नाटू नाटू हा तेलगू भाषेतील शब्द आहे. मूळ चित्रपट हिंदीत डब करताना तो तस्साच ठेवल्याने वेगळेपण आले. हाच चित्रपट कन्नड व मल्याळम भाषेत डब करताना मात्र तो बदलला गेला. ते आवश्यक वाटले तसे हिंदीत का वाटले नसावे? नाटू नाटू म्हणजे डान्स डान्स अर्थात नृत्य नृत्य.
असा बदल या गाण्याच्या संगीत मीटरमध्ये फिट्ट बसला नसता. (अगोदर संगीत आणि मग त्यावर गीत अशा रचनेने गाण्याचा जन्म होऊ लागल्यापासून त्या मीटरमध्ये बसणाराच शब्द वापरावा लागतो.) आणि आता तर या गाण्याला ऑस्कर पुरस्कार प्राप्त झाल्याने तर दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट हिंदीत डब होताना असेच काही मूळ भाषेतील मुखडे हिंदीत येतील आणि ते वेगळे वाटतात म्हणून हिटही होतील.
असे साऊथ इंडियन मुखडे हिंदीत नवीन नाहीत. त्याचीही सुपर हिट वाटचाल आहे. त्यांचे हिंदीत येणं तेवढे आणि तसे बदलले. असाच एक सुपर हिट मुखडा एस. रामनाथन दिग्दर्शित ‘दो फूल’ (१९७३) या पिक्चमधील मुथ्थूकोडी कव्वाडी हडा… अय्यो यो प्यार मे हे आशा भोसले व मेहमूद यांनी गायलेले धमाल गाणे. पडद्यावर ते कोचीनच्या समुद्र किनाऱ्यावरील गावात घडते. साऊथ इंडियन रुपातील मणी (अर्थात मेहमूद) व त्याची पत्नी रुक्मिणी (रमा प्रभा) यांच्यावर ते खुललय. संगीत राहुल देव बर्मनचे आहे.
पन्नास वर्षांपूर्वी गाण्याचा असा मुखडा म्हणजे, कल्चर शॉक होता. परंपरावाद्यांनी या गाण्याकडे दुर्लक्ष केले. तेव्हाच्या नवीन पिढीने मात्र या गाण्यासाठी ‘दो फूल ‘ पुन्हा पुन्हा एन्जॉय केला. एका साऊथ इंडियन चित्रपटाची रिमेक असल्याने असे दक्षिणेकडील चालीचे गाणे हिंदीत आले. कधी अशा ‘चाली’ने आले तर कधी दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट हिंदीत डब झाल्याने आले. कधी दक्षिणेकडील नृत्य दिग्दर्शकही आला. कलेच्या क्षेत्रातील आवक जावक अशी मिलावट करीत असते. सुरुवातीस ते ऐकणे/पचवणे/अगदी गुणगुणणेही अवघड वाटते. मग मात्र ही गाणी सवयीची होतात.
असेच काही मुखडे, उर्वशी उर्वशी टेक इज इझी (हमसे है मुकाबला), लटका दिखा दिया तुमने (पुकार), मुक्काला मुकाबला है ना (हमसे है मुकाबला), टेलिफोन धून मे (हिन्दुस्तानी) अशी अनेक गाणी आहेत. यात संगीतकार ए. आर. रेहमानने जणू क्रांतीच केली. कधी त्याचे मूळ तमिळ भाषेतील चित्रपट हिंदीत डब होऊन येताना संगीताचा मूळ ढाचादेखिल आला (उदाहरणार्थ ‘रोजा’) तर स्वतंत्र संधी मिळाल्यावरही सुरुवातीस त्याच्या काही गाण्यांवर साऊथ टच दिसतो (‘रंगीला’मधील ये रामा ये क्या हुआ).. या सगळ्यात ‘बाहुबली’ने मोठाच सांस्कृतिक धक्का दिला. ‘पुष्पा’ने भारीच भर घातलीय. साऊथचा संगीत ठेका आणखीन लोकप्रिय केला.
एव्हाना चित्रपट रसिकांची ग्लोबल युगातील डिजिटल पिढी होती. ते सतत यू ट्यूबवर सर्च करीत असतानाच जे जे आवडेल ते लाईक करताहेत. आवडीनिवडीचे पटकन निर्णय घेताहेत. त्यांना फास्ट फूडचा फंडा पसंत आहे. त्यांना टेस्ट पटकन समजते आणि त्यांची टेस्ट वेगाने बदलतयं. नाटू नाटू या मुखड्यात त्यांना मनोरंजनाचा फ्लेवर सापडला. त्यांनी पटकन लाईक केले. एव्हाना साऊथ इंडियन चित्रपटातील अशी अनेक गाणी त्यांनी एन्जॉय केलीत.
आजची पिढी लहान मोठ्या प्रवासात गाणे एन्जॉय करतेय. कोणी कॉड लावून थेट कानात गाण्याला शिरकाव करु देतेय तर कोणी गाडीतील रेडिओवर ऐकतयं. आणि यू ट्यूबवर गाणे पाहणारे वेगळे. या सगळ्या सांस्कृतिक घडामोडीत गाण्याचा वेगळा मुखडा, भाषेतील मिलावट या गोष्टी ओघानेच येतात. त्या चांगल्या की वाईट यावर काथ्याकूट करण्यात डिजिटल युगात फारसा कोणाकडे वेळ नाही. म्हणूनच म्हणतो, साऊथचा मुखडा हिंदीत फिट्ट बसतोय आणि गाण्याचा तुकडा हिट होतोय (येथे तुकडा या शब्दाचा अर्थ चांगल्या अर्थाने घ्यायचाय). नाटू नाटूने एका नवीन ट्रेंडला झक्कास मार्ग आखून दिला आहे. तुम्हीदेखील साऊथ इंडियन चित्रपटातील गाणी आवर्जून एन्जॉय करीत असणारच…
दिलीप ठाकूर
glam.thakurdilip@gmail.com