5 वर्षांत दिला 2128 टक्के परतावा, सलमान ब्रँड ॲम्बेसिडर असलेल्या कंपनीमुळे गुंतवणुकदारांची दिवाळी!
गुंतवणुकीसाठी तुम्ही जोरदार परतावा देणाऱ्या स्टॉकच्या शोधात असाल. तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जीआरएम ओव्हरसीज हा शेअर योग्य पर्याय ठरू शकतो. या कंपनीकडून बासमती तांदळाची निर्यात केली जाते. ही कंपनी भारतातील एफएमसीजी क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. गेल्या काही काळात या कंपनीत प्रमोटर्स तसेच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) आपली गुंतवणूक वाढवलेली आहे.
जीआरएम ओव्हरसीज या कंपनीने नुकतेच बॉलिवुडचा सुपरस्टार सलमान खान याला सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसिडर) म्हणून करारबद्ध केलेले आहे. गेल्या शुक्रवारी (ता.२३) या कंपनीच्या शेअरमध्ये 0.38 टक्क्यांनी किरकोळ घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी या कंपनीच्या शेअरचे मूल्य 262.80 रुपये होते. या कंपनीचे बाजार भांडवल 1576.80 कोटी रुपये इतके आहे.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांसह प्रमोटर्सने वाढवली गुंतवणूक
जून 2024 तिमाहीपर्यंत प्रमोटर्सने या कंपनीचे 73,000 शेअर्स खरेदी केले. ज्यामुळे प्रमोटर्सची या कंपनीतील हिस्सेदारी 72.29 टक्क्यांपर्यंत वाढली. मार्च 2024 पर्यंत ही हिस्सेदारी 72.16 टक्के होती. यासह परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनाही या कंपनीतील आपली गुंतवणूक वाढवलेली आहे. गुंतवणुकीचे हे प्रमाण 0.67 टक्क्यंपर्यंत वाढली आहे. मार्च 2024 पर्यंत ही हिस्सेदारी 0.26 टक्के होती. या कंपनीची 27.05 टक्के मालकी ही जनतेकडे आहे.
जीआरएम ओव्हरसीज शेअरचा आरओई 18.3 टक्के आणि आरओसीई 12.9 टक्के आहे. कंपनीचा डेट-टू-इक्विटी रेशो 1.28 आहे. या शेअरचे पीई प्रमाण 30.5 रुपये आहे. या कंपनीत प्रमोटर्सच्या गुंतवणुकीचे प्रमाण चांगलेच आहे. त्यामुळे ही एक सकारात्मक बाब ठरत आहे.
जीआरएम ओव्हरसीजने दिले 262,800 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स
गेल्या एका महिन्यात जीआरएम ओव्हरसीज या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्क्यांनी परतावा दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत परताव्याचे हे प्रमाण 47 टक्के आहे. वर्षभराची तुलना करायची झाल्यास हा परतावा 37 टक्के आहे. गेल्या पाच वर्षांत या कंपनीने गुंतवणूकदारांना 2128 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. वीस वर्षांत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 262,800 टक्के महारिटर्न्स दिले आहेत.
तिमाही निकालात नेमके काय?
जीआरएम ओव्हरसीज या कंपनीच्या तिमाही निकालाचा विचार करायचा झाला तर आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीमध्ये या कंपनीने 18 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवलेला आहे. गेल्या वर्षाच्या याच तिमाहीत हे प्रमाण 17.4 कोटी रुपयांनी अधिक आहे. कंपनीच्या मिळकतीत 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 30 जून 2024 पर्यंत या कंपनीचा महसूल 370 कोटी रुपयांपर्यंत वाढला होता. जो गेल्या वर्षात याच काळात 320 कोटी रुपये इतका होता.