
2024-25 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर 7 टक्के राहणार; आयएमएफचा सुधारित अंदाज जारी!
ग्लोबल रेटिंग एजन्सी मूडीजने (Moodys) आपल्या कॅलेंडर वर्ष 2024 मध्ये भारतासाठी जीडीपी ( Gross Domestic Product) वाढीचा अंदाज 7.1% दर्शवला असून मागील अंदाजापेक्षा हा अंदाज सकारात्मक आहे. जूनमध्ये वर्तविलेल्या 6.8% च्या अनुमानावरुन आता फर्मने 0.3 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. याचे कारण आशिया-पॅसिफिक क्षेत्रात होणारी वाढ ही जागतिक अर्थव्यवस्थेला मागे टाकेल अशी अपेक्षा केली जात आहे.
मात्र 2025 साठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज मूडीज ने केवळ 6.5% ठेवला आहे. तर एजन्सीने 2026 साठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज अगदी काही अंशी सुधारून 6.6% इतका असू शकतो असा अनुमान लावला आहे.
जून 2024 मध्ये, मूडीजने म्हटले होते की 2026 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 6.2% पर्यंत कमी होईल. मात्र महागाईबद्दल अनुकूल अनुमान दर्शवत महागाईवर चांगले परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे.
महागाईबद्दल मूडीजचा अंदाज
2024 च्या जुलै आणि ऑगस्टमध्ये भारतातील महागाई ही तब्बल 4% च्या खाली आहे. एजन्सीने 2025 आणि 2026 मधील भारतातील महागाई ही अनुक्रमे 4.5% आणि 4.1% असेल असा अंदाज वर्तवला आहे. RBI ने आर्थिक वर्ष 2025 मध्ये महागाई 4.5% पर्यंत घसरण्याची आशा केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगामी बैठकीमध्ये केंद्रीय बँक दरांमध्ये कोणतेही बदल करण्याची शक्यता कमी आहे. डिसेंबरमध्ये 25 बेसिस पॉइंट्सची पहिली कट होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, मंदीच्या सावटाखाली असलेल्या अमेरिकेमध्ये मंदीची भीती दूर करण्यासाठी अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने अलीकडेच पॉलिसी रेट 50 बेसिस पॉइंट्सने कमी केले होते.
जीडीपी म्हणजे काय ( Gross Domestic Product)
जीडीपी हा कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या निर्देशकांपैकी एक आहे. जीडीपीमुळे देशामध्ये विशिष्ट कालावधीत उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांचे एकत्रित मूल्य दर्शविले जाते. यामध्ये ज्या विदेशी कंपन्या देशात उत्पादन तयार करतात त्यांचाही समावेश केला जातो.
जीडीपीचे दोन प्रकार आहेत
जीडीपीचे मुख्यत: दोन प्रकार आहेत. रियल GDP आणि नॉमिनल GDP. यामधील रिअल जीडीपीमध्ये, वस्तू आणि सेवांचे मूल्य मूळ वर्षाच्या मूल्यावर किंवा स्थिर किंमतीवर मोजण्यात येते. सध्या 2011-12 हे GDP मोजण्यासाठी आधारभूत वर्ष आहे. तर नॉमिनल GDP हा वस्तू आणि सेवांच्या वर्तमान किमतींवर मोजला जातो.