अदानींची एकाच दिवसात तब्बल 'एवढ्या' कोटींची कमाई, मुकेश अंबानींच्या संपत्तीतही प्रचंड वाढ (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Gautam Adani Marathi News: १९ दिवसांच्या दुष्काळानंतर बुधवारी भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. बुधवारी, धातू, वाहन, आयटी, एफएमसीजी, मीडिया, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, रिअल इस्टेट आणि तेल आणि वायू क्षेत्रांमध्ये चांगली वाढ दिसून आली. यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे त्यांच्या एकूण संपत्तीतही लक्षणीय वाढ झाली आहे.
फोर्ब्स बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीत एकाच दिवसात ३.२ अब्ज डॉलर्स म्हणजेच २७,८०० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यासह, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ५५.४ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी सध्या २७ व्या क्रमांकावर आहेत.
एकाच दिवसात अदानीच्या शेअर्सने मोठी उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले. अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये, अदानी ग्रीन एनर्जीच्या, अदानी एंटरप्राइजेस, अदानी पोर्ट आणि अदानी एनर्जी सोल्यूशन्सच्या शेअर्सच्या किंमतीत वाढ पाहायला मिळाली. या शेअर्सच्या किंमतीत एका दिवसात प्रचंड वृद्धी झाल्याने गौतम अदानी यांची संपत्तीही वाढली.
रिलायन्स ग्रुपचे मालक मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीतही लक्षणीय वाढ झाली आहे. फोर्ब्स बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीत फक्त एका दिवसात १.३ अब्ज डॉलर्स म्हणजेच ११,२०० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यासह, मुकेश अंबानी यांची संपत्ती ८७.१ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. मुकेश अंबानी सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १८ व्या क्रमांकावर आहेत.
टेस्ला, स्पेसएक्स आणि एक्सचे मालक एलोन मस्क फोर्ब्स अब्जाधीश निर्देशांकात अव्वल स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ३५१.६ अब्ज डॉलर आहे. दुसऱ्या स्थानावर मार्क झुकरबर्ग आहेत, ज्यांची एकूण संपत्ती २२६.७ अब्ज डॉलर आहे. जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस आहेत, ज्यांची एकूण संपत्ती २२३.५ अब्ज डॉलर आहे. चौथ्या स्थानावर लॅरी एलिसन आहेत, ज्यांची एकूण संपत्ती १९९.२ अब्ज डॉलर आहे. पाचव्या स्थानावर बर्नार्ड अर्नॉल्ट आणि फॅमिली आहेत ज्यांची एकूण संपत्ती १८०.६ अब्ज डॉलर आहे.