वर्षानुवर्षे लहान मोठ्या अशा सर्वच स्तरांतील कलाकाराच्या लग्नाची बातमी खुद्द मनोरंजन क्षेत्र, मीडिया आणि चित्रपट रसिकांना महत्त्वाची वाटत आली आहे. अनेकदा तर सिनेमापेक्षाही जास्त ‘नटीचं लग्न’ गाजलं (हेमा मालिनीने धर्मेंद्रसोबत केलेले लग्न असेच गाजले.
तो विवाहित असूनही ती त्याच्या प्रेमात पडली आणि तत्पूर्वी जितेंद्रशी तिचे लग्न होता होता राहिले होते) आणि इतक्यावरच ही ‘लग्नाची स्टोरी’ थांबत नाही तर लग्नाभोवतीचे चित्रपट (राजश्री प्रॉडक्शन्सचा सर्वकालीन सुपरहिट अशा सुरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ‘हम आपके है कौन ‘…. याच्या यशाने समाजातील सर्व स्तरातील लग्नात मेहंदी, संगीत अशा गोष्टी रुजवल्या.
उच्चभ्रू वर्गासाठी लग्न म्हणजे एक इव्हेन्टस केला), मालिकेतील लग्न सोहळा (‘तुझी माझी रेशीमगाठ’ अगदी ताजे उदाहरण), लग्नाचे रिॲलिटी शो (स्टार भारत या वाहिनीवर सुरु होत असलेला मिका सिंग याचा ‘स्वयंवर मिका दी वोटी’ हा मसालेदार मनोरंजक संगीतमय शो) असा हा चौफेर प्रवास सुरु आहे.
मिका सिंग या शोमध्ये बारा जणींमधून आपली पत्नी निवडणार आहे. म्हणजे एक प्रकारची ग्लॅमरस स्पर्धाच. मिका सिंगचा चाहतावर्ग सर्वदूर पसरलाय त्यामुळे या शोचा सतत चढता टीआरपी निश्चित. आणि याचसाठी तर असतो सगळा अट्टाहास.
मनोरंजन क्षेत्रातील ‘लग्नाची गोष्ट’ अथवा अनेक गोष्टी/लग्नाची गाठ सांगताना कधी आश्चर्याचा धक्काही बसला आहे.
दिलीपकुमार आणि सायरा बानू यांचे लग्न त्या काळात (म्हणजे १९६६ साली) मोठाच धक्का होता. तात्कालिक फिल्मी मॅगझिनमधून सायरा बानूकडे राजेंद्रकुमार आकृष्ट होत असल्याच्या खमंग रुचकर बातम्या असताना अचानक दिलीपकुमारने सायरा बानूला होकार देणे आश्चर्यकारक गोष्ट होती. विशेष म्हणजे तोपर्यंत त्यांनी एकाही चित्रपटात एकत्र भूमिका साकारली नव्हती. लग्नानंतर ते ‘गोपी’ (१९७०) या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र आले.
अशीच आणखी एक रोमांचित करणारी गोष्ट म्हणजे शनिवार दिनांक २४ मार्च १९७३ची सकाळ झाली तीच एका अतिशय गोड तरी आश्चर्यकारक बातमीने. एका मराठी वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर फोटोसह बातमी होती, राजेश खन्ना आणि डिंपल कापडिया यांचा वाड्निश्चय.
अहो, तो काळ विशेषतः सत्तरचे दशक कसे होते माहित्येय? तेव्हा वृत्तपत्रात फक्त आणि फक्त शुक्रवारी चित्रपट सदर प्रसिद्ध होई, त्यात विश्वसनीय समिक्षा (ती वाचून चित्रपट पहायचा की नाही हे नक्की ठरवता येई) व चित्रपट प्रॉडक्शन्सच्या बातम्या असत आणि काही विशेष लेख असेल तरच रविवार पुरवणीत जागा मिळे. यावरुन राजेश खन्ना डिंपलच्या साखरपुड्याच्या बातमीला ‘बातमीला वृत्त संपादकाने दिलेले महत्व लक्षात घ्या.
बातमीतील मजकूरात लाखो तरुणींच्या ह्रदयात स्थान निर्माण केलेला राजेश खन्ना वगैरे वगैरे बरेच काही म्हटले होते. तोपर्यंत डिंपल कपाडिया म्हणजे राज कपूर निर्मित आणि दिग्दर्शित ‘बॉबी’ची ऋषि कपूरची नायिका (त्यात तिचा तो पहिला चित्रपट) इतकेच सगळ्यांना माहित होते. आणि ते पुरेसे ठरत होते. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले होते आणि त्याच्या प्रदर्शनाच्या तारखेकडे राज कपूरच्या सर्वच चित्रपटांप्रमाणेच याही चित्रपटाकडे सगळ्यांचे लक्ष होते.
तत्पूर्वीच डिंपलने राजेश खन्नाशी लग्न करावे हा कल्चर शॉक होता आणि तो पहिल्या पानावरच्या बातमीने दिला होता. या लग्नानंतर ‘बॉबी’ २८ सप्टेंबर १९७३ रोजी प्रदर्शित झाला आणि पहिल्याच शोपासून त्याला रसिकांनी उत्स्फूर्त रिस्पॉन्स दिला. पण या ‘लग्नाच्या गोष्टी’त एक ट्वीस्ट आहे. राजेश खन्ना आणि अंजू महेंद्रू यांच्या मैत्रीच्या गोष्टी सगळीकडे पसरल्या होत्या आणि अशातच अचानक राजेश खन्नाने डिंपल कापडियाशी लग्न केले होते.
सोनाली कुलकर्णी (लग्नानंतर करियर आणि विदेशात भटकंती यांचा छान समतोल ठेवलाय) रुचिता जाधव (ही प्रचंड सकारात्मक आहे हे सोशल मीडियातील तिच्या फोटोत सातत्याने दिसतेय), दिया मिर्झा, अभिज्ञा भावे, ह्रता दुर्गुळे, रसिका सुनील (हिने गोव्यात अतिशय स्टाईलीश लग्न केले आणि पतीसोबत अमेरिकेला गेली. तेथेच जमलं म्हणा) यांनी आपल्या लग्नाची ‘गोड बातमी’ सोशल मीडियात ग्लॅमरस फोटोसह दिली आणि त्यांच्यावर लाईक्स, कमेन्टस, शेअर यांचा जबरदस्त वर्षाव झाला.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोन यांनीही युरोपमध्ये धूमधामसे आणि बहुखर्चिक (बिग बजेट) लग्न करुन ‘जगाच्या पाठीवर’ आपण आपले ‘लग्न सोहळे’ (अथवा इव्हेन्टस) साजरे करु शकतो याचा जणू धडा घालून दिला. कैतरिना कैफ आणि विकी कौशल कधी लग्न करतील असे अजिबात वाटले नाही.
पण हिंदी चित्रपटातच एक संवाद असतो ना, होनी को कौन टाल सकता है… ते त्यांनी राजस्थानातील माधोपूर येथील एका राजवाड्यात करताना आपल्या चालीरिती, पध्दती, परंपरा, मूल्ये त्यांनी जपली आणि कलरफुल इव्हेन्टसचा फिल आलेला आपला लग्न सोहळा छान एन्जॉय केला… रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या बातमी धक्कादायक नव्हती.
काही वर्षांपूर्वी वाटले होते की दीपिका पादुकोन कपूर खानदानाची सून बनेल, मग कैतरिना कैफ तर नक्कीच त्यात यशस्वी होईल असे वाटले. पण ते राहूनच गेलं. प्रेमाची पटकथा लग्नाकडे जाताना क्लायमॅक्स बदलू शकतो.
राजेश आणि डिंपलच्या लग्नाची मीडियात आणि समाजात “रेकॉर्ड ब्रेक” चर्चा रंगली. या लग्नाचा जुहूच्या होरायझन हॉटेलमधील (आताचे नोव्होटेल) स्वागत सोहळा सकाळपर्यंत चालला वगैरे वगैरे बातम्या राजेश खन्नाच्या सुपर स्टार क्रेझला आणि पोझिशनला साजेशा होत्या.
या लग्नानंतर काही महिन्यांतच अमिताभ बच्चन आणि जया भादुरी (३ जून), लेखक, गीतकार आणि दिग्दर्शक गुलजार आणि राखी (त्यानंतर ती राखी गुलजार या नावाने ओळखली जाऊ लागली) निर्माता आणि दिग्दर्शक शोमु मुखर्जी (फिल्मालय स्टुडिओचे आणि त्याचे मालक मुखर्जी कुटुंबाचे चित्रपटसृष्टीला खूपच देणं आहे) आणि तनुजा यांच्या विवाहांनी ‘चित्रपट कलाकारांच्या लग्नाचे गोड वातावरण’ कायम राहतानाच ते आपोआप रुजलेही आणि तेव्हापासून जवळपास प्रत्येक कलाकाराच्या लग्नाची बातमी होऊ लागली.
रेखाने जुहूच्या एका देवळात अतिशय साधेपणाने दिल्लीतील उद्योगपती मुकेश अगरवाल याच्याशी केलेला विवाह मोठा धक्काच होता. पण युरोपमध्ये हनिमूनला जाऊन आल्यावर मुकेश अगरवालने अचानक आत्महत्या करुन रहस्य निर्माण केले. पण तो विषय तेथेच संपला. माधुरी दीक्षितने अमेरिकेत लग्न केल्याचे तिचा सेक्रेटरी रिक्कू अर्थात राकेशनाथ याने ‘आज तक’ या उपग्रह वाहिनीशी बोलताना सांगितले (५ नोव्हेंबर १९९९ रोजी).
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात यावर तुमचा विश्वास असो अथवा नसो. मनोरंजन क्षेत्रात अनेकदा काही वेगळेच पहायला मिळतेय आणि म्हणूनच तर त्याची ‘स्टोरी’ बनते. (आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल मीडियात स्टोरी शब्द खूप महत्त्वाचा आहे.) अगदी मनोरंजन उपग्रह वाहिनीवर लग्नाच्या शोचे सातत्याने आयोजन होतेय आणि त्यात स्पर्धक चक्क भाग घेताहेत. अतिशय चांगली गोष्ट आहे ही. काय सांगावे, एखाद्या शोमधून एकादे खरेखुरे लग्न जमेलही आणि त्याच शोच्या ‘सेटरुपी मांडवात’ त्यावर अक्षता पडतील.
दिलीप ठाकूर
glam.thakurdilip@gmail.com