते बासुंदी, जिलेबी, मोदक, आणि पुरणपोळीपर्यंत सर्व पारंपरिक पदार्थ परदेशस्थ मराठी कुटुंबात बनवले जातात. मकरसंक्रांतीला मराठी बायका काळ्या साड्या नेसून स्थानिक देवळात, सार्वजनिक हळदीकुंकू समारंभ आयोजित करतात. तिथे येणाऱ्या सर्व स्त्रियांना हळदीकुंकू, फळे आणि वाण दिले जाते. उत्साही सुवासिनी स्त्रिया उखाणे देखील घेतात. काही हौशी मंडळी भारतासारखे घरीसुद्धा हळदीकुंकू समारंभ करतात.
गुढीपाडव्याच्या दिवशी हौसेने मराठी कुटुंबात गुढी उभारून नववर्षाचा शुभारंभ केला जातो. ज्या शहरांमध्ये मराठी कुटुंबाची बऱ्यापैकी मोठी लोकसंख्या आहे, तिथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर पारंपरिक वेशभूषेत शोभायात्रा काढली जाते. काही परदेशांमध्ये तर जेव्हा जेव्हा भारताचे पंतप्रधान भेट देतात, तेव्हा त्यांचे अशाच भव्य पद्धतीने स्वागत केले जाते. परदेशात गणेशोत्सव बहुसंख्य ठिकाणी अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा केला जातो. त्या निमित्ताने मोठ्यांसाठी नाट्य स्पर्धा, लहानांसाठी विविध गुण दर्शनाचे कार्यक्रम आयोजित करतात. रोज संध्याकाळी आरती आणि प्रसाद-भोजन भक्त गणांकडून आयोजित केले जातात. एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की परदेशात देवळांमध्ये काम करणारे सगळे भारतीय हे स्वयंसेवा तत्त्वावर कामे करतात. पुजारी सोडले तर इतर सगळे विना मोबदला सेवा करत असतात.
अनंत चतुर्दशीला देवळाच्या आवारात गणेशाच्या पार्थिव मूर्तीचे एका छोट्याशा पोहण्याच्या कृत्रिम तलावात विसर्जन केले जाते आणि तेच पाणी झाडांना घातले जाते. अशा तऱ्हेने पर्यावरणास अनुकूल पद्धतीने परदेशात गणेशोत्सव साजरा केला जातो.
त्याच तत्त्वावर दिवाळीसुद्धा साजरी केली जाते. दिवाळीच्या दिवसात दररोज मंदिरात पूजा, आरती व प्रसाद असतो, पण फक्त एक दिवस भक्तगण मिळून फटाके उडवतात. प्रत्येकाला एका पिशवीत मर्यादित फटाके मिळतात, ज्याने ध्वनी आणि हवेत प्रदूषण किमान राहील. साधारण एखाद तास हे फटाके उडवायला परवानगी असते. अशा तऱ्हेने हौस ही भागते आणि पर्यावरणाला इजाही पोचत नाही.
परदेशात केवळ सण साजरे करून मराठी माणूस थांबला नाही. मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी अनेक देशांमध्ये रेडिओ स्टेशन चालवले जाते जिथे मराठी गाणी लावली जातात, मराठी कथा-कविता सादर केल्या जातात, किंवा मराठी साहित्याचे पॉडकास्ट कार्यक्रम लावले जातात. (तसेच परदेशस्थ मराठी कवी व साहित्यिक ऑनलाईन काव्य संमेलने, चर्चा सत्रे आयोजित करून जगभरात आपापल्या परीने मराठी जिवंत ठेवण्यास हातभार लावीत आहेत.)
मराठी मुलामुलींची लग्ने पारंपरिक पद्धतीने केले जाते. नऊवारी साडी, नथ, दागिने, धोती, कुर्ता, पगडी, भिकबाळी अशी पूर्ण पारंपरिक वेशभूषा तसेच पारंपरिक जेवण सुद्धा असते. मंगलाष्टके तर म्हटली जातातच पण अगदी उत्साहाने उखाणेसुद्धा घेतले जातात.
मराठी राजभाषा दिन महाराष्ट्रात २७ फेब्रुवारीला मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परदेशात एक दिवस नव्हे तर वर्षभर साजरा होतो. परदेशस्थ मराठी लोकांनी मराठी भाषा अनेक माध्यमातून केवळ जिवंत ठेवली आहे असे नाही, तर तिला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेऊन ठेवले आहे. मराठी बाणा रोमरोमात साठवून जगणाऱ्या परदेशस्थ मराठी माणसाला मनापासून नमस्कार!
– तनुजा प्रधान
(साकव्य परदेशी परिवार समूह प्रमुख)
tanujaapradhan3@gmail.com