Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वा. सावरकर, पं. नेहरू, म.गांधी व इंग्रज सरकार

काँग्रेसचे अनधिकृत सर्वेसर्वा राहुल गांधी यांनी सध्या स्वा.सावरकर यांच्या बदनामीची मोहीम अत्यंत जोरात चालवली आहे. स्वा.सावरकर ‘भेकड’ होते, त्यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली होती वगैरे धादांत खोटी विधाने ते सतत करत आहेत. त्यांच्या या अपप्रचार मोहिमेमुळे आता स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाची चर्चा नव्याने करणे आवश्यक ठरले असून स्वा.सावरकर, पं.नेहरू आणि म.गांधी यांनी केलेले कार्य व इंग्रज सत्ताधाऱ्यांनी या तीन नेत्यांना दिलेली वागणूक याचीसुद्धा तुलना करणे जरुरीचे ठरले आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 09, 2023 | 06:00 AM
स्वा. सावरकर, पं. नेहरू, म.गांधी व इंग्रज सरकार
Follow Us
Close
Follow Us:

प्रथम आपण स्वा.सावरकर आणि पं.नेहरू या दोन्ही महापुरुषांचा राजकीय प्रवास तुलनात्मक दृष्टीने तपासून बघू. तसे करायला लागलो की अनेक गोष्टींचे आश्चर्य वाटते. या दोन्ही महापुरुषांचे आयुष्य बहुतांशी समांतर चालले. या दोघांचाही आयुष्याचा कालखंड (स्वा.सावरकर स.१८८३ ते १९६६, तर पं.नेहरू स.१८८९ ते १९६४) एकच आहे. या दोघांनीही भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाच्या भूमिका बजावल्या, आंदोलने केली व त्याबद्दल तुरुंगवासदेखील भोगला. या दोघांनीही आपल्या राजकीय भूमिकेची सुस्पष्ट वैचारिक मांडणी केली, जी आजतागायत चर्चेत आहे. या दोघांचे विचार मान्य असोत किंवा नसोत, पण त्यांच्या विचारांची दखल न घेता भारतीय राजकारणाची चर्चा करता येत नाही. दोघांनीही भारताच्या इतिहासावर लेखन केले. या सगळ्या तुलनेतला महत्वाचा भाग हा हा आहे की, हे दोघेही महापुरुष नेहमीच एकमेकांच्या विरुद्ध टोकावर उभे होते. त्यांच्या जीवनातील काही समांतर गोष्टी समोरासमोर ठेवून ही तुलना जर केली तर एक वेगळेच चित्र आपल्यासमोर उभे रहाते.

सुरुवात जन्मस्थानापासून

स्वा. सावरकरांचा जन्म नाशिकजवळ भगूर नावाच्या लहानशा गावात झाला. त्यांचे मातापिता हे महाराष्ट्र किंवा देशातल्या त्यावेळच्या कोणत्याही सामान्य कुटुंबासारखे एक कुटुंब होते. पण त्यांचे जन्मस्थळ असलेला भगूर येथील वाडा आजही ‘सावरकर स्मारक’ म्हणून उभा आहे, हजारो नागरिक त्या वाड्याला भेट देऊन दर्शन घेत असतात. स्वा.सावरकरांशी संबंधित कोणत्याही वास्तूचे जतन केंद्रीय अथवा राज्य सरकारने ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून केलेले नाही.
पं. जवाहरलाल नेहरूंचा जन्म अलाहाबादमध्ये झाला. दीडशे वर्षांपूर्वीसुद्धा अलाहाबाद हे भारतातले एक मोठे व महत्वाचे शहर होते. त्यांचे पिताजी पं. मोतीलाल नेहरू अलाहाबादमधील एक नामवंत वकील होते. आपल्या मुलाला शिक्षण देण्यासाठी त्यांनी एक युरोपियन अध्यापक घरात ठेवला होता. पण पं. जवाहरलाल नेहरूंचा जन्म जिथे झाला ते घर आज कोणालाही माहित नाही. त्यांचा जन्म कोणत्या घरात झाला याचा ठोस तपशील उपलब्ध नाही. त्यांचा जन्म झालेले घर अलाहाबाद नगरपालिकेनेसुद्धा जतन केलेले नाही. ‘आनंदभवन’ या भव्य प्रासादात ते वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षी रहायला गेले. हे ‘आनंदभवन’ मात्र राष्ट्रीय स्मारक आहे. त्याशिवाय पंतप्रधान म्हणून त्यांनी वापरलेले नवी दिल्लीतील ‘त्रिमूर्ती भवन’ हे देखील ‘राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन केलेले आहे. स्वा.सावरकरांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण नाशिक व पुण्यात झाले. नंतर वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी ते १९०६ साली इंग्लंडला गेले. त्यांच्या शिक्षणासाठी श्यामजी कृष्ण वर्मांनी शिष्यवृत्ती दिली होती. त्यांच्याच ‘इंडिया हाऊस’ या भारतीय विद्यार्थ्यांसाठी चालवलेल्या वसतिगृहात ते रहात होते. भारतीय क्रांतीकारकांना मदत केल्याच्या आरोपावरून सन १९१० साली त्यांना अटक केली गेली व त्यांची भारतात रवानगी झाली. त्यांचे शिक्षण पूर्ण झालेले असूनही ‘बॅरीस्टर’ पदवी त्यांना दिली गेली नाही. पं. जवाहरलाल नेहरू शालेय शिक्षण घेण्यासाठी १९०५ साली इंग्लंडला गेले. लंडनच्या अत्यंत प्रतिष्ठीत अशा हॅरो पब्लिक स्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. सन १९०७ मध्ये त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठाच्या ‘ट्रिनिटी स्कूल’मध्ये प्रवेश घेतला. १९१२ साली ‘बॅरीस्टर’ पदवी घेऊन ते भारतात परतले.

लंडनमध्ये असताना स्वा. सावरकरांनी १९०९ साली ‘The Indian War Of Independence Of 1857’ हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाच्या लेखनासाठी त्यांनी अस्सल ब्रिटीश कागदपत्रांचा वापर केला होता. ‘१८५७ साली भारतात जे घडले ते केवळ ‘Mutiny of Sepoy’ नव्हते तर ते भारतीयांचे स्वातंत्र्ययुद्ध होते’ हे त्या ग्रंथाने प्रस्थापित केले. इंग्रज सरकारने त्या पुस्तकावर बंदी घातली होती. त्याच मुक्कामात स्वा. सावरकरांनी लिहिलेला ‘शिखांचा इतिहास’ या ग्रंथावरही बंदी घातली व त्याचे हस्तलिखित जप्त केले होते.

१९०५ ते १२ या इंग्लंडच्या वास्तव्यात पं. नेहरूंनी कोणताही ग्रंथ लिहिला नव्हता. त्यांनी ‘Discovery Of India’ हा ग्रंथ १९३४ नंतर, महाराष्ट्रातील अहमदनगर येथे तुरुंगात असताना लिहिला. त्या ग्रंथाच्या लेखनासाठी त्यांनी मागितलेले सर्व संदर्भ ग्रंथ इंग्रज सरकार त्यांना तुरुंगात पुरवत होते. हा ग्रंथ १९४६ साली प्रसिद्ध झाला. या ग्रंथात १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाला फारसे स्थान दिलेले नाही. पं. नेहरूंच्या कोणत्याही पुस्तकावर इंग्रज सरकारने कधी बंदी घातली नव्हती.१९१० साली स्वा. सावरकरांना इंग्लंडमध्ये अटक झाली. त्यांना भारतात आणून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवून त्यांना काळ्या पाण्याच्या एकंदर पन्नास वर्षांच्या दोन सजा ठोठावल्या गेल्या. १९११ साली त्यांची रवानगी अंदमानला झाली. त्याच वेळेला त्यांचे दोन्ही भाऊ देखील काळ्या पाण्याची सजा भोगत अंदमानमध्येच होते. तिथे त्यांना काळ कोठडी, सहा महिने एकांतवास, संपूर्ण एक आठवडा हातापायात बेड्या घालून उभे ठेवणे, कोलू चालवणे इत्यादी सर्व प्रकारच्या छळाचा सामना करावा लागला. १९२१ साली, सुमारे ३६०० दिवस तुरुंगात काढल्यानंतर त्यांची अंदमानमधून सुटका झाली, पण रत्नागिरीत स्थानबद्ध म्हणून रहावे लागले. १९३७ नंतर त्यांच्या हालचालींवर घातलेली बंधने बऱ्याच प्रमाणात कमी झाली. स्वा. सावरकरांच्या आयुष्यातील एकूण सव्वीस वर्षे कोणत्या ना कोणत्या प्रकारे बंदिवासात गेली. तुरुंगात असताना स्वा.सावरकरांना कोणीही कुटुंबीय भेटू शकले नाहीत. त्यांनी लिहीलेली पत्रे तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी कधीही कुटुंबियांना पाठवली नाहीत आणि कुटुंबियांची पत्रे त्यांना मिळू दिली नाहीत. याच काळात त्यांच्या थोरल्या वहिनींचा मृत्यू झाला. त्यावेळेला कुटुंबियांना भेटू देणे तर दूरच राहिले, या बातम्यासुद्धा इंग्रज सरकारने त्यांना दिल्या नाहीत.

पं.जवाहरलाल नेहरुंना पहिली अटक १९२१ साली झाली. तेव्हापासून एकूण नऊ वेळा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. त्यांच्या आयुष्यातील एकूण ३२५९ दिवस म्हणजे सुमारे ८वर्षे ११ महिन्यांचा काळ तुरुंगात गेला. इंग्रजांनी पं.नेहरूंना लखनौ, नैनी, डेहराडून, अलीपूर (कलकत्ता), गोरखपूर, अल्मोरा, नाभा, बरैली, अहमदनगर (महाराष्ट्र) या तुरुंगांमध्ये ठेवले होते. त्यापैकी त्यांच्या राहत्या शहरापासून अहमदनगर हेच सर्वात दूरचे स्थान होते. नैनी, डेहराडून, अल्मोरा, नाभा ही सर्व थंड हवेची ठिकाणे होती. इंग्रज सरकारने पं.नेहरुंना कायम श्रेणी १ च्या राजबंद्याचा दर्जा दिला होता. त्यांचे कुटुंबीय त्यांना कधीही भेटू शकत होते. बहुतेक वेळा त्यांना शासकीय विश्रामगृहात कैदी म्हणून ठेवत असत. त्यांचे पिताजी पं. मोतीलालजी नेहरू (सन १९३१) व पत्नी कमला नेहरू (सन १९३६) या दोघांचेही निधन झाले तेव्हा दोन्ही वेळेला जवाहरलालजी अटकेत होते. पण ‘शिक्षा पूर्ण होण्यापूर्वी’ इंग्रज सरकारने त्यांना सोडले होते. त्यामुळे त्या दोन्ही प्रसंगी जवाहरलालजी आपले पिताजी व पत्नी यांच्या मृत्युशय्येपाशी हजर होते. ‘आजारी पत्नीला भेटण्यासाठी’ नेहरुंना पाच वेळा पॅरोल मिळाला होता. पत्नी कमला नेहरू अखेरच्या काळात उपचारांसाठी युरोपला गेल्या होत्या. ४ सप्टेंबर १९३५ रोजी, साडेपाच महिन्यांची शिक्षा बाकी असताना इंग्रज सरकारने पं.नेहरूंची अचानक सुटका केली. त्याच संध्याकाळी ते विमानाने युरोपला रवाना झाले. श्रीमती कमला नेहरू यांचा मृत्यू जर्मनीत फेब्रुवारी १९३६ मध्ये झाला. हा सर्व काळ पं.नेहरू त्यांच्याबरोबर युरोपमध्ये होते. फ्रँक मोराईस यांनी लिहिलेल्या नेहरूंच्या चरित्रामध्ये याबाबतचा सर्व तपशील दिलेला आहे. तुरुंगात असताना पं.नेहरू अनेकांना पत्र पाठवत असत, त्यावर काही बंधन नव्हते. आपली कन्या इंदिरा हिला त्यांनी पाठवलेल्या पत्रांचा संग्रह प्रसिद्ध आहे. अशा कौटुंबिक पत्रांखेरीज ते राजकीय पत्रेही पाठवत असत. पं.नेहरुंच्या पत्रव्यवहाराला इंग्रज सरकारने कधीही आडकाठी केली नव्हती. स्वा. सावरकरांनी तुरुंगवासाच्या काळात अनेक कविता तुरुंगाच्या भिंतींवर खिळ्यांनी किंवा कोळशाने लिहून ठेवल्या. त्यांना इंग्रज सरकारने लेखन साहित्य, पुस्तके, वर्तमानपत्रे यापैकी काहीही, कधीही दिले नाही.

स्वा.सावरकर व पं.नेहरू यांच्या संदर्भातील सर्वात शेवटचा मुद्दा !
स्वा.सावरकरांच्या दोन्ही भावांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. तिघेही बंधू एकाच वेळेला अंदमानच्या तुरुंगात होते. त्यांची सर्व मालमत्ता इंग्रज सरकारने जप्त केली होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या तिघांपैकी कोणाचीही अपत्ये किंवा वारस आपल्या पित्याच्या अथवा चुलत्याच्या त्यागाचा वारसा सांगत राजकारणात आला नाही. वाडवडिलांच्या त्यागाची परतफेड मिळवायला समाजाकडे गेला नाही. त्यांची नावेसुद्धा आज कोणाला सांगता येणार नाहीत. म.गांधींना इंग्रजांकडून मिळणारी वागणूकसुद्धा पहाण्यासारखी आहे. १२ मार्च १९३० रोजी म.गांधींनी सुप्रसिद्ध दांडी यात्रा व मिठाचा सत्याग्रह सुरु केला. ४ मे १९३० रोजी इंग्रज सरकारने त्यांना अटक करून महाराष्ट्रातील येरवडा तुरुंगात ठेवले. या तुरुंगातून आपल्या सहकाऱ्यांना त्यांनी पाठवलेली अनेक पत्रे उपलब्ध आहेत. महात्माजींचे असेच एक पत्र ‘Malaya Tribune’ या दैनिकाने १६ जून १९३० रोजी प्रसिद्ध केले होते. त्या पत्रात महात्माजींनी आपली दिनचर्या दिली आहे. ते म्हणतात, ‘मी रोज पहाटे आपल्या आश्रमाच्या वेळेवर उठतो. मला उजेडाची व्यवस्था करून दिलेली असल्यामुळे माझे गीता वाचन होते. … मी रोज सकाळी व दुपारी काही वेळ झोपतो… माझ्या रोजच्या आहारात शेळीचे दूध, संत्री, खजूर व मनुका असतात. माझ्या आहाराची काळजी करण्याचे कारण नाही… आता माझी तब्येत सुधारते आहे. आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था आहे. शेळीचे दूध काढायला तसेच रोजची भांडी साफ करायला मला एक माणूस दिलेला आहे.’

माधव भांडारी
madhav.bhandari@yahoo.co.in

Web Title: Special article on vinayak damodar savarkar pandit neharu mahatma gandhi and british government nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2023 | 06:00 AM

Topics:  

  • british government
  • indian politics

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.