उद्या शेअर बाजारात खुला होणार हा जबरदस्त आयपीओ; पैसे तयार ठेवा, कमाईची मोठी संधी!
एक्मे सोलर होल्डिंग्स लिमिटेड या पुनर्नवीकरण उर्जा क्षेत्रातील अग्रणी कंपनीकडून आगामी खुल्या आयपीओ ऑफरसाठी प्रतिसमभाग 2 रुपये फेसव्हॅल्यू असलेल्या प्रत्येक समभागासाठी 275 रुपये ते 289 रुपये प्राईस बँडची घोषणा करण्यात आली आहे. कंपनीच्या उर्जा प्रकल्पांमध्ये सौर, पवन, व हायब्रीड तसेच फर्म व डिस्पॅचेबल पुनर्नवीकरण (एफडीआरई) प्रकल्पांचा समावेश आहे.
किती आहे आयपीओचा आकार
एक्मे सोलर होल्डिंग्सची खुली आयपीओ ऑफर अर्थात समभाग विक्री बुधवारी (ता.6) नोव्हेंबर 2024 पासून सुरु होईल व शुक्रवार दिनांक 08 नोव्हेंबर 2024 रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान 51 समभागांच्या एका लॉटसाठी व त्यापुढे 51 समभागांच्या पटीत गुंतवणुकीसाठी बीड करु शकतील. आयपीओमध्ये 2395 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू व एक्मे क्लीनटेक सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडकडून, ऑफर ऑफ सेल असलेल्या 505 रुपये कोटींचा समावेश आहे.
कुठे वापरला जाणार आयपीओचा निधी
एक्मे सोलर कंपनी आयपीओमधून उभ्या राहणाऱ्या रकमेपैकी 1795 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम आपल्या उपकंपन्यांमध्ये गुंतवणार आहे. त्यातून या उपकंपन्यांचे काही कर्ज फेडण्यात येणार आहे. तसेच काही रक्कम सामान्य कॉर्पोरेट हेतुंसाठी देखील वापरण्यात येणार आहे. एक्मे सोलर होल्डिंग्स लिमिटेड कंपनीची स्थापना एक्मे समुहाच्या पुनर्नवीकरण उर्जा व्यवसाय विभागातर्फे 2015 साली करण्यात आली होती.
एक्मे सोलर कंपनीने सौर उर्जा निर्मितीपासून आपला व्यवसाय वाढवला असून विविध क्षेत्रात विस्तारला देखील आहे. यामुळे ही कंपनी आता देशाच्या पुनर्नवीकरण उर्जा निर्मिती क्षेत्रातील एकात्मिक पुनर्नवीकरण उर्जा कंपनी झाली आहे. कंपनी आपल्या अंतर्गत इंजिनिअरींग, प्रॉक्युरमेंट व कंस्ट्रक्शन (इपीसी) व ऑपरेशन व मेंटेनन्स टीमच्या माध्यमातून युटीलीटी स्केल रिन्युएबल एनर्जी प्रकल्पांचे प्रचालन, उभारणी, आणि मालकी तत्वावर विकास देखील करीत असते. तसेच कंपनी या प्रकल्पांमधून निर्माण झालेली वीज केंद्र व राज्य शासनांचा पाठिंबा असलेल्या विविध ग्राहकांना विकून महसूल देखील उभा करते.
एक्मे सोलर आयपीओच्या बुक रनिंग लीड मॅनेजर्सचे काम नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, जे एम फायनान्शिअल लिमिटेड, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड आणि मोतीलाल ओसवाल इनव्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे. तसेच आयपीओ रजिस्ट्रार म्हणून केफिन टेक्नॉलॉजिज लिमिटेड ही कंपनी काम पाहत आहे.
जून 30, 2024 पर्यंतच्या माहितीनुसार कंपनीच्या 28 प्रकल्पांपैकी 18 प्रकल्प आंध्रप्रदेश, राजस्थान, आणि तेलंगणा या राज्यात असून कंपनीच्या एकूण प्रकल्प प्रचालन क्षमतेपैकी हे प्रमाण 85.07 टक्के आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)