भारतीयांची प्रतीक्षा संपणार! लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन सेवेत दाखल जाणार; 'या' मार्गावर धावणार!
वंदे भारत ट्रेन भारतीयांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर आता भारतीयांची वंदे भारत स्लीपर ट्रेनची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन चालू वर्षाच्या अखेरीस सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशी माहिती चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीचे महाव्यवस्थापक यू सुब्बा राव यांनी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन भारतीयांच्या सेवेत रुजू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन 20 सप्टेंबरपर्यंत भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल) बेंगळुरू प्लांटमधून चेन्नईसाठी रवाना होणार आहे. त्यानंतर तिची अंतिम चाचणी आणि कमिशनिंग चेन्नईमध्ये होईल. ज्यास सुमारे 15-20 दिवस लागणार आहेत. अशी माहितीही चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीचे महाव्यवस्थापक यू सुब्बा राव यांनी दिली आहे.
सुरुवातीला या मार्गावर धावणार
वंदे भारत स्लीपर ट्रेन ही वंदे भारत ट्रेनच्या सीरीजमधील तिसरी फेज आहे. त्यानुसार ही पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही गुजरातमध्ये प्रथम धावणार आहे. याबाबत बोलताना यू सुब्बा राव यांनी सांगितले की, वंदे भारत स्लीपर ट्रेनची अंतिम चाचणी आणि ती कार्यान्वित झाल्यानंतर, वंदे भारत स्लीपरला मेनलाइनवर चालवले जाईल. या ट्रेनची हाय-स्पीड चाचणी ही उत्तर पश्चिम रेल्वेवर घेतली जाण्याची शक्यता आहे. ही ट्रेन प्रामुख्याने लखनऊहून उत्तर पश्चिम रेल्वेवर दोन महिने निगराणीखाली चालवली जाईल. असेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – सुधा मुर्तीं 20,000 रुपये देत होत्या, नाकारत पुजारी म्हणाला… ही चुक पुन्हा करु नका!
एका ट्रेनमध्ये 823 बेड असणार
16 डब्यांच्या वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये 823 बर्थ अर्थात बेड असणार आहे. ज्यामध्ये 11 3AC कोच (611 बर्थ), 4 2AC कोच (188 बर्थ) आणि 1 1AC कोच (24 बर्थ) यांचा समावेश आहे. युरोपातील नाईटजेट स्लीपर ट्रेनच्या धर्तीवर वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार करण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये रात्रीच्या वेळी दिवे बंद केल्यावर, शौचालयात जाणाऱ्या प्रवाशांसाठी पायऱ्यांच्या खाली जमिनीवर एलईडी पट्ट्या उजळतील. त्यामुळे अतिशय सुसज्ज अशा वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये प्रवाशांना प्रशस्त सुविधा मिळणार आहेत.
प्रवाशांना या सुविधा मिळणार
देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल) बेंगळुरू आणि हैदराबाद स्थित मेधा सर्वो ड्राइव्हस् लिमिटेड यांनी विकसित केली आहे. यामध्ये पोलंड-आधारित युरोपियन रेल्वे सल्लागार ईसी अभियांत्रिकीच्या डिझाइन इनपुटचा समावेश आहे. प्रत्येक स्लीपर बर्थमध्ये रीडिंग लाइट, चार्जिंग सॉकेट, मोबाईल/मॅगझीन होल्डर आणि स्नॅक टेबल असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना या ट्रेनमध्ये पुर्णपणे घराचा फील येणार आहे.