
नाटककार दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांचा रंगप्रवास हा विलक्षण नाट्यपूर्ण म्हणावा लागेल. चाळीस वर्षापूर्वी तरुणाईचा संचार असलेले ‘टुरटूर’ ते आज चाळीस वर्षानंतर वयोवृद्धांना सावध करणारे ‘सुमी आणि आम्ही!’. हा बदल काळानुरुपच. बदलता काळ आणि त्याचं भान ठेवून पुरुंची प्रत्येक नाट्यनिर्मिती दिसली आहे. गेल्या फेब्रुवारीला ‘टुरटूर’च्या चाळीसी निमित्याने कट्टयावर गप्पा रंगल्या आणि आज साठी पार केलेल्यांच्या वयात जणू वीसवर्षाचा उत्साह संचारला! हे नाटक, त्याची संहिता, त्या भोवतीच्या आठवणी या संपता -संपत नव्हत्या. ज्या नाट्यजागरात भूतकाळात घेऊन जात होत्या. निवृत्तीच्या वयातही शालेय वयात नेत होत्या… आनंदाचे क्षण वेचिता ‘टुर’ आली.. टूर निघाली …
चिखलवाडीपासून ते षण्मुखानंद सभागृहापर्यंत आणि एकांकिकेपासून ते व्यावसायिक नाटकांपर्यंत अनेकांना ओळख देणारे ‘टुरटूर’ हे नाटक म्हणजे मराठी रंगभूमीवरल्या वेगळ्या विनोदी शैलीतलं एक वळणावरलं नाटक! ज्यामुळे तरुणाईला रंगभूमीवर प्रवेश करण्यासाठी नवी हक्काची वाट मिळाली.
चाळीसएक वर्षे उलटली. त्यातले रंगकर्मी आज सत्तरीपर्यंत पोहोचले; पण त्यांच्या जीवनातील नाट्यपूर्ण ‘टुरटूर’ ही जणू टर्निंग पॉईंट ठरली. त्यातला तरुणाईचा स्पर्श आजही त्यांना आणि रसिकांनाही तरुण करतो. कायम खुणावतो.
‘टुरटूर’ हे नाटक. ज्याचा शुभारंभ हा एकांकिकेपासून झाला. १९७५ च्या सुमारास जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट्सच्या त्यावेळेच्या हौशी विद्यार्थ्यांनी ती सादर केली. इंटरकॉलेज स्पर्धेतही त्याचा प्रयोग झाला. एका वेगळ्या शैलीतली ‘फ्रेश’ एकांकिका म्हणून ती रसिकांनी डोक्यावर घेतली. ‘या मंडळी सादर करू या’ या हौशी संस्थेची उभारणी त्यातूनच करण्यात आली. आणि बघता – बघता मुंबईत पन्नासएक प्रयोग झाले. एकांकिकेचे प्रयोग आणि त्याची मागणी वाढत होती. अखेर ‘चौरंग’ संस्था स्थापन झाली ‘टुरटूर’ चार शुभारंभी पूर्ण दोन अंकी प्रयोग व्यावसायिक रंगभूमीवर रविवार, २७ फेब्रुवारी १९८३ या दिवशी साहित्य संघात झाला आणि नाबाद शंभरावा प्रयोगही ९ नोव्हेंबर१९८३ या दिवशी शिवाजी रंगमंदिरात दिमाखात करण्यात आला. प्रस्थापित मंडळींना बुकिंगचे आकडे थक्क करणारे होते.
पहिल्या १०० प्रयोगातील रंगकर्मींच्या नावावरून नुसती नजर फिरवली, तरीही हे लक्षात येते की, या साऱ्यांनाच ‘टुरटुर’ नाटकाने रंगभूमीची बंद दारे सताड उघडी करून दिली. त्यावेळी सारे हे विद्यार्थीदशेतून नुकतेच बाहेर पडत होते. एक ‘व्यवसाय’ म्हणून साऱ्यांनीच नाट्यसृष्टीत पदार्पण केले. लेखन, दिग्दर्शन, संगीत या साऱ्या जबाबदाऱ्या पुरुषोत्तम बेर्डे यांच्याकडे होत्या. या नाटकानंतर त्यांच्यातला रंगकर्मींने मागे वळून बघितलं नाही. कल्पकतेच्या जोरावर नाटक, सिनेमा, जाहिरात याक्षेत्रात आपले एक मजबूत विश्व जसं उभं केलं. पहिल्या १०० प्रयोगांत सुधीर जोशी (प्राध्यापक सुटेकर), चित्रा पालेकर, पद्मश्री जोशी (क्लीनर), लक्ष्मीकांत बेर्डे (ड्रायव्हर देवांग), विजय कदम (कंडक्टर मयेकर), विजय चव्हाण (शहा), हरीश तुळसुलकर, विजय केंकरे, अजय वढावकर (घारगळकर), चेतन दळवी (सिंध), संदीप कश्यप, प्रदीप पटवर्धन, अशोक पाटील (मूर्ती), प्रकाश निमकर (घडियाली), दीपक शिर्के (काळा माणूस), मंगेश दत्त (शाहीर), प्रशांत दामले (शाहीर दोन आणि बंगली) ही रंगभूमीवरील टीम आणि नेपथ्य – वेशभूषा रघुवीर कुल तर प्रकाशयोजना गिरीधर मोरे, ही मंडळी होती. सारे जण एका सुवर्णयुगाचे साक्षीदार ठरले. एका चौकटीतून नाटक वेगळ्या रंगरूपात आणण्यामागे कॅप्टन ऑफ शिप ‘पुरुषोत्तम बेर्डे’ यांनी दमदारपणे पाऊल टाकले. नवी ऊर्जा ही मरगळलेल्या वातावरणात त्यामुळे शिरली. रंगभूमीवर तरुण रंगकर्मींचे नवे आविष्कार सुरू झालेत या आशेने सारे जण बघू लागले.
नाटककार आणि दिग्दर्शक हा जर एकच असेल तर नाटककारावर दिग्दर्शक मात करतो. संहितेपेक्षा प्रयोग हा वेगळाच वाटतो. संवादापेक्षा त्याचे सादरीकरण वेगळ्या वाटेचे वाटते. ‘टुरटूर’च्या बाबतीत हेच घडलं आहे. प्रत्यक्ष नाट्यसंहितेपेक्षा त्याचा प्रयोग अधिक नव्या दालनात घेऊन जातो. याबद्दल ‘टू इन वन’ असलेले पुरुषोत्तम बेर्डे यांनी म्हटलंय की, ‘टुरटूर’ हा नाट्यप्रकार लिहिताना माझ्यातल्या लेखकाने बऱ्याचशा जागा दिग्दर्शकासाठी आणि कलावंतासाठी राखून ठेवल्या आहेत. त्या त्या जागांवर योग्य ते संस्कार झाल्यास हा एक मनोरंजन नाट्यप्रकार होऊ शकेल याची मला खात्री होती. त्या बाबतीत विशेषतः ‘टुरटूर’ च्या कलावंतांची कामगिरी फारच मोलाची आहे!
‘टुरटूर’च्या संहितेचं पुस्तक हे १९८४ चाली ‘मॅजेस्टिक’ने प्रकाशित केलं. अनेक आवृत्याही निघाल्या. गिरगावच्या बुक स्टॉलवरून पुस्तक खरेदी करून प्रयोगाला हजेरी लावणारेही जाणकार रसिक त्यात होते. हे पुस्तक बेर्डे यांनी ‘सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट आणि’ या मंडळी सादर करू या’ या त्यांच्या हौशी नाट्यसंस्थेला अर्पण करून कृतज्ञताही व्यक्त केली. ‘टुरटूर’चा खरा प्रवास हा एकांकिका ते नाटक असा आहेच; पण तो कॉलेज ते हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीपर्यंतचा एक दीर्घ प्रवास असल्याचाही बेर्डे म्हणतात. त्यानंतर त्याच वाटेवरून अनेक नाटके आली आणि हा रस्ता हमरस्ता बनला. विशेषतः आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेकडे व्यवसायिक नाट्यनिर्मात्यांचा नजरा लागल्या. आजही ‘पोरांचं नाटक’ म्हणून न बघता त्यात व्यावसायिक मूल्य आहेत काय, याकडे गंभीरपणे बघितलं जात आहे आणि याची खऱ्या अर्थाने सुरुवात ‘टुरटूर’पासून झालीय.
‘टुरटूर’ नाटकातील सर्वच कलाकारांवर स्वतंत्रपणे लिहिता येईल, येवढी त्यांनी रंगभूमीवर भरीव कामगिरी केलीय. त्यातील प्रशांत दामले! मराठी रंगभूमीवरला विनोदाचा बादशहा ठरला. त्याचे पहिले व्यावसायिक नाटक हे ‘टुरटूर’च! त्यानंतर त्याने रंगभूमीवर दहा हजार प्रयोगांचा विश्वविक्रम करून आपली कारकीर्द ऐतिहासिक सिद्ध केलीय. आजही त्याची वाटचाल वेगात सुरू आहे; पण ‘टुरटूर’च्या जुळवाजुळवीच्या वेळी शास्त्रीय संगीताचा बेस असलेल्या एका मुलाच्या शोधात बेर्डे होते. घाऱ्या डोळ्याच्या गोऱ्यागोमट्या एका मुलाचा शोध अखेर लागला. ‘नाव काय रे तुझं?’ असा प्रश्न बेर्डे यांनी विचारला तो म्हणाला, ‘प्रशांत दामले’ आणि ‘टुरटूर’मध्ये भूमिका दिली. ३०० प्रयोगांत शाहीर बनवलेला प्रशांत नंतर ‘मोरूची मावशी’ यात रीतसर परवानगी घेऊन गेला. ज्याला एकेकाळी ‘काय रे, तुझं नाव काय?’ विचारलं होतं. त्याचं नाव आज विश्वविक्रमी ठरलंय. ‘प्रशांत’ रंगभूमीची ओळख बनलाय आणि दोन शतके मराठी नाट्य आणि सिनेसृष्टी गाजविणारा रसिकांचा लाडका लक्ष्मीकांत बेर्डे यालाही ‘टुरटूर’मुळेच ओळख मिळाली. डझनभर हिंदी आणि मराठी चित्रपटांतून त्याने चमक दाखविली. विनोदाचं नेमक आणि अचूक टायमिंगचं गणित हे लक्ष्याला ‘टुरटूर’मुळेच गवसले याचा उल्लेख तो वारंवार करायचा. ‘मराठी का कॉमेडी स्टेज आर्टिस्ट’ म्हणून त्यांने हिंदी सिनेसृष्टीत आपलं वलय निर्माण केलं होतं.
नाटककाची सारी जुळवाजुळव झाली; पण त्यात आवश्यक असलेला उंच, कठोर, काळाकुट्ट, माणूस काही केल्या मिळेना. पहिला अंकही तिला तालमीत उभा राहिला; पण काळया माणसांची शोधमोहिम ही युद्धपातळीवर सुरूच होती. अखेर त्यावेळचे व्यवस्थापक दिलीप जाधव यांनी त्यांच्या गिरगावातील मटणाच्या दुकानात सकाळी दिसणाऱ्या धिप्पाड तरुणाला बेर्डेपुढे उभा केला; पण दिसण्यापलीकडे त्याच्यात तसं काही एक नसल्याचे दिसून आले. अखेर ‘प्रयत्नार्थी भूमिका’ असे झाले आणि मग गुंड, पाटील आणि मुलीचा बाप अशा तिन्ही भूमिका ताकदीने त्याने केल्या. तो काळा मुलगा म्हणजे नंतर गाजलेला खलनायक दीपक शिर्के! त्यानंतर त्याने नाटक चित्रपटात आपल्या अभिनयाची चमक दाखविली, त्याच्यातील कलाकार घडविण्यासाठी ‘टुरटूर’ महत्त्वाचा टप्पा व पाया ठरला होता.
३० रुपये मानधनापासून सुरू झालेला या नाटकाचा प्रवास हा शेवटच्या प्रयोगाला प्रत्येक जण स्वतःच्या मालकीच्या गाडीतून येईपर्यंत चालला, या ‘टुर’मधल्या अनेक जणांनी साथ सोडली आहे. काळाआड गेले. लक्ष्या, सुधीर जोशी, मंगेश दत्त, विजय चव्हाण, रवींद्र बेर्डे, दीपक शिर्के अशा अनेकांच्या आठवणी चटका लावून जातात.
‘टुरटूर’ हे नाटक नाट्य अभ्यासकांसाठीही पुढे आले. मुंबई विद्यापीठाच्या अॅकॅडमी ऑफ थिएटरतर्फे त्याचे मध्यंतरी प्रयोग झाले, त्यात चक्क एक फ्रेंच मुलीनेही भूमिका केली होती. अनेक भाषांमध्ये आणि नाट्य अभ्यासक्रमात या नाटकाचा समावेश करण्यात आला. सांस्कृतिक ‘देवाण-घेवाण’ प्रकल्पातूनही हे नाट्य तसे सातासमुद्रापार पोहोचले. आजवर हजारो प्रयोगांनी या नाटकाने व्यावसायिक रंगभूमीवर ‘हाऊसफुल्ल’ चे बोर्ड फडकविले.
‘टुरटूर’ नाटकाचे काही वर्षे व्यवस्थापन सांभळणारे दिलीप जाधव यांनी १९८७ साली स्वतःची ‘अष्टविनायक’ ही नाट्य निर्मिती संस्था स्थापन केली. ‘टुरटूर’च्या व्यवस्थापनाच्या शिदोरीवर अनेक दर्जेदार नाटकांची निर्मिती करणारे निर्माते म्हणून त्यांनी स्वतःच्चा ठसा उमटविला.
२७ फेब्रुवारी १९७३ साली सुरू झालेली ही ‘टुरटूर’ ३ मार्च १९९५ रोजी शेवटचा प्रयोग करून संपली. या कालावधीत अनेक रिप्लेसमेंटही झाले. कलाकारांचे वयही वाढले. विजय कदम यांचा विवाहही याच ‘टुर’मध्ये पद्मश्री जोशी हिच्याशी ठरला. ‘टुरटूर’च्या प्रवासातूनच या दाम्पत्याचा जीवनप्रवास सुरू झाला.
अजय वढावकर, अतुल परचुरे, संजय मोने, अविनाश खर्शिकर, केदार शिंदे अशा कलाकारांनी ‘टुरटूर’मध्ये कमी भूमिका केल्यात. या नाटकाशी आपलं नातं जपलंय. या नाटकाच्या प्रवासात सारंकाही सरळ, सहज, अलबेल आहे, असं नाही तर अडचणी, संकटेही बरीच आली; पण नटराजाच्या कृपेने ती पार पडली. त्यातून मार्ग निघाला.
‘टुरटूर’च्या पहिल्या प्रयोगापासून भूमिकेसाठी सज्ज असलेले प्रकाश निमकर यांनी तर या नाटकासाठी पडेल ते काम पार केले आणि आज चित्रपट, मालिका, नाटक यासाठी तज्ज्ञ वेशभूषाकार म्हणून मानाचे स्थान निर्माण केले. त्यांच्या गुणांची पारख झाली.
‘टुरटूर’चे शेकडो किस्से हे आजही सांगितले जातात. मराठी नाटकाच्या प्रवाहात हे नाटक दंतकथाच ठरली. त्यावर एखादी पुस्तिकाही सहज निघू शकेल, त्यात या नाटकामागल्या नाटकांचा रंजक इतिहास उलगडला जाईल, त्यातून नव्या रंगकर्मींना बोधही घेता येईल.
एकच इच्छा होती त्यांची,
संपू नये ही टुर
राहिले दूर घरदार
जवळ येई विराहाचा काळ
टूर आली टूर आली
हो, आनंदाचे क्षण वेचित
विरहाचे डाग सोनिया
टुर आली टुर आली
समारोपाला शाहीर ठेक्यात हे काव्य सादर करतो. गाडीची दिशा बदलते आणि पडदा पडतो; पण तरीही हे नाटक रसिकांच्या मनात पुरतं घर करतं. आज आजोबांच्या भूमिकेत असलेल्या रसिकांपुढे ही ‘टुर’ या नातवाच्या वयात नुसत्या आठवणीने क्षणार्धात घेऊन जाते.
sanjaydahale33@gmail.com