नर्मदेच्या किनारी मंगळाने गणेशाला प्रसन्न करण्याकरिता गणेशाची प्रतिमा दृष्टीसमोर ठेऊन समोर ठेऊन ‘पारीनेर’ या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली. अनेक ठिकाणी ‘पारीनेर’ या ठिकाणाच उल्लेख सापडतो. पण आज हे ठिकाण नर्मदेच्या किनारी कुठेही सापडत नाही. उज्जैनच्या मंगलनाथ मंदिराला भेट दिली असतानाही याचा संदर्भ सापडला नाही. गणेश मंदिराचे हे एक विलुप्त झालेले अदृश्य ठिकाण आहे.सिंधुदेशात ‘बल्लाळ विनायक’ या नावाचा उल्लेख दिसतो. परंतु, या क्षेत्राची कुणालाही माहिती नाही. महर्षि कश्यप ऋषींनी आपल्या आश्रमात ‘वक्रतुंड गणेशा’ची स्थापना केली होती आणि दीर्घकाळ तप केले होते. पण हा आश्रम नेमक्या कुठल्या ठिकाणी आहे याचा अजूनही शोध लागला नाही. तेलंगणा प्रांतात असुरांचा वध करण्याकरिता गणपतीने अवतार घेतला होता. याचा उल्लेख जरी मिळत असला तरी हे ठिकाण शोधुनही सापडत नाही. या प्रांतातल्या करीमनगर जिल्ह्यात याचा पाठपुरावा केला असता काही माहिती मिळाली नाही. अशी ही भारतातील काही अदृश्य असलेली गणेशाची ठिकाणे.
भारतातल्या अनेक मोठ्या शहरांमध्ये प्रसिद्ध गणेश मंदिरे बघायला मिळतात. मुंबई येथील प्रसिद्ध ‘सिद्धीविनायक मंदिर’ आणि पुण्याचा ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती’ हे तर देशविदेशात प्रसिद्धच आहेत.
महाराष्ट्रातील अष्टविनायक आणि विदर्भातील अष्टविनायक हे संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. अनेक प्रवासी कंपन्या अष्टविनायक दर्शनच्या आठ- दहा दिवसाच्या गणेश भक्तांकरिता यात्रा काढतात. मदुराई जवळील तिरूप्पमंकुम या पर्वत मालिकेत भव्य गणेश मंदिरे असून याच ठिकाणी भगवान कार्तिकेयाचा विवाह झाला असल्याची माहिती आहे. परंतु, काही लोक याला दंतकथा तर काही लोक याला सत्यकथा समजतात. मदुराईला जाऊनसुद्धा वेळेअभावी हे ठिकाण बघण्याचा योग आला नाही. येथे काळ्या कपड्यातले अय्यपा भक्त जागोजागी बघायला मिळतात. कार्तिकेय स्वामींना येथे ‘अयप्पा स्वामी’ म्हणतात आणि ‘स्वामी शरणम अय्यप्पो’ हे येथल्या भक्तांचे घोषवाक्य आहे. तामिळनाडू राज्यातील तिरूच्चिरापल्ली म्हणजेच त्रिची येथील तीन शिखरांमधील सर्वांत उंच शिखरावर गणपतीचे अतिप्राचीन मंदिर असून हे मंदिर ‘उचिपिल्लेयार’ या नावाने प्रसिद्ध आहे. काही लोक त्रिचीला पूर्वेकडील रोम म्हणतात. कारण येथे अनेक जुनी महाविद्यालये, चर्च आणि सतराव्या शतकातल्या अनेक मोहिमांचे अवशेष जपून ठेवलेले आहेत .बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले रामेश्वरम येथे भगवान श्रीरामाने प्रथम गणपतीची पूजा केल्यानंतरच शिवलिंगाची पूजा केली होती असे समजले. येथे आंघोळ केल्यानंतर ओल्या अंगाने अनेक मंदिरांची परिक्रमा केली जाते.भारतातल्याच नाही तर परदेशी लोकांचीसुद्धा गणपतीवर प्रचंड श्रद्धा आहे. याच भक्तीतून अनेक परदेशी गणेश भक्तांनी पांडेचरीच्या समुद्र किनार्यावर गणेशाचे सुंदर मंदिर बांधलेले दिसले.
हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र हे ज्या ठिकाणी एकत्र मिळतात त्या ठिकाणी तीन रंगाचे पाणी स्पष्टपणे एकत्र आलेले दिसते. या ठिकाणी गणपतीचे मंदिर फार जुने मंदिर आहे. या मंदिराचे दर्शन केल्यावरच कुमारिकादेवीचे दर्शन घेतले जाते. कर्नाटक राज्यातल्या उत्तर कन्नड जिल्ह्यात असलेल्या गोकर्ण महाबळेश्वरची स्थापना केवळ गणेशामुळे झाली. भगवान शंकराचे आत्मलिंग शिवभक्त असलेला रावण समुद्र मार्गाने नेत असताना घाबरलेल्या देवांनी गणपतीला साकडे घातले आणि आत्मलिंग लंकेला न नेण्याची व थांबविण्याची विनंती केली. गणेशाने गुराख्याच्या मुलाचे रूप घेऊन रावणाला फसवून येथेच समुद्रकिनारी शिवाचे आत्मलिंग जमिनीवर ठेवले. रावणाने खूप जोर लाऊनसुद्धा ते आत्मलिंग जमिनीबाहेर काढता आले नाही; पण या जोराने आत्मलिंगाचा आकार गाईच्या कानासारखा झाला. येथे भाविकांना या आत्मलिंगाला स्पर्श करून दर्शन घेता येते. या समुद्रस्थानावर महा, बळ आणि ईश्वर याचा उपयोग रावणाने केला आणि आत्मलिंगाचा आकार गाईच्या कानाच्या आकाराचा झाला म्हणून या ठिकाणाला ‘गोकर्ण महाबळेश्वर’ असे म्हणतात. या गोकर्णात सिद्ध गणपतीची मूर्ती आहे आणि या मूर्तीच्या डोक्यावर रावणाने आघात केल्याचे चिन्ह दिसतात.
अहमदनगर, रायगड आणि पुण्याच्या परिसरातील अष्टविनायक संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. पुराणातील एका श्लोकामुळे या अष्टविनायकाची ओळख महाराष्ट्राला झाली. आठपैकी सहा मंदिरे ही पुणे जिल्ह्यात असून दोन मंदिरे ही रायगड जिल्ह्यात आहेत. पुण्यापासून ८० किलोमीटरवर असलेल्या मोरगाव येथील ‘मयुरेश्वर अथवा मोरेश्वर मंदिर’, नगर जिल्ह्यातील भीमा नदीच्या जवळ असलेले ‘सिद्धिविनायक मंदिर’, रायगडमधील अंबा नदीच्या आणि सरसगड किल्ल्याच्यामधोमध असलेले ‘बल्लाळेश्वर पाली’ गणेश मंदिर, महड येथील ‘वरदविनायक मंदिर’, कुकडी नदीच्या तीरावरचे ओझर येथील ‘विघ्नेश्वर मंदिर’, शिरूर जवळील रांजणगाव येथील ‘महागणपती मंदिर’, पुण्यापासून दीडशे किलोमिटरवर असलेल्या लेण्याद्री गुंफेतील ‘गिरिजात्मज मंदिर’, आणि प्रत्यक्ष ब्रम्हदेवाने गणेश प्रतिमा स्थापन केलेले थेऊर-पुणे परिसर येथील ‘चिंतामणी गणेश मंदिर’ ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध व लोकप्रिय अष्टविनायक मंदिरे आहेत.
याशिवाय निसर्ग संपन्न असलेल्या विदर्भातील अष्टविनायक सुद्धा प्रसिद्ध आहे. दंडक राजाची कर्तव्यभूमी असलेल्या विदर्भाला पूर्वी दंडकारण्य म्हटले जात होते. विदर्भाच्या वाकाटक काळापासून या प्रांतात गणेशाची आराधना होत आहे. विदर्भातील अष्टविनायकाला विशिष्ट असा क्रम नाही. यात नागपूरकर भोसलेपूर्वकालीन ‘स्वयंभू टेकडी गणेश मंदिर’ असून नागपूरचे हे आराध्य दैवत आहे आणि यापासूनच विदर्भाच्या अष्टविनायकची सुरवात होते. सीताबर्डी किल्ल्याच्या पायथ्याशी हे मंदिर एका उंच टेकडीवर विशाल पिंपळाच्या झाडाखाली असल्याने याला ‘टेकडीचा गणपती’ म्हणतात. प्राचीनकाळी याला लागुनच विशाल ‘शुक्रवार तलाव’- ‘जुम्मा तलाव’ असल्याने रघुजी भोसले हे रोज पहाटे होडीमधून प्रवास करून गणपतीच्या दर्शनाला जात असत. नागपूर जवळील ग्रामीण भागातला महाभारतकालीन ‘आदासा’चा गणपती हे रम्य परिसरातले जागृत ठिकाण. याला ‘शमी विघ्नेश आणि स्वामी विघ्नेश’सुद्धा म्हणतात. उजव्यासोंडेची ही नृत्यगणेशाची मूर्ती आहे असा अभ्यासकांचा दावा आहे. शमीवृक्षाच्या मुळापासून या गणेशाची निर्मिती झालेली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील ‘चिंतामणी गणपती’ हा सर्व भक्तांची चिंता दूर करतो अशी श्रद्धा आहे. याचे प्राचीन नाव कदंबपूर आहे. हे मंदिर १५ फुट जमिनीखाली असून तीन जीने उतरुन जावे लागते. येथे बारावर्षातून एकदा गंगा अवतीर्ण होते.
वर्धा जिल्ह्यातील ‘केळझळ’ म्हणजे महाभारतकालीन ‘एकचक्रा नगरी’; येथे बकासुराचे वास्तव्य होते. बकासूर राक्षसाचे मैदान आजही ‘तोंड्या राक्षस म्हणून ओळखले जाते. याच नगरीत पांडवांचे वास्तव्य असताना भीमाने बकासुराचा वध करून गणेशाची स्थापना केली. हे स्थळ एका उंच डोंगरावर असून आता सुंदर सिद्धीविनायकाचे मंदिर बांधले आहे. बकासुराचा वध केल्यावर सारे पांडव जवळच असलेल्या आताच्या ‘श्रीक्षेत्र चौकी’ येथे जाऊन वास्तव्य केले आणि गुरु बृहस्पतीला सर्वशस्त्रे अर्पण करून पापक्षालन केले. रामटेक जिल्ह्यातील तेलिपुरा येथे असलेले ‘अष्ट दशभुजा’ गणेशाला एकूण १८ हात आहेत. हे १८ सिद्धिचे प्रतिक आहे, असे मानले जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे असलेले ‘वरद विनायक गौराळा’ हे प्राचीन मंदिर उंच टेकडीवर आहे. सोळा खांब असलेला सभामंडप येथे दिसतो. हा डोंगर चढत असताना प्राचीन काळातील अनेक भग्नावशेष बघायला मिळतात. भंडारा-मेंढा येथील वैनगंगेच्या तीरावरील ‘भृशुंड गणेश मंदिर’ असून येथील मूर्ती आठ फुटांची आहे. ही भृशुंड ऋषींची तपस्याभूमी आहे. भंडारा पवनी येथीलच वैनगंगेच्या तीरावरील ‘पंचानन विघ्नराज गणपती’ मंदिर असून येथे मूर्ती नाही. मंदिरात एक उभा पाषाण असून त्याला पाच तोंडे आहेत. असा हा आगळावेगळा गणपती. असे हे विदर्भातील अष्टविनायक. यापैकी तीन नागपूर जिल्ह्यात असून दोन भंडारा जिल्ह्यात आहेत. बाकी एक एक मंदिरे यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात आहेत.
या व्यतिरिक्त इंदोर येथील चोवीस तास सुरू असलेले ‘खजराना गणेश मंदिर’ प्रसिद्ध आहे. अहिल्याबाई होळकरांनी विहीरीतून मूर्ती काढून याची स्थापना केलेली आहे. उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरापासून केवळ सहा किलोमिटर अंतरावर नवव्या शतकातल्या ‘चिंतामण गणेश’ मंदिरात जाण्याचा योग आला. हे मंदिर परमारकालीन आहे असे समजले. गर्भगृहात प्रवेश केल्यावर येथे गणपतीच्या तीन स्वयंभू प्रतिमा दिसतात. चिंतामण, इच्छामन आणि सिद्धिविनायक अशी ही तीन रुपे आहेत. या तिन्ही रूपात गणेश भक्तांना प्रसन्न होतो अशी श्रद्धा आहे. सिक्किममध्ये गंगटोकपासून फक्त सहा किलोमिटर असलेल्या उंचा पर्यटन स्थळावर असलेले ‘गणेश टोक’ हे पर्यटकांचे आवडते ठिकाण. येथील ताशी व्ह्यु पॉइंट हा सहा हजार पाचशे मिटरच्या पर्वतराजीतस्थित असून सैन्याच्या अधिकार क्षेत्रात या मंदिराची व्यवस्था आहे. भारतातील अशा या काही दृश्य, अदृश्य आणि अपरिचित मंदिरांचा गणेशोत्सवाच्या निमित्ताने परिचय.
– श्रीकांत पवनीकर