सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीच्या चौथ्या दिवशी गौरीचे आगमन होते. काही ठिकाणी तिसऱ्या दिवशीही गौरी आणली जाते. आगमन व पूजनासाठीचे विधी मात्र त्या त्या ठिकाणी वेगवेगळे आहेत. एकंदरीत गौरी पूजनाच्या पद्धतीकडे पाहिल्यास त्याद्वारे निसर्ग रक्षणावरच अधिक भर असल्याचे दिसते. गौरीपूजन हा महिलांचा सण. यासाठी महिलांची आधीपासूनच तयारी सुरू असते. गौरीच्या आगमनादिवशी सुवासिनी व युवती आपल्या गावातील मुख्य पाणवठ्यावर जातात.
दरवर्षी याच ठिकाणाहून गौरीचे आवाहन केले जाते. काही ठिकाणी नदी, विहीर किंवा गावातील तळ्याकाठी गौरीचे आवाहन करतात. सोबत बांबूपासून बनविलेली ‘रवळी’ घेतली जाते. त्यात हळद, तिरडा यांचे रोपटे घेतले जाते. काही ठिकाणी केवळ हळदीचेच रोपटे वापरतात. रोपट्यांनाच गौरी देवी मानली जाते. सध्या रवळी केवळ लग्नकार्यासाठी वापरतात. रवळीमध्ये विडा, शेण, अगरबत्ती, करंडा, रांगोळी, फुले, पाण्याचा तांब्या घेतला जातो. पाठवठ्यावर नेऊन ती एका विशिष्ट जागी बसविली जाते.
तत्पूर्वी परिसर स्वच्छ केला जातो. यावेळी गौरीची गाणी गायली जातात. या रोपट्यांची व विड्याची विधिवत पूजा केली जाते. विधिवत पूजेनंतर रोपटी रवळीत ठेवून पाण्यात सोडतात. पानाचा विडा पाण्यात सोडल्यावर पाणी तोंडात भरून सर्व महिला आपापली गौरीची रवळी घेऊन घराकडे निघतात. घराची पायरी चढेपर्यंत पाणी तोंडातच ठेवण्याची प्रथा आहे. वाटेत कोणाशी बोलणेही टाळले जाते किंवा तसा अलिखित नियमच आहे. घरात प्रवेश करताना मागे वळून तोंडातील पाणी उंबऱ्याबाहेर फेकले जाते. त्यानंतर रवळी गणेशमूर्तीच्या उजव्या बाजूस ठेवली जाते. दरम्यान, त्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम होतात. यामध्ये महिला वर्ग जागरणही करतात. गौरी आगमनाच्या दुसर्या दिवशी गौरीपूजन होते. घराघरांत गौराई येत असली तरी काही गणपतींकडे गौराई आगमन तसेच पूजन होत नाही.
गौरीपूजनादिवशी गौरीचा मुखवटा, हात, तिरडे, बांबू दागदागिने, कपडे घालून गौरीला सजवले जाते. तिरड्यात बांबूची काठी उभी करून तिला झाडाच्या दोरांनी बांधले जाते. गौरीला सजवतात. कुडाळ, कणकवली, वैभववाडीत अशी प्रथा असल्याचे सांगितले जाते. सजवलेल्या गौराईला गणपतीच्या उजव्या बाजूस उभी करून साडीचा पदर गणपतीच्या डोक्यावर ठेवतात. त्यानंतर गौरीपूजनास विधिवत सुरुवात होते. पूजनासाठी पाने व फुले वापरतात.
गौरीच्या पूजेनंतर घरातील सर्व सुवासिनी गौराईसमोर ओवसा भरतात. त्यात वाण म्हणून वापरण्यात येणारे साहित्य शेतीत तयार झालेले असते. त्यामध्ये पोहे, काकडी, केळी आदींचा समावेश असतो. गावातील एक विशिष्ट समाज यासाठीची बांबूची सूपे पुरवितात. त्या बदल्यात त्यांना धान्य किंवा पैशांच्या स्वरूपात मोबदला दिला जातो. सध्या सूपे, सुपल्या, रोवळी बाजारात विकत मिळतात. मुली सुपलीत ओवसा भरतात. लग्नानंतर हा ओवसा त्यांच्या सासरी सुपूर्द केला जातो.
गौराईसमोर व इतर देवतांसमोर ओवशाचे वाण अर्पण केल्यावर आजूबाजूच्या घरात देण्याची प्रथा आजही पाळली जात आहे. तसेच त्याआधी ग्रामदेवतेपुढे ठेवून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. लग्नानंतर पहिला ओवसा असेल तर पती-पत्नी ओवसा पुजून वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेतात. गौरी पूजनानंतर रात्री गौरी गणपतीसमोर भजन, आरती, फुगड्या होतात. पारंपरिक फुगडी गातानाच नृत्य करून प्रत्येक घरातील स्त्रिया रात्रभर जागरण करतात.
दुसर्या दिवशी गौरी गणपतीला गोड नैवेद्य दाखवून व पूजा करून गौरी गणपतीचे ठरलेल्या ठिकाणी विसर्जन केले जाते. काही ठिकाणी गौरीला मांसाहारी नैवेद्यही दाखविला जातो. अनेक ठिकाणी ज्या पाणवठ्यावरून गौराईला आणतात त्याच पाणवठ्यावर गौरीचे विसर्जनही करतात. काही ठिकाणी गणपती विसर्जनाच्या ठिकाणीच गौराईचेही विसर्जन करतात. अनेक ठिकाणी पुरुष गणपती विसर्जनासाठी नदीवर तर सुवासिनी पाणवठ्यावर विसर्जन करतात.
गौरीची भाकर लई भारी…
गौरी विसर्जन केल्यावर विसर्जनासाठी उपस्थित महिला-पुरुषांना तांदळाची, नाचणीची भाकरी देण्याची प्रथा आहे. त्यासाठी एक विशिष्ट मांड (घर) ठरलेला असतो. तेथे विसर्जनानंतर सर्व ग्रामस्थ जमतात. काही ठिकाणी पाणवठ्यावरच देवीची भाकरी दिली जाते. जमलेल्यांना मग तांदूळ, नाचणीच्या भाकरीसह अळू, टाकळा, शेगूल तसेच इतर रानभाज्यांपासून बनविलेल्या भाज्या दिल्या जातात. तो प्रसाद म्हणून खाल्ला जातो. सोबत देवीचा भातही असतो. ही प्रथा आजची तरुणाई तेवढ्या आत्मीयतेने पाळत आहे.
–बापू सावंत